इंग्रजांच्या भूमीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संवर्धन करणारे 'महाराष्ट्र मंडळ लंडन'

इंग्रजांच्या भूमीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संवर्धन करणारे 'महाराष्ट्र मंडळ लंडन'

Sunday May 01, 2016,

6 min Read

ज्या इंग्रजांनी भारतावर १५० वर्षे राज्य केले, त्या इंग्रजांच्या भूमीत आणि तेही लंडनमध्ये भारत स्वतंत्र होण्यापूर्वी महाराष्ट्र मंडळाची स्थापना झाली, ही गोष्ट खरी वाटणे, तसे अशक्यच आहे. पण हे सत्य आहे. १९३२ साली सुप्रसिद्ध लेखक आणि राजकारणी न.चि.केळकर हे लंडनमध्ये गोलमेज परिषदेला गेले होते. तेव्हा त्यांनी लंडनमधील महाराष्ट्रीयन लोकांना एका छताखाली आणण्यासाठी महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली. आजही हे मंडळ लंडनमध्ये कार्य़रत असून, परदेशातील जुने महाराष्ट्र मंडळ, असे या मंडळाला संबोधले जाते. आज या मंडळामुळे आपल्या मायभूमीपासून महाराष्ट्रापासून दूर असलेल्या लोकांना एकत्र येऊन गप्पा मारण्याचे, कला-संस्कृती यांचा आस्वाद घेण्याचे, आपले सण साजरे करण्याचे एक व्यासपीठ मिळाले आहे. लोकांना मनोरंजनाचे विविध कार्यक्रम सादर करता यावे, याकरिता मंडळ सतत कार्यशील राहिले आहे. तसेच 'महाराष्ट्र भवन' या मंडळाच्या वास्तूमध्ये महाराष्ट्र निर्माण करण्याचे मंडळाचे सतत प्रयत्न राहिले आहेत.

image


'जेवढा पाया मजबूत, तेवढीच त्यावर उभी राहणारी इमारत मजबूत'

हे वाक्य या मंडळाच्या बाबतीत सार्थ ठरते. १९३२ साली स्थापना करण्यात आलेल्या मंडळाने नुकताच हिरकमहोत्सव साजरा केला असून, शतकपूर्तीच्या दिशेने ते यशस्वी प्रवास करत आहेत. १९३२ साली स्थापन करण्यात आलेल्या या मंडळाच्या उद़्घाटनाच्या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बॅ. जयकर, कोल्हापूरचे दिवाण सुर्वे, डॉ. गोडबोले तसेच डॉ. पारधी यांसारखे अनेक नामवंत लोक उपस्थित राहिले होते. आजही या मंडळाकडे स्थापनेच्या काळातील काही आठवणी आहेत. स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात मंडळात अनेक कार्यक्रम सादर झाले. मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान मंडळाचे काम काही काळ थंडावले होते. मात्र या परिस्थितीत बदल झाला तो १९५२ साली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर बाळासाहेब खेर यांची लंडनमध्ये उच्चायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आणि तेव्हा त्यांनी या मंडळाला पुनर्जिवीत केले. लंडनमध्ये स्थायिक झालेल्या नव्या आणि जुन्या मंडळींना एकत्र करत त्यांनी अनेक मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. भारतीय कलाकारांना बोलवून त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. आज या मंडळाचा जवळपास ८०० सदस्यांचा एक परिवार तयार झाला आहे. आजवर या मंडळामध्ये सी.डी.देशमुख, शरद पवार यांसारख्या अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे.

