राजमोहन पिल्लई हे केवळ 'काजूचे राजाच' नाही तर खडतर आव्हानांचा सामना करणारे बुद्धिमान महाराजा सुद्धा आहेत

काजूचा राजा म्हणून प्रसिध्द असलेल्या राजमोहन पिल्लई यांचं जीवन साहस, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि लढवय्यावृत्ती यांचं एक अनोखं मिश्रण आहे. केरळच्या या व्यवसायिकानं अशा अनेक कठीण परिस्थितीचा सामना केला आहे ज्याचा आपण विचार सुध्दा करु शकत नाही किंवा जर विचार केला तर अंगावर काटे उभे राहतील. अशा परिस्थितींचा त्यांनी सामना केला आहे जिथे माणसाची स्वप्न विखुरतात. पावलोपावली अत्यंत खडतर परिस्थितीचा सामना करत राजमोहन पिल्लई यांनी आव्हानांचा सामना केला आहे. आणि विजय प्राप्त केला. राजमोहन पिल्लई यांनी ज्या पध्दतीनं यश मिळवलंय त्या यशाला अनेकजण चमत्कार मानतात. राजमोहन पिल्लई यांचे आजोबा, वडील आणि मोठे बंधू यांनी विविध व्यवसायात खूप प्रसिध्दी मिळवली मात्र काही दुर्घटना अशा घडल्या की हे सारं काही त्यांना गमवावं लागलं. करोडो रुपयांचा नफा कमवणाऱ्या त्यांच्या वडिलांच्या कंपनीचं दिवाळं निघालं. मोठ्या भावाला झालेला तुरुंगवास आणि तिथेच मृत्यू, त्यामुळं त्यांचं व्यावसायिक सामाज्य अवघ्या काही क्षणातच संपुष्टात आलं. या अत्यंत विपरीत परिस्थितीचा सामना करत राजमोहन पिल्लई यांनी धैर्य, साहस, समजदारी आणि विवेकशील वृत्तीनं केलेल्या कामाकडे आजही प्रेरणास्त्रोत म्हणून पाहिलं जातं.व्यावसायिक दुनियेत राजमोहन पिल्लई यांची प्रसिध्दी आणि लोकप्रियता यामुळे मानली जाते की त्यांनी आपल्या वडिलांचं कर्जच चुकवलं नाही तर आपल्या भावाच्या कंपन्यांना सुध्दा पुनर्रुजीवीत केलं. कुटुंबाला मानमर्यादा आणि संपत्ती परत मिळवून दिली. धैर्य, साहस आणि व्यावसायिकतेच्या गुणांनी समृध्द अश्या राजमोहन पिल्लई यांच्या यशाची गोष्ट फारच रोमांचक आहे. मानवी जीवनाला सार्थक आणि सफल बनवण्याचं सूत्र यांच्या या कहाणीत मिळतं. 

राजमोहन पिल्लई हे केवळ  'काजूचे राजाच' नाही तर  खडतर आव्हानांचा सामना करणारे बुद्धिमान महाराजा सुद्धा आहेत

Saturday July 02, 2016,

18 min Read


केरळच्या कोल्लममध्ये १२ मे १९६४ रोजी राजमोहन यांचा जन्म झाला अत्यंत श्रीमंत घरात जन्मलेल्या राजमोहन पिल्लई यांचं संगोपन मात्र श्रीमंतीत झालं नाही. त्यांचे वडील के जनार्दन यांनी त्यांचं संगोपन करताना ज्या गोष्टी शिकवल्या ज्यामुळे राजमोहन पुढे जाऊन आदर्श व्यक्तीमत्व बनले. राजमोहन पिल्लई यांची शाळा केरळची राजधानी त्रिवेंद्रम इथं होती. शाळेत ते भले नर्सरी कारने जायचे पण त्यांच्या खिशात एक रुपयाही नसायचा. त्यांच्या वडिलांचे नियम आणि कायदे काहीसे वेगळे होते. त्यात पॉकेटमनी न देणं हा ही एक नियम होता.

राजमोहन सांगत होते,”माझ्या शाळेत असे अनेक विद्यार्थी होते ज्यांचे आईवडील परदेशात राहायचे. तिथून ते या मुलांना पैसे पाठवत असत. मी मर्सिडीज कार मधून शाळेत जायचो पण माझ्या खिशात एक रुपया नसायचा यावरुन सर्व मित्र मला चिडवायचे. मला या गोष्टीचं दु:ख व्हायचं माझे मित्र जेव्हा शाळेबाहेर वडा खायचे, माझी सुध्दा ते खाण्याची इच्छा व्हायची, तेव्हा माझ्याकडे ते घेण्यासाठीचे पैसे नसायचे.”

image


वडिल यांना राजमोहन यांना पैसे द्यायचे असे नाही, पण ते द्यायचे ते फक्त चार कामांसाठी, पहिला अभ्यास, दुसरं टेनिस, तिसरं शहरातून बाहेर जाण्यासाठी आणि चांगल्या जागी रहायला आणि चौथं खेळाशी निगडीत कोणत्याही कामासाठी. मात्र त्यांच्या मित्रांकडे स्वत:चे शौक पूर्ण करण्याचे पुरेसे पैसे नेहमीच असायचे. राजमोहन मात्र आपल्या वडिलांच्या कडक नियमांमुळे एक वेगळंच बालपण जगत होते. करोडपती उद्योगपतींचा मुलगा असताना सुध्दा त्यांचे कपडे अत्यंत साधे असायचे. राजमोहन संपत्तीचा दिखावा करत नसत आणि वडील पैसे द्यायचे त्याचा पूर्ण हिशोब ठेवत असत.

image


वडिलांच्या या कठोर आणि विचित्र नियमांमुळे राजमोहन यांना राग सुध्दा येत असे. ते आपल्या वडिलांचा तिरस्कार करू लागले होते.

