....आणि 'ते' बोलू लागले

....आणि 'ते' बोलू लागले

Tuesday November 10, 2015,

5 min Read

'वाणी' या उपकरणाच्या मदतीनं शारिरीक दृष्ट्या कमजोर असलेल्या व्यक्तीला कुणाशीही सहज संवाद साधनं शक्य होतं. केवळ त्या व्यक्तीनं आपल्या मेंदुमध्ये उमजणा-या शब्दांकडे लक्ष देणं आवश्यक आहे. या उपकरणाचा प्रयोग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला ईमेल पाठवू शकते. ईमेल पाठवताना त्यानं फक्त संबंधित व्यक्तीच्या ईमेल आयडीचा विचार करणं आवश्यक आहे. वाणीच्या मदतीनं प्रयोग करणारा कोणत्याही वस्तूचे छायाचित्र टिपू शकतो. वाणीच्या उपकरणाचा वापर करणा-या दोन व्यक्तींना परस्परांमध्ये बोलण्याचीही आवश्यकता नाही. वाणीच्या मदतीनं टिव्ही, फ्रिज चालू बंद करणे अगदी सोपे आहे.

सातवीत शिकणारा एक मुलगा आपल्या शाळेच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्या कार्यक्रमात त्या मुलाची ओळख आपल्याच शहरातल्या मूक-बधीर मुलांशी झाली. ही विशेष मुलं हातवा-यांच्या मदतीनं परस्परांशी बोलत होती. या पैकी काही मुलांना खूप सारं बोलायचं होतं., पण ते त्यांना समोरच्यांना समजवता येत नव्हतं. या मुलांचा खटाटोप सातवीत शिकणारा सारंग खूप लक्ष देऊन पाहत होता. या मुलांना काय मदत करावी ? हा प्रश्न त्याला पडला. घरी आल्यावर आपले वडिल सुनील पारेख यांना सारंगनं याबाबत प्रश्न विचारले, त्यावेळी वडिलांनी त्याला समजावलं. हे समाजातलं वास्तव आहे. या मुलांसाठी करण्याची तुझी खरोखरच इच्छा असेल तर तू ते काम कर.त्यांच्या या बोलण्याचा आपल्या १२ वर्षांच्या मुलावर किती परिणाम होणार आहे हे त्यावेळी सारंगच्या वडिलांना माहिती नव्हतं . मूक-बधिर आणि विकलांग मुलांसाठी काही तरी करण्याचा सारंगने निश्चय केला होता. यासाठीचा मार्गही त्यालाच निवडायचा होता. सारंग नववीमध्ये गेल्यानंतर त्याची संगणकाशी घट्ट मैत्री झाली. दिवस-रात्र तो इंटरनेटवर शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक मुलांसंबंधीची माहिती गोळा करत असे.

image


सारंग घरात सर्वात छोटा. त्याला दोन मोठ्या बहिणी आहे. अभ्यासात सारंगचा सामान्य मुलांपेक्षा वरच्या श्रेणीत नंबर होता. पण अभ्यासासोबतच काही तरी वेगळं करण्याचा किडा त्याच्या मनात वळवळत असे. सारंग दहावीमध्ये असताना बनारसमधल्या आयटी-बीएचयूमध्ये दिल्लीमधल्या प्रतिष्ठित सायबर सुरक्षा फर्म ल्यूसीडीसनं एक स्पर्धा आणि चर्चासत्राचं आयोजन केलं होतं. बनारसमधल्या सनबीम लहरतारा शाळेत शिकणारा सारंग संगणकात हुशार होता. त्यामुळे शिक्षकांनी त्याला या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

आयटी-बीएचयूनं आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये देशभरातले संगणक विद्यार्थी आणि व्यावसायीक सहभागी झाले होते. सारंगनं या स्पर्धेत सर्वात जास्त गुण मिळवले. ल्यूसीडियस फर्मही त्याच्या बुद्धीमतेनं प्रभावित झाली. त्यांनी सारंगला दिल्लीमध्ये इंटर्नशिप करण्याची ऑफर दिली. सारंगचा हा पहिला विजय होता. त्याच्या प्रतिभेची दखल सर्वांनी घेतली होती. सारंगने ल्यूसीडियस कंपनीमधून इथिकल सायबर हॅकिंगचं प्रशिक्षण घेतलं. हे प्रशिक्षण म्हणजे सारंगची मोठी उपलब्धी होती. त्यानं आता आपली दिशा निश्चित केली होती. अशक्त लोकांसाठी काम करण्याचा त्याचा निश्चय होता. हा निश्चय पूर्ण करण्यासाठी त्यानं वाटचाल सुरु केली.

