स्वतःच्या शिक्षणाकरता २०० रुपयांची याचना करणारी महिला, आज दुर्लक्षित घटकातल्या १४ हजार मुलांच्या स्वप्नांना खतपाणी घालते आहे
“मला महाविद्यालयीन शिक्षणाकरता २०० रुपये हवे होते. त्याकरता मी आणि माझी आई चित्तूरला (आंध्रप्रदेश) एका नातेवाईकाकडे गेलो. आमची परिस्थिती चांगली असताना माझ्या बाबांनी त्यांना खूप मदत केली होती. त्यांची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारलेली होती. ८० च्या दशकात एका गावाहून दुसऱ्या गावी जाणं आत्ता एवढं सोप अजिबात नव्हतं. एवढ्या प्रवासानंतर माझ्या हाती फक्त ५० रुपयेच लागले होते. मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. मी मनाशी पक्क केलं यापुढे कोणाकडे कधीही काहीही मागणार नाही. मला जे काही करायचंय ते माझ्या हिंमतीवरच मी करणार”.
जॉय श्रीनिवासन दहा वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांना व्यवसायात नुकसान होऊ लागलं. अखेरीस हा व्यवसाय बुडीत गेला. त्यांच्या घरी नियमित येणाऱ्या लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. मुलांनी एखादी वस्तू मागितल्यावर लगेचच त्यांच्यापुढे पूर्वी हजर व्हायची. पण परिस्थिती एवढी बदलली की त्यांना शाळेची फी भरणंही मुश्कील होऊ लागलं. आपलं शिक्षण चालू ठेवण्याची जॉयने वडिलांना विनंती केली. त्या जुन्या आठवणी सांगताना भारावून जातात. त्या सांगतात, “७० च्या दशकात मुलींच्या शिक्षणाकडे फारसं लक्ष दिलं नाही जायचं. पण माझ्या बाबांनी माझं म्हणणं मान्य केलं आणि मला शाळेत जाऊ दिलं. माझ्या मैत्रिणींप्रमाणे मी कॉन्व्हेंटमध्ये नाही गेली. पण मी शाळेत गेले”.
वडिलांच्या परिस्थितीमुळे शालेय शिक्षण पूर्ण करता येणार नाही असं जॉयला घरच्यांकडून सतत सांगितलं जायचं. पण नातेवाईकांच्या घरच्या अनुभवाने जॉयच्या मनातली शिक्षणाची ठिणगी पेटून उठली.
१९८८ मध्ये बीकॉम झाल्यावर जॉयने नोकरी करायला सुरूवात केली. नोकरी करत असल्यामुळे हातात काही रक्कम मिळत होती. त्या बळावर त्यांनी पुढचं शिक्षण घ्यायचं ठरवलं. इंडियन सोसायटी फॉर अप्लाइड बिहेविरल सायन्सच्या सदस्या आहेत. तसेच त्यांनी मय्यम महिला नेतृत्व प्रशिक्षक आणि अमेरिकन वायर मेरिल असोसिएट्सची पदवी मिळवली आहे.
जॉय म्हणतात, “या सगळ्या प्रवासात मला एक कळून चुकलं की, माझ्यासारख्या गरिब घरांतल्या मुलांना त्यांची स्वप्न साकार करणं अशक्य नाहीये. परिस्थितीला बळी न पडता खंबीरपणे उभे राहून लढा दिला पाहिजे. ज्ञानार्जन आणि जागरुकतेच्या बळावर परिवर्तन नक्की घडून येतं”.
मक्कळा जागृती
यशस्वी करिअरमधून वेळ काढत, जॉय अल्प उत्पन्न गटातल्या मुलांच्या शिक्षणाकरता पैसे आणि वेळ दोन्ही खर्च करतात. त्यांच्या घरची मोलकरीण चित्रा परित्यक्त्या आहे. ती त्यांच्याकडे आली तेव्हा सोबत किशोरवयीन मुलगाही होता. त्याच नाव मावेश. मावेशच्या शिक्षणाकरता चित्रा काबाड कष्ट करायची. घराबाहेरचं राहत असल्याने मावेश बाहेरच्या वातावरणाचा बळी पडण्याची शक्यता जॉयच्या लक्षात आली. मग त्यांनी काही दिवस त्यांच्याकडेच राहायला त्याला जागा दिली. अशाप्रकारे मावेशच्या अभ्यासात खंड पडला नाही. मावेश एम कॉम झाला. एवढचं नाहीतर आपल्या कंपनीकडून कामाकरता तो वॉशिंग्टनलाही गेला.
मावेशची ही प्रगती पाहून संधी मिळाल्यावर दुर्लक्षित घटकातली मुलेही आकाशाला गवसणी घालू शकतात, या त्यांच्या मताला आणखी वजन मिळालं. जॉयकडे मदतीकरता येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. २००३ मध्ये जॉय दुर्लक्षित घटकातल्या मुलांकरता करत असलेल्या कामाला 12 वर्ष झाली होती. त्यांना वाटलं की, आता आपण औपचारिकपणे आणि पूर्ण वेळ या मुलांकरता केलं पाहिजे. आणि मग २००३ मध्येच ‘मक्कळा’ जागृती या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करण्यात आली. कन्नड मध्ये मक्कळा जागृती म्हणजे ‘बालकांची काळजी’.