हे कमी होतं म्हणून की काय, राजमोहन यांच्या वडिलांनी त्यांना चौदाव्या वर्षीच व्यवसायाची गोडी लावली. वडिलांचे येणारे फोन कॉल्स घेण्याची जबाबदारी राजमोहन यांच्यावर सोपवण्यात आली. व्यवसायाच्या निमित्ताने त्याचे वडिल विविध लोकांसोबत बैठका करत असत त्याठिकाणी राजमोहन यांना थांबणं अनिवार्य करण्यात आलं होतं. ज्यावेळी त्यांच्या वयाचे मित्र मौजमस्ती आणि सहलींचा आनंद लुटत त्यावेळी राजमोहन आपल्या वडिलांनी दिलेल्या सुचनांचं पालन करत कामात व्यस्त राहत होते. किशोरावस्थेत प्रवेश करणाऱ्या मुलांना दिली जाणारी मुभा राजमोहन यांना नव्हती.

image


वडिलांनी राजमोहन यांच्यावर अनेकदा आव्हानात्मक कामगिरी सोपवली. राजमोहन यांना काजूच्या कारखान्यात पाठवण्यात आलं. तिथं त्यांना मजूरांसोबत काम करायला लागायचं, तिथंच त्यांच्यासारखं राहावं लागलं. एका मोठ्या उद्योगपतीचा मुलगा असूनही त्यांच्यासाठी विशेष सुविधा नव्हती. कारखान्यामध्ये सर्वांचं जेवण सारखंच असायचं. सर्वांना सर्वंच काम करायला लागायची अर्थात राजमोहन यांनाही.

राजमोहन यांना मजूरांबरोबर जमिनीवर झोपावं लागत असे. त्यांच्यासारखे कपडे घालावे लागत असत. काजूच्या गोण्या उचलण्यासाठी मजूरांना मदत करावी लागत असे. अचानक पाऊस आल्यावर सर्वांसोबत राहून काजूच्या गोण्यांना पाण्यापासून दूर ठेवावं लागत असे. कारखान्यात काम करणं सोपं नव्हतं. सर्वांसारखी मेहनत करावी लागत होती. तर या कामात धोके सुध्दा होते.

image


एकेदिवशी कारखान्यात जिथं राजमोहन झोपले होते तिथं एक नाग आला. राजमोहन थोडक्यात वाचले या घटनेची आठवण सांगताना ते म्हणतात,” मी कारखान्यात झोपलो होतो. माझ्या बाजूला एक नाग येऊन बसला होता. मला तर ते माहितच नव्हतं. कारखान्यातल्या मजूरांनी आणि व्यवस्थापकांनी ते पाहिलं आणि ते घाबरले. ते ओरडू शकत नव्हते किंवा त्या नागाला पळवू शकत नव्हते. त्यांना भिती वाटत होती सापाला जर छेडले तर तो मला चावेल. व्यवस्थापकानं अत्यंत हळू आवाजात मला उठवण्याचा आणि सावधान करण्याचा प्रयत्न केला मी डोळे उघडले तेव्हा चकित झालो तेव्हा तो नाग माझ्या बाजूला फणा काढून बसला होता. मी जरा जरी हललो असतो तर त्या नागाने दंश केला असता. मी सावकाश तिथून दूर झालो नाग काही वेळाने निघून गेला. त्यावेळी परिस्थिती अशी होती की मी घाबरलो असतो आणि हालचाल केली असती तर त्या नागाने निश्चितच दंश केला असता.” या घटनेनंतर सुद्दा राजमोहन यांना कारखान्यात जावंच लागलं.

image


वडिलांचे कठोर नियम आणि कामाच्या पध्दतीला समजण्यास राजमोहन यांना खूप वेळ गेला. ते म्हणतात,” वडिलांचे शिकवण समजण्याची प्रक्रिया होती ती खूप कठिण होती आणि खूप काळ सुरु होती. मला या गोष्टींचं आश्चर्य वाटायचं की मला शहरातल्या एका प्रसिध्द शाळेत शिकवलं जातंय. मर्सिडीज कारमधून शाळेत जाण्याची संधी मिळत असे. ताज सारख्या हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळत असे. महागडी आईस्क्रिम खायला मिळत असे पण पॉकेटमनी मिळत नसे. टेनिस खेळता येत असे, टेनिससाठी वेगवेगळ्या शहरात जायची संधी मिळत असे. अन्य मुलांसारखं पिकनिक किंवा इतर मौजमस्ती करण्यासाठी मी बाहेर जाऊ शकत नव्हतो. साधे कपडे मला का घालायाला लागायचे हे सुद्दा मला माहित नव्हतं. माझ्या वडिलांना माहित होतं की कारखान्यात कधीही काहीही होऊ शकतं. तिथं धोका होता आणि असं असताना सुध्दा त्यांनी मला कारखान्यात पाठवलं. पण मी ज्यावेळी स्वत: काम करायला लागलो तेव्हा माझ्या वडिलांची शिकवण समजली. खूप वर्षांनंतर मला समजलं की माझ्यासाठी हे नियम का बनले होते.”