सुरुवातीची अनेक वर्षे या मंडळाचे कार्यक्रम भाडेतत्वावर घेतलेल्या वास्तूत होत असत. मंडळाची आजची वास्तू ही १९८९ साली ताब्यात घेण्यात आली आहे. तेव्हा कार्यकारिणी समितीला एका चर्चची जागा उपलब्ध असल्याचे समजले. त्यानंतर तत्कालीन कार्यकारिणीने पैसे उभारण्यासाठी कंबर कसली. त्यांना महाराष्ट्र राज्याकडूनही पैशांची भरपूर मदत झाली. तसेच मंडळाला प्रत्येक कुटुंबाकडून सरासरी १५० पौंड एवढी देणगीदेखील मिळाली होती. अशाप्रकारे ७२ हजार पौंड्स एवढी किंमत मोजल्यानंतर ९९ वर्षांच्या करारावर मंडळाची स्वतःची वास्तू उभी राहिली. त्यानंतर मंडळाच्या कार्यक्रमांना जोमाने सुरुवात करण्यात आली. आज मंडळात प्रतिवर्ष विविध कार्यक्रमांचे लहान मुलांसाठी वार्षिक खेळांचेदेखील आयोजन करण्यात येते. या मंडळात मकरसंक्रात, गुढीपाडवा, महाराष्ट्रदिन, आनंदमेळा, दिवाळी यांसारखे अनेक सण साजरे केले जातात. यातही मंडळाचा सर्वात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे 'गणेशोत्सव'. सदर महाराष्ट्र मंडळ १० दिवस गणेशोत्सव साजरा करते. या दहा दिवसांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. लंडनमधील तसेच लंडनबाहेरुनही असंख्य लोक गणपतीच्या दर्शनाकरिता येतात. त्यामुळे गणेशोत्सव हा मंडळाचा मानाचा सोहळा असल्याची भावना सदस्यांची आहे.

लंडनमध्ये नव्याने स्थायिक झालेल्या लोकांना या मंडळाची माहिती कशाप्रकारे मिळते, असे विचारले असता मंडळाचे अध्यक्ष सुशील रपटवार सांगतात की, 'ही एक दुहेरी संभाषणाची प्रक्रिया आहे. जेव्हा आम्ही लंडनमध्ये कुठे फिरत असू, तेव्हा जर आमच्यापैकी कोणाला मराठीत बोलणारी व्यक्ती आढळली, तर आम्ही तिच्याशी बोलण्यास सुरुवात करतो. जर ती व्यक्ती मराठीभाषिक असेल, तर ती नक्कीच महाराष्ट्रातील असणार, याची कल्पना असते. त्यामुळे त्या व्यक्तिसोबत बोलल्यानंतर, तिला व्यवस्थित ओळखल्यानंतर आम्ही त्यांना आमच्या मंडळाची कल्पना देतो आणि तेथे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देतो. ही प्रक्रिया उलटपक्षीदेखील होते. इंटरनेटच्या माध्यमातून किंवा मौखिक प्रसिद्धीमुळे अनेकांना आमच्या मंडळाची माहिती मिळते आणि ते आमच्याशी संपर्क साधतात.' लंडनमध्येच जन्माला आलेल्या मुलांना महाराष्ट्राची ओळख करुन देण्यासाठीदेखील हे मंडळ प्रयत्नशील असते. अशा मुलांना बालपणापासूनच या मंडळाच्या कार्यक्रमात सहभागी करण्यात येते. विविध सांस्कृतिक उपक्रमांद्वारे त्यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल ओढ निर्माण केली जाते. तसेच नुकतेच या मंडळाने मराठी भाषेचे वर्ग सुरू केले असून, चार ते चौदा वर्षाच्या वयोगटातील मुलांना खेळीमेळीच्या वातावरणात देवनागरी लिपी, मराठी भाषा शिकवण्यात येते. या वर्गांनादेखील लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सुशील सांगतात. या उपक्रमांकरिता निधीचे नियोजन कशाप्रकारे केले जाते, याबाबत बोलताना सुशील सांगतात की, 'आम्ही मंडळाद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या नाटकासारख्या काही उपक्रमांना तिकिट आकारतो. त्यामुळे आमचा खर्च सुटतो. तसेच गणेशोत्सव हा आमच्या मंडळाद्वारे साजरा करण्यात येणारा सर्वात मोठा सण आहे. या सणाला मंडळातील बरेच लोक देणगी देतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी जमा होतो, ज्यातून गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवाला आमच्या मंडळात केवळ महाराष्ट्रीयनच नव्हे तर गुजराती, पंजाबी म्हणजे भारतीय लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. या दहा दिवसात जवळपास दोन ते अडिच हजार लोक, कधीकधी साडेचार हजार भारतीय मंडळात उपस्थित राहतात.'