शिक्षणाचा हक्क, शैक्षणिक विकास, जीवनमूल्य, नेतृत्व कार्यक्रम आणि दुर्लक्षित घटकांकरता परिसर विकास या गोष्टींवर मक्कळा जागृतीचा भर आहे. सरकारी शाळा आणि अनाथालायांसोबतही काही प्रकल्प राबवते.
मुलांची स्वप्न फुलवताना
जॉय या मुलांशी रोज संवाद साधतात. पण फक्त शिक्षणानं त्यांच्यात बदल घडवणं शक्य नसल्याची जाणीव त्यांना झाली. वस्तींमधली बहुतांश मुलं सातव्या इयत्तेत शाळेला टाटा करतात. जी काही उरलीसुरलेली मुलं असतात, त्यांच्यापैकी निम्मी नववीपर्यंत जेमतेम तग धरतात आणि मग तेही बाहेरच्या वाटा धुंडाळतात. जॉय म्हणतात, “बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा गणित आणि विज्ञान विषयांचा पायाच नीट रचला न गेल्यानं, या विषयांच्या बागुलवुव्याला ते घाबरतात. त्यामुळे जसजसे पुढच्या वर्गांमध्ये जातात या विषयांमध्ये त्यांना रसच उरत नाही. याचा परिणाम शाळा सोडण्यावर होतो. दुसरं म्हणजे या मुलांच्या वस्तीमध्ये त्यांच्याकरता कोणी आदर्श किंवा रोल मॉडेल नसतो. ज्याला पाहून त्यांना प्रेरणा मिळू शकते. ही बहुतांश मुलं मग घरगुती काम किंवा लहान मोठी मोलमजूरीची काम करू लागतात”.
या सर्व समस्यांवर मात करण्याकरता जॉयनी वस्त्यांच्या जवळच शिक्षणकेंद्र सुरू केली. बेंगळुरूमध्ये अडुगोडी या ठिकाणी त्यांनी आपलं पहिलं होलिस्टिक डेव्हलपमेंट मॉडेल सेंटर (एचडिएलसी) सुरू केलं. त्यांच्या या पहिल्याच प्रकल्पात सहा ते चौदा वयोगटातल्या मुलांना शिकण्यातला आनंद कळू लागला. मुलं इथं खूप छान रमू लागली. मग हळूहळू जॉय आणि त्यांच्या टिमने या मुलांच्या पालकांशी संवाद साधायला सुरूवात केली. आपली मुलं अभ्यासात मागे का पडतात, त्यांना पुढे कसं आणलं पाहिजे यावर ते पालकांसोबत काम करू लागले.
या सेंटरचे मुलांच्या विकासाकरता बहुआयामी कार्यक्रम आहेत. 1) बौद्धिक विकास- यात वाचनालयाची सुविधा पुरवण्यात आली आहे. मुलांना कन्नड आणि इंग्रजी विषयाच्या वाचनाची गोडी लावली जात आहे. इंग्रजी, गणित आणि विज्ञानाचा बागुलबुवा दूर करून विषय समजवून सांगण्यात येतात. विज्ञानाची प्रात्यक्षिक मुलांकडून करून घेतली जातात. संगणकाचही प्रशिक्षण देण्यात येतं.
2) सर्जनशीलतेचा विकास – चित्रकला, हस्तकला, भरतकाम, रंगकाम, नाटक, संगीत, बोलक्या बाहुल्या आणि जादू यातल्या ज्या कलेत मुलांना रस आहे. त्याचं त्यांना रितसर प्रशिक्षण दिलं जातं.
3) शारिरीक विकास – तायक्वांडो, गोळाफेक, बॅडमिंटन, धावणे आणि वेगवेगळ्या मैदानी खेळांकडे मुलांचा कल पाहून त्यांना प्रशिक्षित केलं जातं.
4) सामाजिक आणि भावनिक विकास – सामाजिक स्वास्थ्य, समुपदेशन, प्रोत्साहन देणे आणि संघ बांधणी या गोष्टींचं बीज रोवणे.
मक्कळा जागृतीच्या कार्यक्रमांकडे आकर्षित होऊन इथे आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही खूपसे स्वयंसेवक मुलांना प्रशिक्षण देण्याकरता येतात.
शाळेनंतर ही मुलं शिक्षणकेंद्रात एवढ्या आनंदाने कशी जातात हा त्यांच्या शिक्षकांकरता कुतूहलाचा विषय ठरला. मुलांना शाळेत बसवणं हा त्यांच्याकरता गहन प्रश्न असताना ही मुलं शिक्षणकेंद्रात मात्र खूप उत्साहाने जात होती. सरकारी शाळांनीही आता मक्कळा जागृतीसोबत समन्वय साधून शिक्षणकेंद्र सुरू केली आहेत. कर्नाटकातल्या कोप्पल या ग्रामीण भागात आणि बालसुधारगृहांमध्येही ही शिक्षणकेंद्र सुरू करण्यात आली आहेत. २०१२ पर्यंत १७ शिक्षणकेंद्र उघडण्यात आली. आज मक्कळा जागृतीची सात एक्टिविटी सेंटर्स आहेत. शाळांसोबत सुरू करण्यात आलेली केंद्रही अजून सुरू आहेतच.
