मद्यपानाची सवय थांबवण्यासाठी मदत करणारी 'अल्कोहोलिक्स अनॉनिमस'
बदलत्या जीवनशैलीत मद्यपान करणे, ही जवळपास एक फॅशनच झाली आहे. एक अनुभव घेण्यासाठी मद्य पिणारी व्यक्ति नंतर कशाप्रकारे मद्याच्या आहारी जाते, हे तिलाच समजत नाही आणि त्यानंतर तिला मद्यपानाची एवढी सवय होऊन जाते की, मद्यपान टाळणे तिला शक्य होत नाही. अतिमद्यपान करणाऱ्या कोणत्याही व्यक्तिचा समाजाला कायम त्रासच होत असतो. मद्यपान करणाऱ्या व्यक्तिची सवय मोडण्यासाठी अनेक संस्था कार्य़रत असतात, त्यापैकी एक म्हणजे 'अल्कोहोलिक्स अनॉनिमस'. या संस्थेच्या संपूर्ण जगभरात शाखा असून, मद्यपानाची सवय मोडण्यासाठी आलेल्या व्यक्तिचे येथे मोफत सहाय्य केले जाते. १९३५ साली अमेरिकेत 'अल्कोहोलिक्स अनॉनिमस' ही एक आंतरराष्ट्रीय परस्पर सहकार्यातून सुरू झालेली संस्था आहे. बिल विल्सन आणि डॉ. बॉब स्मिथ हे दोन मद्यपी एके संध्याकाळी अमेरिकेत भेटले. त्यांच्यात गप्पा रंगल्या आणि बऱ्याच वेळाने त्यांच्या लक्षात आले की, आज आपण मद्यपान केले नाही. गप्पांच्या ओघात आपण मद्यपान करायचे विसरलो. तेव्हा त्यांनी पुन्हा दुसऱ्या दिवशी भेटायचे ठरवले. बॉब आणि बिल यांच्या या उपक्रमात कालांतराने अनेक मद्यपी जोडले गेले आणि अशाप्रकारे 'अल्कोहोलिक्स अनॉनिमस' म्हणजेच 'ए.ए.' संस्थेची स्थापना झाली. संस्थेच्या प्रारंभीच्या काळात जोडल्या गेलेल्या सभासदांसोबत मिळून बॉब आणि बिल यांनी आध्यात्मिक आणि चारित्र्यविकासासाठी १२ सूत्री कार्यक्रमाची आखणी केली. अनेक मद्यपींना मद्यपानापासून दूर ठेवणारा 'अल्कोहोलिक्स अनॉनिमस'ची ही १२ सूत्री संस्कृती १९४६ साली अधिकृतरित्या सुरू करण्यात आली. भारतात ५ मे १९५७ साली 'अल्कोहोलिक्स अनॉनिमस' संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या उपक्रमामुळे भारतातील जवळपास लाखो मद्यपींची दारू सुटण्यास मदत झाली असून, त्यांचे आयुष्य पूर्ववत सुरू झाले आहे.
'अल्कोहोलिक्स अनॉनिमस' संस्थेचे सभासद सांगतात की, 'ए.ए. संस्थेतील आम्ही सर्व स्त्री-पुरुषांनी मान्य केले होते की, आम्ही अल्कोहोल म्हणजेच मद्याशिवाय जगू शकत नाही, आमचे मद्यपानावर नियंत्रण नाही. तेव्हा आम्हाला जाणीव झाली की, आपल्याला जर पुढील धोका टाळायचा असेल तर आपल्याला मद्यापासून दूर राहणे गरजेचे आहे. याच विचाराने प्रभावित असलेल्या समाजातील हजारो स्थानिक संस्थांच्या मदतीने आम्ही 'अल्कोहोलिक्स अनॉनिमस' या आंतरराष्ट्रीय फेलोशीपचा एक हिस्सा झालो. आमच्या संस्थेच्या प्राधान्यक्रमावर एकच ध्येय होते की, स्वतः विचारी, शांतचित्ताने (मद्यपान न करता) राहायचे आणि ज्या दुसऱ्या कोणाला मद्यपान सोडायचे असेल, त्यांना योग्य ते सहकार्य करायचे. आम्ही काही सुधारक नाही किंवा कोणत्या धर्म-पंथाचे अनुयायी तसेच कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधितदेखील नाही. आम्ही काही कोणत्या नव्या सभासदांची नियुक्ती करत नाही. मात्र संस्थेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या लोकांचे आम्ही कायम स्वागत करतो. आम्ही आमच्या मद्यपानाच्या सवयीचा अनुभव लोकांवर लादत