image


राजमोहन सांगत होते की हे वेगळ्यापध्दतीचे संगोपनच त्यांच्या यशस्वी कारकिर्दींत उपयोगी पडलं. ते म्हणाले “ दहावीच्या सुट्टीत मला वडिलांनी व्यवसायात खेचलं. लोकांचे फोन उचलण्याचा मला खूप फायदा झाला. लोकांशी संवाद साधण्याची योग्य पध्दत मला समजली. वडिलांच्या व्यावसायिक बैठकांमध्ये उपस्थित राहिल्यानं मला लहानपणीच समजलं की आमच्या कुटुंबाचा व्यवसाय किती विस्तारलेला आहे.”

image


अत्यंत लहान वयातच राजमोहन यांना व्यवसायाचं प्रशिक्षण मिळालं. कुटुंबाच्या व्यावसायिक योजना कोणत्या आहेत आणि त्यावर कसं काम केलं जातं. याची सुध्दा त्यांना लहानपणीच माहिती मिळाली.

वडिलांच्या नियम आणि कायद्यामुळे राजमोहन यांना प्राथमिकता म्हणजे काय याची शिकवण मिळाली. राजमोहन म्हणतात “ मला खूप वर्षांनंतर समजलं की वडिलांचे नियम हे मला माझी प्राथमिकता ठरवण्यासाठी होते. जेव्हा मी माझं काम सुरु केलं त्यावेळी माझं पहिलं काम होतं की मी आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करणं. अनावश्यक गोष्टींना मी टाळत असे. वडिलांकडून जे मी शिकलो होतो त्यामुळे मी आपल्या मित्र परिवारापेक्षा वेगळाच नाही तर त्यांच्याही खूप पुढे होतो. ज्या गोष्टी मी लहानपणी शिकलो त्या गोष्टी माझ्य़ा मित्रांनी अनेक वर्षांनंतर शिकल्या. वडिलामुळे व्यवसायाशी संबंधीत अनेक गोष्टी शिकलो. लहानवयात अनेक अनुभव घेतले. मला आव्हानंही समजली आणि त्यांचा सामना कसा करायचा याची पध्दतही समजली. चांगले-वाईट सर्वच दिवस मी लवकर पाहिले. तीस वर्षांपर्यत मी जे शिकलो जे समजण्यासाठी माझ्या मित्रांना चाळीस वर्षे लागली याचा अर्थ मी माझ्या मित्रांपेक्षा दहा वर्षांनी पुढे होतो.”

राजमोहन यांचे मोठे भाऊ राजन पिल्लई

राजमोहन यांचे मोठे भाऊ राजन पिल्लई


वडिलांच्या संगोपनाचं वैशिष्ट म्हणजे राजमोहन सिगरेट, पानमसाला अशा व्यसनांपासून दूर राहिलो आणि याच संगोपनानं राजमोहन पिल्लई यांना एक व्यापक विचारधारा दिली. राजमोहन पिल्लई म्हणतात, “ तुम्ही कोणत्या पेनानं परीक्षा लिहताय हे महत्त्वातचं नाही, तर महत्त्वाचं असतं तुम्ही काय लिहलंय, त्या परिक्षेत यशस्वी झालात की नाही. टेनिस खेळताना तुम्ही कुठले कपडे घातलेत हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्याला कसं हरवलं. मी लहानपणी शिकलो की दिखावा करुन काही साध्य होत नाही तर आत्मसंतुष्टी गरजेची असते.” राजमोहन यांच्या वडिलांनी त्यांना चांगली शिकवण देण्यात कुठेच कमतरता केली नाही. ज्यामुळे राजमोहन लहानपणापासून चांगल्या वाईटाची परीक्षा करु शकले.

image


कठोर प्रशिक्षणानंतर राजमोहन यांना व्यवसायात मोठी जबाबदारी देण्यात आली. राजमोहन या जबाबदारीला आपल्या आयुष्यातली पहिली कामगिरी मानतात. या कामगिरी अंतर्गत राजमोहन यांना ओरीसातल्या विविध गावांमध्ये कच्चे काजू खरेदी करण्यासाठी जावं लागत असे. अनेक किलोमीटरचा प्रवास करुन विविध लोकांना भेटावं लागत असे. फक्त ओरीसाच नव्हे तर काजू खरेदी करण्यासाठी त्यांना पश्चिम बंगलामध्ये सुध्दा जावं लागत असे. राजमोहन यांना त्या त्या प्रांताची भाषा येत नव्हती मात्रं सखल जनांशी सन्मानने वागावे या शिकवणीनुसार ते लोकांना भेटत असत. या तरुण व्यावसायिकाच्या व्यवहाराची पध्दत अनेक शेतकऱ्यांना आवडली आणि ते अनेक शेतकऱ्यांना आवडू लागले. ओरीसा आणि बंगालच्य़ा या व्यवसायिक यात्रांदरम्यान राजमोहन यांनी अगदी स्थानिक पातळीवरील व्यवहाराची माहिती मिळाली. अत्यंत कमी वेळात त्यांनी या प्रदेशातल्या व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसोबत चांगले संबंध बनवले. राजमोहन ओरीसातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये थोड्याच दिवसात प्रसिध्द झाले. त्यांच्या प्रसिध्दीचं द्योतक म्हणजे आजही ज्या ठिकाणी त्यांचं मोठं गोदाम आहे, याच ठिकाणी त्यांना स्थानिक व्यापारी आणि कामगार भेटत असत त्या बसस्टॉपचं नाव राजमोहन जंक्शन आहे. ओरीसा आणि बंगाल मधल्या काजू खरेदीचा अनुभव सांगताना ते म्हणतात, “ हा अतिशय रोमांचक अनुभव होता. त्यावेळेला गावचे सरपंच काजू कुणाला विकले जाणार याचे निर्णय घ्यायचे त्यामुळे या सरपंचांना आपलं करणं हे जिकरीचे काम होते. त्यावेळचे सरकारी नियम व्यावसायिकांसाठी अत्यंत कठिण होते. मी लहानपणीच शिकलो होतो की लोकांशी कसं वागायचं त्यामुळे हा अनुभव माझ्या कामी आला आणि मग लवकरच शेतकरी सुध्दा माझ्यासोबत व्यवहार करु लागले.”

