प्रत्येकाने व्यसनाधिन व्यक्तीला व्यसनमुक्त करण्याची शपथ घ्यावी
व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या ५१ संस्था व व्यक्तींना पुरस्कार
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेल्या समान हक्कामुळे आज व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलनाच्या अध्यक्षा म्हणून महिलांना संधी मिळाली आहे. त्याच बरोबर समाजाच्या व्यसनमुक्तीसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ.आंबेडकर, संत गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज या महापुरुषांनी केलेले कार्य पुढे नेण्याचे एक छोटे काम मला सोपविण्यात आले आहे. हे काम सर्व समाजाचे असुन त्यासाठी प्रत्येक व्यक्तिने एकातरी व्यसनाधिन व्यक्तीला व्यसनमुक्त करण्याची शपथ या निमित्ताने घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन देशातील पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलनाचे संम्मेलनाध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी केले.
संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देशातील पाचवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. उद्योग, खनीकर्म व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री प्रविण पोटे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला मावळत्या संम्मेलनाध्यक्ष मुक्ता पुणतांबेकर, अभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड, समाज कल्याण विभागाचे आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, उपायुक्त भिमराव खंडाते, प्रादेशिक उपायुक्त दिपक वडकुते उपस्थित होते.
सत्यपाल महाराजांनी विनोदाच्या माध्यमातून व्यसन करणाऱ्यांच्या डोळ्यात खनखनीत अंजन घातले. त्यांनी अनेक उदाहरणांच्या माध्यमांतून लोक व्यसनाच्या आहारी कसे जातात हे पटवून दिले.
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी अमरावतीचा उल्लेख रत्नांची खान असा करुन समाजातील बदलत्या व्यसनाधिनतेवर प्रकाश टाकला. व्यसनाधिनता ही समाजाची मोठी समस्या असुन दारुबंदी असणाऱ्या जिल्ह्यातही व्यसनाधिनता आढळून येते या बद्दल खंत व्यक्त केली. शासन समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी काम करीत आहे. त्याचबरोबर नागरिकांची व समाजाची जबाबदारी मोठी असल्याचे त्यांनी सांगितले. व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्थांची जबाबदारी वाढली आहे. काही माणसे पुरस्कारापलिकडे असतात. अशा माणसांना मिळालेले पुरस्कार हे पुरस्काराची शोभा वाढविणारे असतात असे प्रशंसोद्गार संम्मेलनाध्यक्ष सत्यपाल महाराज यांच्याबद्दल काढले. व्यसनाधिनतेमुळे केवळ एका व्यक्तीचा किंवा कुटूंबाचा तोटा होत नसुन संपुर्ण समाजाचा नाश होतो. अशा संम्मेलनाच्या माध्यमातून आपला समाज व्यसनमुक्त करण्यासाठीचे मोठे काम होत असल्याचे ते यावेळी ते म्हणाले.
व्यसन करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वत:चा मुलगा म्हणून थांबविण्याची मनोवृत्ती जोपर्यंत समाजामध्ये निर्माण होणार नाही तो पर्यंत पुढची पिढी व्यसनधिनतेकडे जाण्या वाचून आपण थांबू शकणार नाही. अशा पद्धतीची व्यसनमुक्तीची संम्मेलने प्रत्येक जिल्ह्यात झाली तर महाराष्ट्रात एकही व्यक्ती व्यसनाधिन राहणार नाही असे मत पालकमंत्री प्रविण पोटे पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
मुक्ता पुणतांबेकर- प्रत्येक सामाजिक समस्येच्या मुळाशी व्यसनाधिनता आहे. त्यामुळे व्यसनाधिनतेचे परिणाम लहानपणीच मुलांच्या लक्षात आणून दिल्यास पुढील पिढी चांगली घडेल. आजच्या पिढीतल्या सगळ्या मातांना त्यांची मुल व्यसनाधिन होणार नाहीतं ना? याची काळजी लागून राहते. अशा संम्मेलनाच्या माध्यमातून समाजाला व्यसनमुक्त करण्याचे मोठे काम होत आहे. निराशा पचविण्याची क्षमता असणारी व्यक्तीच या क्षेत्रात काम करु शकते. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांना पुरस्काराच्या स्वरुपात बळ देणे जास्त महत्वाचे ठरते असेही त्या यावेळी म्हणाल्या. दारुबंदीचे जे काम गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा सारख्या जिल्ह्यात आणि केरळ सारख्या राज्यात होवू शकते ते काम संपुर्ण महाराष्ट्रात का होवू शकत नाही असा सवाल मावळत्या संम्मेलनाध्यक्ष मुक्ता पुणतांबेकर यांनी उपस्थित केला.