२००७ साली या मंडळाने हिरकमहोत्सव वर्ष साजरे केले, ही आजवरच्या प्रवासातील एक उपलब्धी असून त्याबद्दल बोलताना सुशील सांगतात की, 'हिरकमहोत्सवी वर्षी आम्ही अडिच दिवसांच्या एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात डॉ. माशेलकर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते. मंडळातील सदस्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम छान पार पडला होता.' २०१२ साली मंडळाच्या ८०व्या वर्षाचे तसेच ऑलिम्पिक्स स्पर्धांचे यजमानपद लंडन भूषवत असल्याचे औचित्य साधून या मंडळाने एक नवे बोधचिन्ह स्विकारले होते. मंडळाच्या या नव्या बोधचिन्हात त्यांनी भिन्न संस्कृती आणि कला यांचा मिलाप होत असतानाचे चित्रण करण्यात आले होते. महाराष्ट्रीयन लोकांनी येथे दैनंदिन जीवनात जतन केलेल्या आणि वृद्धिंगत केलेल्या मराठी जाणिवांचा जल्लोष तुतारी फुंकून दोन मावळे करीत आहेत आणि बोधचिन्हाच्या मध्यभागी लंडनचे एक महत्वाचे प्रतिक असलेला ऐतिहासिक टॉवर ब्रीज दाखवण्यात आला आहे. लंडनमधील बहुभाषिक आणि भिन्न समाजव्यवस्थेत मराठी माणसाने आपला पाय सफलतेने रोवला. येथील समाजात मिसळताना आपली कला- संस्कृती यांचा विसर होऊ दिला नाही...किंबहुना, या भिन्न समाजाशी सुंदर मिलाप साधला, असे चित्रण या बोधचिन्हात करण्यात आले आहे.

image


आपल्या भविष्यातील योजनांबद्दल सुशील सांगतात की, 'मंडळातील कार्य़क्रम वेगळ्या स्तरावर नेण्याचा तसेच त्यात अधिकाधिक लोकांना सहभागी करुन घेण्याचा आमचा मनसुबा आहे. याशिवाय सध्या ग्रेटर लंडनमध्येच विविध मंडळे निर्माण झाली आहेत. दूरवर प्रवास करुन आमच्या कार्यक्रम स्थळी पोहोचणे अनेकांना अडचणीचे होते, त्यामुळे इतर ठिकाणीही अनेक मंडळे निर्माण झाली आहेत. आता आम्ही सर्व एकत्र येऊन कार्य़क्रम करण्याचा विचार करत आहोत. सध्या आम्ही काही कार्य़क्रम एकत्र येऊन साजरे करतोदेखील. मात्र ते अधिकप्रमाणात करण्याचा आमचा मनसूबा आहे. नव्या पिढीकरिता काही विशेष उपक्रम राबवण्याचा आम्ही विचार करत आहोत.'

परदेशातही मराठी ढोल-ताशांचा जल्लोष करणारे ढोल बीट्स यु.के

image


ढोल-बीट्स यु.के हा या मंडळाचा एक भाग असून, २०१२ साली त्याची स्थापना करण्यात आली होती. ढोल बीट्स यु.के हे महाराष्ट्रीय ढोल वाजवणारे एकमेव मंडळ सध्या ग्रेटर लंडनमध्ये आहे. सुरुवातीच्या काळात ते महाराष्ट्र मंडळातील गणेशोत्सवादरम्यानच या वाद्यांचा जल्लोष करत असत. मात्र ऑगस्ट २०१२ सालापासून त्यांनी मंडळाच्या इतर कार्यक्रमांमध्येदेखील सहभाग नोंदवण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांच्या महाराष्ट्रीयन ठेक्यांमुळे दिवसेंदिवस त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होत असून, केवळ महाराष्ट्रीयनच नव्हे तर इतर भाषिकांनीदेखील त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ढोल बीट्स सध्या संपूर्ण लंडन तसेच यूकेमध्ये वर्षभर विविध कार्य़क्रमांना सादरीकरण करत असते. आजवर त्यांनी ट्रफलगर स्क्वेयर येथे दिवाळीच्या कार्य़क्रमाला, वेम्बली येथील साईबाबांच्या मंदिरात गुरुपौर्णिमेला तसेच जागतिक सांस्कृतिक कार्यक्रमाला या आणि अशा अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली आहे.