image


पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर राजमोहन यांना परदेशात पाठवण्यात आलं. परदेशात काम करताना राजमोहन यांना नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. राजमोहन आधी ब्राझिलला गेले आणि तिथं अमेरिकेतल्या खाद्य उद्योगातली सर्वात मोठी कंपनी नविस्को इथं काम करायला सुरुवात केली. काही काळासाठी राजमोहन यांनी इंग्लंडमध्ये सुध्दा व्यवसाय केला.

ब्राझिलमध्ये काम करताना राजमोहन यांच्यावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव पडला. त्यांनी जणू काही डाव्या विचारधारांचे अनुकरण करायला सुरुवात केली, ते सुध्दा ज्या सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात होते जिथं काही मोजके लोक श्रीमंत आणि बहुतांश लोक गरीब होते. श्रीमंत गरीबीचा हा भेदभाव मिटवण्याचं उद्दीष्ट हाती घेऊन ते भारतात परतले आणि हे उद्दीष्ट त्यांची एक प्राथमिकताच बनली.

image


भारतात परतल्यानंतर आपल्या या क्रांतीकारी विचारांना वडिलांसमोर मांडलं त्यावेळी वडिल आश्यर्यचकीत झाले. डाव्या विचारसरणीवरुन त्याचे वडील आणि त्यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. राजमोहन यांच्या मते त्यांच्या कुटुंबातल्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या मजूरांचं वेतन कमी आहे आणि तो वाढवून द्यावं अशी मागणी त्यांनी केली. नवनवा उत्साह असणाऱ्या राजमोहन यांना समजावणं आणि या कठिण परिस्थितीचा सामना करण्यासाठी राजमोहन यांच्यावर एक कामगिरी सोपवली. वडिलांनी राजमोहन यांना त्यांचे डावे विचार खरोखरच व्यवहार्य आहेत का हे तपासून पाहण्याची संधी दिली. त्यांच्या वडिलांनी एक सॉफ्टड्रींकचा कारखाना त्यांच्या हवाली केला आणि त्याठिकाणी आपल्या विचारधारेनुसार काम करण्यास सांगितलं.

image


त्या दिवसांमध्ये थम्सअप, लिंम्का आणि गोल्डस्पॉट बनवण्याचं कंत्राट मिळालं होतं आणि त्यासाठी त्यांच्याकडे या सॉफ्टड्रींकचा कारखाना होता तिथं बेचाळीस कामगार काम करत होते. वडिलांनी राजमोहन यांना या कारखान्याची जबाबदारी सोपवली आणि सांगितलं की जर त्याचं उद्दीष्ट पूर्ण झालं तर कंपनी त्यांची अन्यथा त्यांना वडिलांच्या सर्वगोष्टी मान्य कराव्या लागतील. राजमोहन यांनी वडिलांच्या अटी मान्य केल्या.

नव्या जोशात आणि उत्साहात राजमोहन यांनी बेचाळीस कामगारांसोबत आपलं काम सुरु केलं. हा कारखाना यांत्रिक होता. त्यामुळे कामगार कमी होते. दुसरीकडे त्यांचे वडील ५० हजार कर्मचाऱ्यांची जबाबदारी संभाळत होते.

image


कारखान्याच्या कामकाजाची जबाबदारी आल्यावर राजमोहन यांनी डाव्या विचारसारणीची अंमलबजावणी करायला सुरुवात केली. नवीन अनुभव मिळवण्याची चांगली संधी त्यांना मिळाली. कारखाना संभाळायला सुरुवात केल्या केल्या त्यांनी कर्मचाऱ्यांचा पगार तीन पटीनं वाढवला. कर्मचाऱ्याचं वेतन सात रुपये रोज होतं. ते एकवीस रुपये रोज करण्यात आलं. हा पगार वाढवताना राजमोहन यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं की कारखान्याच्या एकूण क्षमतेपैकी फक्त बेचाळीस टक्के काम होतंय. ते साठ टक्के करण्याचं उद्दीष्ट कामगारांना देण्यात आलं. साठ टक्के काम म्हणजे ब्रेक इवन म्हणजेच जेवढे पैसे लावलेत तेवढे उत्पादन करणं. या कारखान्यात वडिलांनी तीन कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. राजमोहन यांना आशा होती की पगार तीन पटीनं वाढवल्यानंतर कामगार मोठ्या उत्साहात काम करतील आणि कारखान्यासाठी लावलेले पैसे तरी कमवता येतील. पण पगार वाढल्यानंतर केरळातल्या ओनम उत्साहाचं कारण पुढे करत कामगारांनी पुन्हा पगारवाढीची मागणी केली. राजमोहन यांनी ही मागणी धुडकावून लावली. नऊ महिन्यापुर्वीच पगार वाढला होता. त्यानंतर उत्पादन तर वाढले नव्हतेच शिवाय पगारवाढीमुळे नुकसानीत वाढ होत होती. पण कामगार आपल्या मागणीवर ठाम होते. त्यांचं म्हणणं होतं की जेवढा राजमोहन यांचा कारखान्यावर अधिकार आहे तेवढाच कामगारांचा. या सर्व प्रकाराचा राजमोहन यांना धक्का बसला. त्यांनी ठरवून टाकलं की ते कामगारांचा पगार अजिबात वाढवणार नाही.