निशिगंधा वाड यांनी आपल्या ओघवत्या भाषण शैलीने उपस्थितांची मने जिंकुन घेतली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांची उदाहरणे देवून त्यांनी माणसाला मिळालेल्या नव्या कोऱ्या आयुष्याचा उपयोग सुंदर पद्धतीने कसा करता येवू शकते याचे दाखले दिले. मनाने उचल घेतली तर अंधारात ही माणूस उभा राहू शकतो त्यामुळे व्यसन सोडणे हे फक्त व्यक्तीच्या मनावर अवलंबून असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
व्यसनमुक्ती साहित्य ठेवलेल्या ग्रंथदालनाचे उद्घाटन मान्यवरांच्याहस्ते झाले. तसेच यावेळी व्यसनमुक्तीची शपथ सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी सर्व उपस्थितांना दिली. प्रास्ताविकातून पियुष सिंह यांनी व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलनाची भूमिका विषद केली.
व्यसनमुक्तीसाठी यांना मिळाले पुरस्कार
व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्ती व संस्थांना शासनाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार्थीना गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप संस्थेसाठी 30 हजार रुपये तसेच व्यक्तींसाठी 15 हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे आहे.
संस्था - ब्रम्हकुमारीज मेडीकल विंग राजयोग एज्यूकेशन ॲण्ड रिसर्च फाऊंडेशन मालेगावं नाशिक, किशनलालजी बहुउद्देशिय सामाजिक संस्था, हिमायत नगर, नांदेड, नियती फिलॅर्न्थोपिक सोसायटी, ज्योतिबा नगर तरोडा, नांदेड, रिजनल रिसोर्सेस ॲण्ड ट्रेनिंग सेंटर, मुक्तांगण मित्र पुणे, निशिगंधा व्यसनमुक्ती केंद्र, मुक्तांगण मित्र पुणे, राजाराम बापू ज्ञान प्रबोधिनी संचलित जयंत दारिद्रय निर्मुलन अभियान, इस्लामपूर, सांगली, आरोग्य प्रबोधिनी आमगाव, देसाईगंज गडचिरोली, जागृती ग्रामीण विकास संस्था, एकलारी, भंडारा, महर्षी दयानंद कॉलेज, परेल मुंबई, जिल्हा परिषद केंद्रीय उच्च माध्यमिक शाळा, मुडाणा, यवतमाळ, एव्हरेस्ट फाऊंडेशन नाशिक, युगांधर फाऊंडेशन परभणी, भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था भाकर, रत्नागिरी, जय विश्वकर्मा सर्वोदय संस्था औरंगाबाद, राम मनोहर लोहिया प्रतिष्ठाण विकास मंडळ, दगडगाव, नांदेड, डॉर्फ कॅटल केमिकल्स, प्रा.लि.मुंबई या संस्थांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
व्यक्ती - निलेश सोमाणी वाशिम, नरेश रहिले (लोकमत) गोंदिया, प्रफुल्ल व्यास (तरुण भारत) वर्धा, हेरंब कुलकर्णी अहमदनगर, कार्तिक लोखंडे (हितवाद) नागपूर, ॲड.बाळासोहब बानखेले पुणे, गणेश वानखेडे बुलडाणा, धनंजय बामणे सांगली, डॉ.विजय मोरे पिंपरी पुणे, शालनताई वाघमारे कराड सातारा, जयपाल गायकवाड नांदेड, उत्तम गिरी बुलडाणा, प्रदिप माळी औरंगाबाद, निळकंठ बोरोळे अमरावती, प्रसाद ढवळे पुणे, रुस्तम कंपली सोलापूर, तुषार सुर्यवंशी नागपूर, राजाराम पवार रत्नागिरी, डॉ.ज्ञानेश्वर मिरगे बुलडाणा, मांगिलाल चव्हाण बुलडाणा, जगदेव पवार बुलडाणा, अनंतकुमार साळुंखे सांगली, रामदास धुमाळ औरंगाबाद, संतोष खडसे वाशिम, विजय पांडे आकोट, अकोला, विष्णू मापारी औरंगाबाद, ताणाजी जाधव पनवेल, रायगड, डॉ.अमोल चित्रकार अचलपूर, अमरावती, कैलास पानसरे मुंबई, विजया टाळकूटे जेजुरी, पुणे, हरिश्र्चंद्र पाल चंद्रपूर, अवधूत वानखडे यवतमाळ, डॉ.सुमंत पांडे पुणे, डॉ.राजहंस वंजारी नागपूर, अखिलेश हळवे (झी 24 तास) नागपूर (सौजन्य - महान्युज)