नाही. उलट जेव्हा आम्हाला आमच्या अनुभवाचे कथन करायला सांगतात, तेव्हाच आम्ही तो कथन करतो. आमच्या या संस्थेचे सभासदत्व हे कोणत्याही धर्माच्या, वयोगटाच्या, सामाजिक पार्श्वभूमीच्या स्त्री-पुरुषांना खुले आहे. आमच्या येथे येणाऱ्या अनेकजणांनी इथे येण्यापूर्वीची अनेक वर्षे मद्यपान केलेले असते. त्यामुळे त्यांना मद्यपानाची एक सवय झालेली असते, जी त्यांच्याकडून सुटत नसते. तर अनेकजण मद्यपान करण्यास सुरुवात केल्यानंतर येथे लगेचच दाखल झालेले असतात, जेणेकरुन त्यांची मद्यपानाची सवय त्यांच्यापेक्षा वरचढ ठरू नये. येथे येणाऱ्या अनेक लोकांनी मद्यपानामुळे आपले कुटुंब, नोकरी तसेच समाजातील आपले स्थान गमावलेले असते. अनेकजण तर कित्येकदा ही सवय सोडवण्याकरिता रुग्णालयात दाखल झालेले असतात, भोंदूबाबांच्या बुवाबाजीला बळी पडलेले असतात तर अनेकांना या सवयीमुळे दारुडा समजून पोलिसांचा मारदेखील खावा लागलेला असतो. अतिमद्यपानाच्या या सवयीमुळे आमच्यासारख्या अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झालेली असतात. तेव्हा मद्यप्यांना जाणीव होते की, त्यांच्या मद्यपानाच्या या सवयीने त्यांचे सर्वसामान्य जगणेदेखील प्रभावित केलेले आहे आणि मद्यपानापासून त्यांनी लवकरात लवकर सुटका करुन घ्यायला हवी. असे लोक आमच्या संस्थेत दाखल होत असतात, ज्यांना मनापासून दारू सोडायची आहे.'
'अल्कोहोलिक्स अनॉनिमस' संस्थेचे सभासद ए.ए. अरुण सांगतात की, 'आम्ही आमच्या येथे मद्यपान हे एक व्यसन आहे, असे मानत नाही. तसेच वैद्यकिय परिभाषेतदेखील मद्यपानाला एक आजार असे संबोधले आहे. ज्याप्रकारे मधूमेह हा रोग आहे, म्हणजे साखर ही सर्वसामान्य माणसांच्या शरीराला उपयुक्त आहे. मात्र तिच सारख मधूमेह झालेल्या माणसाकरिता विषाप्रमाणे आहे. तसाच अल्कोहोलिक्स हा एक रोग आहे. एखाद्या शरीराला अल्कोहोल म्हणजेच दारुची एवढी सवय लागते की नंतर ती व्यक्ती दारूपासून परावृत्तच होऊ शकत नाही. त्या व्यक्तिकरिता अल्कोहोल हे विषाप्रमाणे आहे. एखादी व्यक्ती मद्याचा फक्त एकच घोट घेते आणि मद्यपानाच्या अधीन होऊन जाते. त्यामुळे मद्यपानाची परिभाषादेखील बदलत जाते. अनेकजण बऱ्याच वर्षांच्या सवयीमुळे मद्यपानाच्या आहारी गेलेले असतात तर कित्येकजणांना फक्त एकच घोट प्यायल्यानंतर मद्यपानाची ओढ लागलेली असते. आमच्या येथे एखाद्या व्यक्तिने किंवा त्याच्या कुटुंबियांनी मद्यपानापासून मुक्ती मिळवण्यासाठी मदत मागितली की, त्यानंतर आमचे सभासद त्या व्यक्तिशी संपर्क करुन तिचे मनपरिवर्तन करतात. तसेच तिला आमच्या १२ सूत्री कार्यक्रमाला बोलवतात. तेथे आमच्या सभासदांचे अनुभव ऐकून हळूहळू त्या मद्यप्याचे मनपरिवर्तन होत असते. आमचे सभासद त्यांना दारुमुळे कशाप्रकारे आपल्या कुटुंबाचे, समाजाचे तसेच आर्थिक नुकसान होत असते, हे पटवून देतात आणि त्यांनी स्वतः मद्यपानापासून कशी मुक्ती मिळवली, हे त्यांना सांगतात. त्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन तर होतेच शिवाय आपणही मद्यपानापासून मुक्त होऊ शकतो, हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होतो.'