कामगारांनी काम बंद केलं. कारखाना बंद झाला. तोडफोडीच्या घटनाही घडल्या. तिथली परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललेली होती. यावेळी राजमोहन यांच्या वडिलांनी त्यांना आपल्याकडे बोलवून घेतलं. या समस्ये बद्दल त्यांनी राजमोहन यांना एकाही शब्दानं विचारलं नाही. हे असं वागणं राजमोहन यांच्यासाठी एक शिकवण होती.

संप सुरु होता. कामगाऱ्यांच्या नेत्यानं राजमोहन यांना निरोप पाठवला की चर्चेनं समस्येवर तोडगा काढावा. वडिलांनी सामजस्यानं बोलणी करुन तोडगा काढायला संमती दिली. त्यांना आपल्या कार्यालयात बोलावलं. कामगार नेत्यानं तीस रुपये रोज देण्याची मागणी केली. वडिलांनी सांगितलं की नुकसान होत असल्यानं पगार वाढवू शकत नाही. पण कामगार आपल्या मागणीवर अडून होते. चर्चेतून काहीच मार्ग निघाला नाही. हे सर्व घडत असताना राजमोहन तिथेच होते. त्यांनी तोंडातून एकही शब्द काढला नाही. कामगार निराश आणि नाराज होऊन परतले.

image


काही दिवसांनी कामगाऱ्यांच्या नेत्यांना पुन्हा निरोप आला. त्यांना पुन्हा चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रस्ताव ठेवला. वडिलांनी पुन्हा त्यांना आपल्या कार्यालयात बोलावलं. यावेळी ही राजमोहन त्यांच्या सोबत होते. पण ते गप्पच होते. वडिलांनी अचानक दहा हजार रुपयांच्या नोटा टेबलावर ठेवल्या. बातचीत सुरु असताना त्या कामगार नेत्याचं लक्ष या दहा हजार रुपयांकडे होतं. व़डिलांनी सांगितलं की पैसे वाढवण्याचा प्रश्नच येत नाही. कामगारांना रोज दहा रुपये रोज प्रमाणे पैसे मिळतील. यावर कामगार नेता घाबरला जर तुमचा हा निरोप घेऊन मी कामगारांकडे गेलो तर ते मला मारुनच टाकतील असं तो म्हणाला. यावेळी मग वडिलांनी टेबलावरचे दहा हजार रुपये एकत्र करण्यास सुरुवात केले. कामगार नेत्याचा चेहरा फिका पडला. तो दहा रुपयांपेक्षा जास्त रोज मागू लागला. शेवटी पंधरा रुपये रोज असा नवीन तोडगा वडिलांनी सांगितला. ते मान्य करत कामगार नेत्यानं दहा हजार रुपयांचं पाकीट उचललं आणि तो निघून गेला.

राजमोहन यांच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का होता. पुस्तकी ज्ञान आणि व्यवहार यांच्यातलं अंतर किती मोठं आहे हे ते अनुभवत होते. विचारधारेची नाचक्की झाली होती. पण ते शांत होते. वडिलांनी आयुष्यातला आणखी एक धडा नव्यानं शिकवला होता. दुसऱ्या दिवशी कामगारांनी आपला संप मागे घेतला. तोही मोठ्या जल्लोषात.

या सर्व घटनांनी राजमोहन हैरान झाले होते. राजमोहन यांच्यासाठी हा आश्चर्याचा विषय होता की कामगार नेत्याची नजर कामगारांच्या हितापेक्षा नोटांच्या पुडक्यावर होती. राजमोहन यांच्यासाठी हे रहस्य राहिलं की कामगार नेत्यानं कर्मचाऱ्यांना संप मागे घ्यायला कसं काय भाग पाडलं. त्यांना हे समजत नव्हतं की जिथं एकवीस रुपये मिळत होते तिथे पंधरा रुपयांवर काम करायला ते कसे तयार झाले. मात्र राजमोहन यांना हे समजलं कामगारांना योग्यतेशिवाय अधिक पैसे देणं चुकीचं आहे. कामगारांना चुकीच्या वेळी आणि योग्यतेपेक्षा जास्त देणं ही एक चुक आहे. राजमोहन यांना कळलं की पगार वाढवला याचा अर्थ असा नव्हे की कामगार मेहनत करतील. कामगारांकडून काम करुन घेण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. सरसकट आणि योग्यतेपेक्षा जास्त पगार वाढवून देण्यापेक्षा कामगारांच्या कुटुंबियांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा देणं अधिक योग्य आहे. राजमोहन म्हणतात, “या कारखान्यातल्या घटनेनं एक मोठा धडा शिकवला. कर्मचारी आणि कामगारांकडून काम करुन घेण्यासाठी एक प्रकारची मालकशाही गरजेची आहे. आणि ही गोष्ट माझ्यासाठी सर्वात मोठा धडा होती.”

