कवितांना जागवणारा उपक्रम
कवितांना लोकप्रिय करण्यासाठी धडपडणा-या दोन युवतींची कथा
मनातल्या भावना प्रभावशाली पद्धतीनं व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे कविता. कमीत कमी शब्दांमध्ये कवितेच्या माध्यमातून आपल्याला विचार सर्वांच्या समोर ठेवता येतात. आपल्या देशातल्या शहरांमध्ये साहित्य, कला आणि थिएटरचा वेगाने विस्तार होत आहे. हे आपल्या संस्कृतीच्या विकासासाठी चांगले लक्षण मानले पाहिजे.
फेसबुकसारख्या समाजमाध्यमांमधून अनेक जण कविता सर्वांसमोर ठेवत असतात. त्याला लाईक्स आणि शेअरच्या माध्यमातून अनेकांची दाद मिळते. याचाच अर्थ कविता सांगणे-वाचणे, ऐकणे आणि ऐकवणे हे अनेकांना आवडते.लोकांमध्ये कवितेबद्दलची असलेली हीच आवड लक्षात घेऊन मुंबईमध्ये कवी क्लब सुरु करण्यात आला आहे. कवितांना उत्तेजन देण्यासाठी अंकिता शाह, आणि तृप्ती शेट्टी या युवतींनी एकत्र येऊन या क्लबची स्थापना केलीय.
तृप्ती आणि अंकिता या कॉलेजमध्ये मैत्रिणी बनल्या. अंकिता कॉलेजमधल्या वादविवाद आणि साहित्य मंडळाची संयुक्त सचिव होती. तर तृप्ती रौट्रॅक्ट क्लबमध्ये संपादक म्हणून काम करत होती. जून 2013 मध्ये दोघींनी एकत्र काम करण्याचे ठरवले. कविता आवडणा-या लोकांना एक हक्काचा मंच देण्याचे दोघींनी निश्चित केले. एक असा मंच ज्यावर लोकं आपल्या कविता दुस-यांना ऐकवतील आणि दुस-यांच्या कवितांचा आनंद लुटतील. याच उद्देशाने अंकिता आणि तृप्ती यांनी ‘ द पोएट्री क्लब’ची स्थापना मुंबईमध्ये केली.
क्लबचा उद्देश
कवितेचा विकास आणि त्याचा आनंद लुटणे हाच या क्लबचा उद्देश आहे. एखाद्या संस्थेंच्या काव्य स्पर्धेमध्ये केवळ कवींचीच गर्दी झालेली असते. पण पोएट्री क्लबमध्ये कोणतीही स्पर्धा नसते. या ठिकाणी केवळ कविता वाचली जाते आणि ऐकली जाते. सर्व अनुभवी आणि नवोदित कवींसाठी मंच तयार करण्याचा या क्लबचा उद्देश आहे. असा मंच जिथं केवळ सर्वांनी एकत्र येऊन कविता सांगाव्या आणि ऐकाव्यात. यासाठी भाषेचही कोणतंही बंधन ठेवण्यात आलेलं नाही. जो ज्या भाषेत लिहतो त्याच भाषेमध्ये कविता सांगायला या क्लबमध्ये परवानगी आहे. तसेच या क्लबमध्ये कोणतेही प्रवेश शुल्कही नाही. कवितेचा प्रसार व्हावा याच उद्देशानं हा क्लब स्थापन करण्यात आलेला आहे. त्यामुळे भविष्यातही असे प्रवेश शुल्क ठेवण्याचा आयोजकांचा विचार नाही. केवळ प्रत्येक कवी एकच कविता वाचू शकतो असा नियम या क्लबमध्ये आहे.
पोएट्री क्लबची संकल्पना विकसित होण्यासाठी एका-दोन मंडळींचा नाही तर अनेकांचा हातभार लागला आहे.वांद्रेमधील पिंट रुमने या कल्बच्या मासिक बैठका मोफत करण्यासाठी परवानगी दिली आहे. या क्लबच्या वाढत्या लोकप्रियतेची दखल अन्यत्रही घेतली जाऊ लागलीय. त्यामुळे आता अन्य संस्थांकडूनही त्यांना कार्यक्रम आयोजित करण्याचे आमंत्रणं मिळत आहेत. यापूर्वी अशा काव्य मैफिलींचं आयोजन हे एखाद्या कॅफे, पार्क किंवा मित्राच्या घरी होत असे पण आता हे चित्र बदलू लागलंय.
भविष्यातील योजना
केवळ कवी नाही तर सामान्य लोकांनीही कविता ऐकाव्या आणि त्याचा आनंद घ्यावा असे कार्यक्रम करण्याचा पोएट्री क्लबचा मानस आहे. त्याचबरोबर शाळा आणि महाविद्यालयामध्येही असे कार्यक्रम करण्याची या कल्बची योजना आहे. पुरेसा निधी नसल्याने सध्या फेसबुक आणि यू ट्यूब सारख्या समाजमाध्यमांमधून या क्लबचे प्रमोशन केले जाते. पण ज्या वेगाने या क्लबची विस्तार होतोय ते पाहता लवकरच आपल्याला संपूर्ण देशभर कवितांचा आवाज ऐकण्यास मिळू शकतो.