सारंगनं अनेक महिने परिश्रम करुन 'व्हाईस आर्टिफियलन्यूरो इंटरफेस' ( VANI ) नावाचे उपकरण तयार केले. या उपकरणाच्या मदतीनं शारिरीक दृष्ट्या कमजोर असलेल्या व्यक्तीला कुणाशीही सहज संवाद साधनं शक्य होतं. सारंगचे हे मोठे यश होते. सारंगनं या उपकरणाला तपासणीसाठी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत काम करणा-या ' नॅशनल इनोवेशन फाऊंडेशन' अहमदाबादमध्ये पाठवलं. या संस्थेनं वाणी उपकरणाच्या वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या. या सर्व चाचणीमध्ये वाणी पास झालं. सारंगनं तयार केलेलं हे उपकरण केवळ मुकबधीर मुलांसाठी नाही तर अपंग मुलांचं आयुष्यही सुखकर करणारं होतं. फाऊंडेशनच्या अधिका-यांनी सारंगला या वाणी उपकरणाचं पेटंट दिले. सारंगकडे आता या पेटटंचा नंबरही आहे. वाणीच्या मदतीनं मेंदुमधल्या तरंगाचं डिकोडींग करुन ते ऐकता आणि वाचता येतात. त्याचबरोबर वाणी मेंदूच्या तरंगांनी दिलेल्या आदेशानुसार काम करण्यासही सक्षम आहे, असं सारंगनं सांगितलं. याबाबत त्यानं एक उदाहरण दिले, जर एखाद्या व्यक्तीला हात नसेल तर तो व्यक्ती आपल्या मेंदूनं या उपकरणाला जे काम करण्याचा आदेश देईल ते काम ही व्यक्ती पूर्ण करे. वाणीचे अनेक प्रकार आहेत. वेगवेगळ्या व्यक्तींची गरज लक्षात घेऊन हे उपकरण बनवण्यात आले आहे.

कसे होते काम ?

वाणीमध्ये मेंदूच्या तरंगांना ईईजी हेडसेटच्या मदतीनं डिकोड केलं जातं. त्यानंतर ते कोडींग उपकरणातल्या सॉफ्टवेअरमध्ये पाठवलं जातं. यामध्ये मिळालेली माहिती सॉफ्टवेअर कंट्रोल बोर्ड किंवा मिनी बोर्डाच्या मदतीनं कॅमे-यामध्ये जमा केली जाते. सारंगने याचे अनेक प्रकार बनवले आहेत. ज्यामध्ये मेंदुच्या तरंगांचे डिकोडींग करुन वेगवेगळ्या यंत्रणेशी जोडले जातात आणि त्याला कार्यान्वित केलं जातं. टायपिंग करणे, काही लिहणं किंवा आपलं म्हणनं मांडणं, यासारखी कामं शारिरीक दृष्ट्या अशक्त व्यक्ती वाणीच्या मदतीनं सहज करु शकतो. वाणीच्या निर्मिती प्रयोगात्मक स्वरुपात असताना यावर बराच खर्च झाला. हा सर्व पैसा सारंग यांना त्यांच्या वडिलांनी दिला. दोन प्रयोग आणि उपकरणांच्या परिक्षणानंतर वाणीचं वर्तमान रुप अस्तित्वात आलं.

वडिलांची मदत

सारंगला प्रत्येक टप्प्यावर वडिलांचा भक्कम पाठिंबा मिळाला. सारंगचे वडिल बनारसी साड्यांचे व्यापारी आहेत. त्यांनी सारंगच्या प्रतिभेकडं कधीही दुर्लक्ष केलं नाही. मध्यमवर्गीय कुटुंब आणि खर्चाची मर्यादा असूनही सारंगच्या प्रयोगासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांसाठी सुनील पारेख यांनी कधीही पैसा कमी पडू दिला नाही. आपल्या मुलानं शोधलेल्या उपकरणाचा मला गर्व आहे, असे ते मोठ्या अभिमानाने सांगतात. शारिरीक कमतरतेमुळे काम करण्यास असमर्थ ठरणा-या मुलांसाठी हे उपकरण एक वरदान आहे. आपल्या मुलाच्या अभ्यासामध्ये कोणताही अडथळा येणार नाही ना ? याची काळजी सुनील पारेख यांना सतावत असे. सारंगही अभ्यासाची विशेष काळजी घेतो. आपल्या देशात प्रतिभेपेक्षा परिक्षेमधल्या गुणांना महत्त्व आहे. असं सारंगला वाटतं.

या उपकरणाची जवळपास २० हजार रुपये किंमत आहे. ही किंमत कमी करण्याचा सारंगचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी त्याला सरकारी मदतीची गरज आहे. अभ्यासाबरोबरच आपली सृजनात्मक कामं करणं अवघड आहे, असं सारंगनं सांगितलं . तर १० वी नंतर मुलांच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल झाला पाहिजे असं त्याचे वडिल सुनील पारेख यांचं मत आहे. मुलांसाठी सर्व विषयांचा अभ्यास करणं आणि त्यामध्ये चांगले मार्क्स मिळवणं अनिवार्य असू नये. मुलांची १० वी नंतर कल्पकतेची आणि सृजनतेची परीक्षा व्हायला हवी. यामधून मुलांच्या कल्पकतेची योग्य परीक्षा होऊ शकेल, असं मत सुनील पारेख यांनी मांडलं

सुनील पारेख यांच्या घरात सध्या अभिनंदनासाठी येणा-या मंडळींची रांग लागलेली असते. सारंगच्या या अनोख्या प्रयोगाची संपूर्ण शहरात चर्चा आहे. माध्यमांनीही सारंगला मोठी प्रसिद्धी दिलीय. वाणीसारखं उपकरणं जगात आजवर बनलेलं नाही. सारंगच्या या उपकरणाला सरकारी मदत मिळाली तर ती भारतासाठी मोठी उपलब्धी असेल.

सारंगने आपल्या प्रतिभेला न्याय दिला. त्याचबरोर आपल्या संशोधनातून समाजातल्या एका वर्गाच्या चेह-यावर हसू फुलवलंय.