राजमोहन यांना आपल्या वडिलांमुळे व्यवसायाचे मुळ नियम शिकण्यास मदत मिळाली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वडिलांची दूरदृष्टी आणि वडिलांनी सोपवलेली जबाबदारी यामुळे अगदी लहानपणापासून त्यांच्यावर व्यवसायाचे संस्कार रुजले गेले.

राजमोहन यांनी आपल्या वडिलांशिवाय अन्य लोकांकडून सुध्दा खुप धडे घेतले. व्यावसायिक असल्यानं ते अनेक ठिकाणी अनेक लोकांना भेटायचे. देश विदेशातले अनेक व्यवसायिक, कामगार, मजूर, शेतकरी आणि अन्य क्षेत्रातल्या लोकांना सुद्दा ते भेटत असत. प्रत्येक भेटी दरम्यान नवीन काही तरी शिकण्याची इच्छा त्यांच्यात होती. राजमोहन म्हणतात, “ वडील आयुष्यभर शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून राहू शकत नाही. मी ज्या लोकांना भेटायचो त्यांच्या अनुभवातून बरंच काही शिकायचो. आज सुध्दा मी हे असंच शिकतोय.”

image



पुढे त्यांच्या वडिलांच्या व्यवसायात मोठं नुकसान झालं. व्यवसाय करणारे आणि नफा कमवणारे म्हणून प्रसिध्द असलेल्या त्यांच्या वडिलांच्या कंपनीचं दिवाळं निघालं. त्याचं असं झालं की रशिया आणि भारतादरम्यान एक करार होणार होता. मात्र काही कारणास्तव दोन्ही देशांमध्ये हा करार झाला नाही. तो न झाल्यानं रशियानं राजमोहन यांच्या वडिलांकडून काजू खरेदी केले नाहीत. मात्र काजू खरेदीचा करार झाला होता. देशांतर्गत समझोता न झाल्यानं रशियानं राजमोहन यांच्या वडिलांकडून काजू खरेदीला नकार दिला. रशियाला विकण्यासाठी आणलेले काजू आता वाया गेले होते. रशिया आणि भारतात करार न झाल्यानं स्थानिक बाजारातही काजूचे भाव गडगडले. ज्यामुळे राजमोहन यांच्या वडिलांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. १९८२ सालची ही गोष्ट.

याचवेळी राजमोहन यांच्या वडिलांना हृद्यविकाराचा झटका आला. त्यांची तब्बेत खालावली. इतकी खालावली की त्यांना व्यवसाय सांभाळणं कठिण गेलं. नुकसान झाल्यामुळे कुटुंबाच्या प्रतिष्ठेलाही तडा गेला. त्यांच्या वडिलांवरती तब्बल दहा दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढं कर्ज झालं. ही मोठी रक्कम होती. त्यावेळी मोठ्यात मोठ्या व्यवसायिकांसाठीही ही रक्कम मोठी होती. आजारपणामुळे वडिल आता व्यवसाय सांभाळू शकत नव्हते. आईने कर्ज परतफेडीची जबाबदारी राजमोहन यांच्याकडे सोपवली. अठरा वर्षांच्या राजमोहन यांच्यावर हे भल्लमोठं कर्ज फेडण्याची जबाबदारी होती.

वडिलांच्या शिकवणीत राजमोहन चांगलेच तयार झाले होते. कोणत्याही परिस्थितीत हरायचं नाही हे ते शिकले होते. आयुष्यात आलेल्या या सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करण्यासाठी ते सज्ज झाले.

कर्ज प्रचंड होतं. लोकांचे खूप पैसे द्यायचे होते. इंडियन ओवरसीस बँकेने कायदेशीर प्रक्रिया सुरु केली. पण त्यांनी पराभव स्विकारला नाही. त्यांनी थोडं थोडं करुन कर्ज चुकवायला सुरुवात केली. या छोट्या रकमांचे कर्ज परतफेड केल्यानं बँकेनं नाराजी व्यक्त केली. त्यांनी बँकेसमोर एक पर्याय ठेवला की विश्वास ठेवा किंवा मग ते व्यवसाय बंद करु शकतात. बँकेने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि बँकेचे पैसे हळूहळू परत करणं सुरु ठेवलं.

image


राजमोहनसाठी हा काळ खूप कठिण होता. १९८७ ते २००७ या कालावधीत त्यांचा पूर्ण वेळ व्य़वसाय करण्याबरोबरच हे कर्ज फेडण्यावर जात होता. पण ते खचले नाहीत आपलं काम करत राहिले. नुकसानीत गेलेल्या व्यवसायाला पुन्हा नव्यानं उभारण्याचे सर्व प्रयत्न ते करत होते. त्यांना आता यशही यायला लागलं होतं. नवीन आशेचा किरण दिसायला लागला होता. पण त्याचवेळी त्यांना आणखी एक झटका बसला. त्याचे मोठे भाऊ राजन पिल्लई यांच्या विरोधात सिंगापूरमध्ये गुन्हा दाखल झाला. राजन पिल्लई मोठे व्यापारी होते. त्यांचा व्यवसाय देशविदेशात पसरला होता. सिंगापूरमध्ये त्यांचं बिस्किट व्यवसायात मोठं नाव होतं. त्यांना बिस्किट किंग म्हणून ओळखलं जायचं. सिंगापूरमध्ये गुन्हा दाखल झालेला असताना ते कसेतरी भारतात परत आले. पण जास्त दिवस अटक रोखू शकले नाहीत. त्यांना अटक करुन तिहार मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलं. तिथंच त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्य अगदी रहस्यमय होता. १९९५ मध्ये राज पिल्लई यांच्या मृत्यूनंतर राजमोहन यांच्या समस्या आणखी वाढल्या.