'अल्कोहोलिक्स अनॉनिमस' संस्थेच्या १२ सूत्री कार्यक्रमात मद्यप्याचे विविध प्रकारे मतपरिवर्तन करण्याचा प्रय़त्न केला जातो. 'अल्कोहोलिक्स अनॉनिमस' संस्थेच्या कोणत्याही सदस्याचे नाव कोठेही जाहीर केले जात नाही. त्यांच्या नावापुढे कायम ए.ए. असे लावण्यात येते, त्यांच्या आडनावाचा त्यात उल्लेख केला जात नाही. उदा. ए.ए. अरुण, ए.ए. संतोष. 'अल्कोहोलिक्स अनॉनिमस' संस्थेचे सदस्य ए.ए.संतोष सांगतात की, 'कोणत्याही व्यक्तिला मद्यपानाच्या आहारी जायचे नसते. कोणा व्यक्तिच्या मद्यपानाच्या सवयीमुळे त्या व्यक्तीचे कुटुंब, त्याचे कार्यालय तसेच त्याच्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती प्रभावित होत असते. विशेष म्हणजे त्याचे कुटुंब सर्वात जास्त प्रभावित होत असते. त्याला मनापासून त्याच्या कुटुंबाची काळजी वाटत असते, तसेच त्यांची होणारी होरपळ त्याला पाहावत नसते. मात्र तो मद्यपानाच्या सवयीच्या एवढा आहारी गेलेला असतो की, त्यावर तो स्वतः उपाय ही करू शकत नाही. असे अनेक लोक आमच्या संस्थेत येतात आणि येथे त्यांना मद्यपानापासून दूर राहण्यासाठी योग्य ते सहकार्य केले जाते. ज्या व्यक्तीला मनापासून दारू सोडायची आहे, ती व्यक्ती दारू सोडण्यात यशस्वी होते आणि आपले आयुष्य पुर्ववत जगू लागते. आमच्याकडे अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांनी दारुच्या सवयीपायी आयुष्याची अनेक वर्षे बरबाद केलेली असतात, त्यांची कुटुंबेदेखील उद्ध्वस्त झालेली असतात तसेच त्यांनी समाजातील आपली इभ्रत घालवलेली असते. मात्र आमच्या येथे आल्यानंतर ते लोक दारू सोडण्यात यशस्वी होतात शिवाय एक चांगले आणि समाधानी जीवन जगू शकतात. तसेच आपापल्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करतात.' 'अल्कोहोलिक्स अनॉनिमस' संस्थेत अशा अनेक मद्यपींना मोफत सहकार्य केले जाते. शिवाय संस्थेच्या ज्या बैठका होतात, त्यात एक किटी बॉक्स फिरवला जातो. त्या बॉक्समध्ये 'अल्कोहोलिक्स अनॉनिमस'चे सदस्य स्वखुशीने काही पैसे जमा करतात, त्यांच्या मदतीने संस्थेचा खर्च भागवला जातो, असे ए.ए. अरुण सांगतात. 'अल्कोहोलिक्स अनॉनिमस' संस्थेच्या या दारुमुक्तीच्या उपक्रमावर अभिनेता आमिर खानच्या 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमात विशेष भाग चित्रित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाच्या प्रसारणानंतर आमच्या संस्थेकडे मदत मागणाऱ्यांचा ओघ वाढत असल्याचे ते सांगतात. 'अल्कोहोलिक्स अनॉनिमस' संस्थेत आल्यानंतर हजारो लोकांना दारुपासून मुक्ती मिळाली असून, त्यांचे जीवन पूर्ववत सुरू झाले असल्याचे ए.ए. अरुण सांगतात. मद्यपानाची सवय सोडण्यासाठी झगडत असलेल्या लोकांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी http://www.aagsoindia.org/index.html या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा +९१-२२-६५२५५१३४ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन ते करतात.
यासारख्या आणखी काही कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा संबंधित :