जॉय सांगतात, मक्कळा जागृतीने आतापर्यंत १४हजार मुलं, एक हजार तरूण तरूणी, ७०० पालक आणि ५०० शिक्षकांसोबत काम केलं आहे. इतर केंद्र आणि मक्कळा जागृतीतला महत्त्वाचा फरक म्हणजे, केंद्र उभारल्यावर मक्कळा जागृतीचे सदस्य दररोज या केंद्रात येतात. केंद्राच्या रोजचे कार्यक्रम ते स्वतः घेतात. आपलं ध्येय साध्य होत आहे ना याकडे जातीने त्यांचं लक्ष असतं.
युवा जागृती
मक्कळा जागृतीच्या सुरूवातीला शिक्षणकेंद्रामध्ये सामील झालेली मुलं आता तारुण्याच्या उंबरठ्यावर आहेत. या मुलांकडूनच त्यांच्या वयोगटाकरता अनुरूप अशा वेगळ्या केंद्राची विचारणा करण्यात आली. आणि मग शहरी वस्त्यांमधल्या १५ ते २५ वयोगटाकरता ‘युवा जागृती’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. या केंद्रांमध्ये क्षमता उभारणी, जीवनावश्यक कौशल्य, व्यक्तीमत्व विकास, करिअर समुपदेशन अशा वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येतं.
जॉय म्हणतात, “आज या तरूण वर्गाकडे नोकरी आहे आणि मुख्य म्हणजे त्यांची स्वप्न त्यांनी साकारली आहेत. यामुळे या वर्गातल्या मुलांकडे कोणी आदर्शच नाही ही परिस्थिती आता बदलली आहे. त्यांच्यासारखीच परिस्थिती असणारी मुलंही प्रगती करू शकतात हा विश्वास या मुलांच्या मनात आता निर्माण झालाय. त्यामुळे एक दुष्टचक्र भेदण्यात आम्ही यशस्वी झालोय”.
मक्कळा जागृतीमध्ये प्रौढ नागरिकही मोठ्या प्रमाणात सामील होत आहेत. या नागरिकांना त्यांच्या लहानपणी शिक्षणाची संधी नाही मिळाली. त्यामुळे ते मुख्य प्रवाहापासून लांब राहिले. पण त्यांना आताची पिढी घडवण्यात खारीचा वाटा उचलायचा आहे. हे नागरिक केंद्रात येतात आणि आपापल्या परिने शिक्षणकेंद्राच्या कामात भाग घेतात. जॉय याबाबत अधिक माहिती देतात. त्या सांगतात, “आम्ही या नागरिकांना प्रशिक्षकांना मदत कशी करायची याच प्रशिक्षण देतो. यातले बरेचसे लोक रोजंदारीवर घरगुती काम करून महिन्याला अडीच हजार रुपये कमवायचे. पण आता हेच लोक प्रशिक्षण घेऊन केंद्रांमध्ये काम करू लागल्यावर महिन्याला १७ हजार रुपयांची कमाई करत आहेत”.
आनंद शोधताना
मुलांच्या विकासाकरता २५ वर्ष काम करुनही त्यांच्या कामाची दखल घेताना मात्र जॉयना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं. अतिशय धिम्या गतीने लोक आपल्या कामाला स्वीकारतात असं त्या सांगतात, “आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला लोकांकडून कुठलीही पावती नको होती. आपण आपल्या ध्येयाकरता काम करतो तेव्हा कुठल्याही पुरस्काराची अभिलाषा नसते. माझ्याकरता मुलंच त्यांच्या वस्तीतल्या पुढच्या पिढीचे आदर्श बनत आहेत यापेक्षा मोठा पुरस्कार कोणता असणार”.
समीपाला जॉय आपल्याच आयुष्यातल्या गोष्टींची मुलं आणि तरुणांशी गुंफण घालतात,
“आमच्या कुटुंबात मी आणि काही मोजक्या मुलींनीच शिक्षण घेतलं. मागे वळून पाहताना जाणवतं की, शिक्षण पूर्ण करण्याकरता मी अविरत संघर्ष केला. आमच्या केंद्रातलं प्रत्येक मूल यशस्वी होतं, तेव्हा लहान असताना यांनीही माझ्यासारखीचं काही स्वप्न पाहिली असतील हेच माझ्या डोळ्यासमोर तरळतं. या मुलांकरता संधींची कमतरता नाहीय. त्यामुळे या मुलांच्या आयुष्यात चांगलं परिवर्तन करण्याचा एकही क्षण मी सोडणार नाही. त्यांच्या स्वप्नांना खतपाणी घालून त्यांची बाग मी फुलवणारचं”.
लेखिका – स्निग्धा सिन्हा
अनुवाद – साधना तिप्पनाकजे