घराची प्रतिष्ठा अजूनही पणाला लागलीच होती. याचवेळी त्यांना आणखी एक झटका लागला. सर्व कर्मचारी कंपनी सोडून जायला लागले होते. कामगार आणि मजूरांना असं वाटत होतं की या मोठ्या झटक्यातून पिल्लई परिवार पुन्हा कधीच उभा राहू शकत नाही. जुन्या आणि विश्वासू कामगारांनी सुध्दा कंपनी सोडली. नातेवाईक आणि मित्रांनी हळूहळू पाठ फिरवली.

दृढनिश्चयी असलेले राजमोहन या कठिण परिस्थितीतही तटस्थ राहिले. मानसिक संतुलन न ढळू देता स्वत:ला पहाडासारखं मजबूत बनवलं. आपल्या व्यवसायाला पुनरुज्जीवन देण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले. आपल्या साहस आणि व्यवसायातली पारखी नजर या गुणांच्या बळावर त्यांनी वडिलांच्या सर्व कर्जाची परतफेड केली. एवढंच नव्हे तर आपल्या कुटुंबाच्या व्यवसाय़ाला सुद्दा पुनरुज्जीवन दिलं. आणि या व्यवसायामध्ये सुध्दा नफा खेचून आणला. त्यांनी आपल्या कुटुंबाची पुर्वापार जपलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवून आणली.

मोठ्या भावाच्या मृत्यूमुळे निर्माण झालेल्या परिस्थिती बद्दल ते सांगतात, “कोणत्याही व्यापाऱ्यांचं मुळ हे प्रतिष्ठा असते. भावाला झालेली अटक आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू यामुळे आमच्या प्रतिष्ठेला धक्का बसला होता. आमचे ग्राहक आमच्यापासून दूर गेले होते. जुने विश्वासू सहकारी सोडून चालले होते. वडिलांचे कर्ज चुकवणं बाकी होतं आणि व्यवसायात नुकसान होऊ लागलं होतं. अत्यंत कठिण काळ होता. माझ्या वडिलांच्या कंपन्याचं दिवाळं निघाल्यानंतर प्रक्रिया पुन्हा सुरु करावी लागली. मला दुप्पट वेगानं काम करावं लागलं आणि मेहनतही दुप्पट करावी लागली.”

राजमोहन यांच्या मेहनतीचं फळ अखेर त्यांना मिळालं. आणि हे छोटं मोठं यश नव्हतं तर खूप ऐतिहासिक यश होतं. कित्येक वर्ष काम केल्यावर त्यांना दहा दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचं कर्ज फेडता आलं होतं. यश फक्त हेच नब्हतं तर दुसरीकडे त्यांनी आपल्या कुटुंबाच्या व्यवसायांना पुर्वपदावर नेऊन पोचवण्याची किमया सुध्दा करुन दाखवली होती. या सर्व यशाच्या मागे अजून एक मोठ यश दडलं होतं. ज्याची त्यांना अजिबात कल्पनाच नव्हती. मात्र त्यांची मेहनत, साहस धैर्य या बळावर त्यांना आश्चर्याचा मोठा सुखद धक्का मिळणार होता.

राजमोहन पिल्लई यांनी इंडियन ओवरसीस बँकेचं कर्ज फेडल्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांची मालमत्तेसंदर्भातले दस्तावेज परत केले जे कर्जासाठी तारण ठेवण्यात आले होते. हे दस्तावेज मिळाल्यानंतर राजमोहन यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. कारण या मालमत्तेची किंमत कोटीं रुपयांमध्ये होती. कर्ज फेडण्यासाठी त्यांना २७ वर्ष लागली होती. आणि इतक्या वर्षात या मालमत्तेची किंमत कित्येक पटीनं वाढली होती. अचानक एकाच दिवसात राजमोहन पिल्लई एक दिवाळखोर व्यवसायिक ते नफा कमवणारे व्यवसायिक असा बदल घडला.

या क्षणाची आठवण करताना राजमोहन सांगतात, “ मी कधी विचारच केला नव्हता की एका दिवसात असा बदल घडेल. माझ्यासाठी हा चमत्कारच होता. पण मला लवकरच समजलं की हा चमत्कार एका दिवसात घडलेला नाही. या चमत्कारामागे अनेक वर्षांची मेहनत आहे. मी जर मेहनत केली नसती, कर्ज चुकवलंच नसतं तर हे सर्व मला मिळालंच नसतं. तसंही मला या मालमत्तेच्या कागदपत्राविषयी मला काहीच माहित नव्हतं. मी माझं काम करत गेलो आणि ते संपलं तेव्हा माझ्या मेहनतीचं फळ हे या स्वरुपात मिळालं.

आपल्या संघर्ष आणि यशाची कहाणी सांगताना राजमोहन म्हणतात, परिस्थिती बदलत असते आणि या बदलेल्या परिस्थितीसोबत येतात नवीन आव्हानं. प्रत्येक आव्हान हे त्या त्या वेळेचं सर्वात मोठं आव्हान असतं. मी सुरुवातीपासून हेच मानत आलोय की जर निसर्ग आपल्याला कुठलंही आव्हान देतो तर ते आव्हान पूर्ण करण्याचं बळ सुध्दा देतो. वडिलांचं कर्ज परत करणं आणि कुटुंबाचा व्यवसाय वाचवणं यावेळी मला वाटलं की निसर्गच काहीना काहीतरी उत्तर शोधून देईल आणि मी समस्या सोडवण्याचं एक निमित्त मात्र आहे.”

राजमोहन हे जगातल्या अनेकांचे आदर्श आहेत ते दोन कारणांसाठी. एक आपल्या वडिलांचं भलं मोठं कर्ज त्यांनी चुकतं केलं आणि दुसरं म्हणजे मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर आलेल्या संकटाला मात देत आपल्या कुटुंबाचा व्यवसाय पुनरुज्जीवीत करण्यासाठी. याबाबत राजमोहन म्हणतात, लोकांना असं वाटतं की माझ्यावर ही मोठी दोन संकट आली. पण त्यांना माहीत नाही की मी किती आव्हानांचा सामना केला आहे. हजारोवेळा आव्हानांना सामोरं गेलो आहे. विविध चिंतांनी मला पोखरलेलं होतं. वेगवेगळ्या वेळेची प्राथमिकता वेगळी होती. अनेकवेळा मी करोडो रुपयांच्या व्यवसायाऐवजी माझ्या बायको विषयी विचार केला. माझा मुलगा आजारी पडला तर माझं सर्व लक्ष त्याच्यावर केंद्रीत व्हायचं. कधी एखाद्या मित्राशी झालेल्या वादाचं निराकरण कधी होतंय याची मी वाट पहायचो. लोकांना हे सर्व माहित नाही. ते फक्त दोन महत्त्वाच्या गोष्टींसाठी मला ओळखत. पण येणारा नवीन दिवस नव्या संघर्षाला घेऊन येतो.”

राजमोहन भारतातल्या सुप्रसिध्द व्यापाऱ्यांपैकी एक आहेत. ते बीटा ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची ही कंपनी देशविदेशात व्यवसाय करत आहे आणि करोडोंनी नफा कमवत आहे. त्यांचा मुळ व्यवसाय हा काजू विकणे हाच होता. त्यांना काजूच्या व्यवसायातून सर्वाधिक कमाई होते. ते संपूर्ण जगात ‘काजूचा राजा’ या नावाने ओळखले जातात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत समस्यांवर मात करत आव्हानांचा सामना करत लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं. भंगलेल्या स्वप्नांना पुनश्च जोडणं एक मोठा उद्योग समुह उभा करणं ही राजमोहन यांची कहाणी आज जगभरात प्रसिध्द आहे.

त्यांचा बीटा उद्योग समुह केवळ काजू आणि फुड प्रोसेसिंगच नाही तर इतर क्षेत्रात विखुरला आहे. बीटा उद्योग समुहानं दोन अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत आपला विस्तार केलाय. फुड प्रोसेसिंग, मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग आणि वितरणामध्ये त्यांची स्थिती मज़बूत आहे. इंटरटेनमेंट लाॅजिस्टिक्स आणि कंस्लटिंग या क्षेत्रात त्यांचा व्यापार पसरलेला आहे. अत्यंत कठिण परिस्थिती असताना राजमोहन यांनी दाखवलेलं धैर्य हे कोणत्याही सामान्य माणसाच्या आकलना पलिकडचं आहे. राजमोहन यांच्या दृढनिश्चयामुळेच त्यांना पूर्ण उर्जेनिशी उभं राहता आलं.

राजमोहन यांच्याशी निगडीत आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांचं राहणीमान अत्यंत साधं आहे. ते दिखावा करत नाहीत. सर्वांशी चांगलंच वागतात आणि माणसांमध्ये भेदाभेद करत नाहीत. ते मानवी भावभावनांना महत्त्व देतात. त्यांचं एक वैशिष्ट हेही आहे. कोणतीही परीस्थिती असो ते स्वत:चं संतुलन ढळू देत नाहीत. ते शांतचित्तानं राहतात. राजमोहन सांगतात “ हे सुद्दा मी माझ्या वडिलांकडूनच शिकलो आहे. आनंद असो किंवा मोठं संकट असो. या दोन्ही वेळेला ते शांत चित्ताने असायचे. वेळ आणि परिस्थितीनुसार त्यांच्या स्वभाव बदलायचा नाही. ते स्वत:ला नियंत्रित ठेवत. ते नेहमीच साधं जीवन जगले आणि हा साधेपणा त्यांनी टिकवून ठेवला.”

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

सारे काही उध्वस्त झाल्यावरही उभारले नवे विश्व ‘ सब रेंट करो डॉट कॉम’ च्या राज शिवराजू यांची कथा

जिंकण्यासाठी विकास शाह यांनी आव्हाने नुसती पेललीच नाही तर ती मनापासून स्वीकारली

कृषी क्षेत्रात क्रांतीची सुरवात करणारे सुभाष मनोहर लोढे यांनी कधीकाळी रस्त्यावर विकली होती घड्याळं

    Share on
    close