सलग पन्नास तास घाम गाऴून पोर्टेट रांगोळीतून साकारले कलेचे ‘बाहूबल’

- ‘बाहूबली-२’ एक रांगोळी प्रदर्शन

सलग पन्नास तास घाम गाऴून पोर्टेट रांगोळीतून साकारले कलेचे ‘बाहूबल’

Monday May 29, 2017,

4 min Read

सध्या देशभरात बाहुबली-२ चा झंझावात सिनेमा जगातील कोट्यावधीच्या कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. या सिनेमाच्या चमत्कृतीप्रधान रहस्यमय कथानकावर चित्रपट रसिक फिदा झाले आणि त्यानी ‘कट्टापाने बाहुबलीला का मारले?’ या पहिल्या भागातील काल्पनिक तरीही अनेक महिन्यांपासून यक्ष प्रश्न ठरलेल्या मुद्यावर गर्दी करण्याचे नवे उच्चांक प्रस्थापित केले.


image


एखादी कल्पनारम्य कलाकृती आपल्या मेहनत आणि प्रतिभेच्या बळावर काय करू शकते याचे हे जिवंत उदाहरणच म्हणावे लागेल. याच कलेच्या ‘बाहुबली’ पासून प्रेरणा घेवून नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये एक चित्रकला शिक्षक प्रमोद आर्वी यांनी आपल्या कलेतील बाहूबली रांगोळीच्या माध्यमातून साकारत अचंबित करणारी प्रतिभा शक्ती आणि कलेशी तादात्मता कशी असते याचे नवे उदाहरण घालून दिले आहे. सध्या रांगोळीच्या रूपातील हा बाहुबली सा-यांच्या चर्चेचा विषय झाला असून नव्याने गर्दीचे केंद्र ठरला आहे. 


image


मालेगावतील परफॉर्मिंग आर्टसच्या सुमारे १४ विद्यार्थीनी, दोन विद्यार्थी आणि त्यांचे कला शिक्षक राजराजेश्वरी शैक्षणिक आणि सामाजिक संस्था संचलित साई आर्ट क्लासेसचे प्रमोद आर्वी यांनी बाहुबली-२ या सिनेमातील महत्वाचे प्रसंग पोर्टेट रांगोळीच्या माध्यमातून चितारले आहेत. या रांगोळीत देखील तुम्हाला ‘कट्टापाने बाहुबलीला का मारले?’ या उत्कंठावर्धक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे हे विशेष. त्यामुळेच गेल्या दोन सप्ताहापासून मालेगावातील साई क्लासेस मध्ये दोन हजार पेक्षा जास्त कला प्रेमींनी गर्दी करून या कला प्रदर्शनातील बाहुबलींच्या भव्य दिव्यतेला ‘याची देही याची डोळा’ पाहून मनोमन कलाकारीच्या बाहुबलीत्वाची प्रचिती घेतली आहे.


image


हुबेहुब पोस्टर प्रमाणे दिसणा-या या रांगोळ्यामध्ये त्या साकारताना वैविध्य देखील चितारण्यात आले आहे, त्यातील सर्वात मोठी रांगोळी १५ बाय १० म्हणजे १५० फूटांची असून सलग पन्नास तास ४३ डिग्री तापमान असताना या रांगोळ्या पंखे बंद करून साकारताना कलाकार मुली आणि त्यांच्या शिक्षकांनी अक्षरश: घाम गाळला आहे! कलेच्या अपार कष्टातून कल्पकता आणि परिणामकारकता यांचा प्रत्यय देताना या चित्रकृती पाहणा-याला वेगळ्याच अनूभूतीचा आनंद देतात.


image


या रांगोळ्या करण्याची प्रेरणा कशी मिळाली यावर बोलताना कला शिक्षक प्रमोद आर्वी सांगतात की, “ सुरूवातीला बाहुबलीचा पहिला भाग प्रदर्शित झाला त्यावेळीच प्रभास यांची शिवलींग उचलण्याची चित्रकृती साकारली होती त्यावेळी ती सोशल मिडीयातून ‘हिट’ झाली होती. यावेळी देखील एप्रिल महिन्यात बाहुबली-२ ची छोटी सहा बाय आठ आकाराची रांगोळी काढली होती मात्र त्यावरून समाधान झाले नाही हा सारा चित्रपट रांगोळीतून उलगडून का दाखवता येणार नाही असा विचार करून काही रांगोळ्या साकारल्या त्यांनाही सोशल मिडीयातून चांगला प्रतिसाद लाभला होता”. त्यानंतर यावर चर्चा झाली आणि सोबतच्या कला विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने ख-या खु-या कलात्मकतेच्या बाहुबली-२ ला साकारण्याच्या कल्पनेने सारे झपाटले. मग सर्वानी मिळून बाहूबली-२ हा सिनेमा पाहिला आणि त्याच वेळी या रांगोळी प्रदर्शनाचा कच्चा आराखडा तयार झाला. असे आर्वी यांनी स़ांगितले.


image


त्यासाठी मग सातारा येथून खास प्रकारचे लेख विशेष रंग मागविण्यात आले. आणि मग आणखी एका भव्य दिव्य बाहूबलीला साकारण्यासाठी या तरूण, उत्साही, मेहनती मुली आणि त्यांचे शिक्षक यांनी ‘बाहू सरसावले’ आणि त्यांच्या पन्नास तासांच्या घामातून कलेच्या बाहूबलातून, कष्टातून बाहूबली-२ च्या कलाकृतीला पोर्टेट च्या माध्यमातून जिवंत करण्याचा अनोखा प्रयोग सफल झाला. त्यात पर फॉर्मिंग आर्टच्या पहिल्या वर्गात शिकणा-या रेणूका पाटणकर, गायत्री निकम, श्रध्दा बागूल, पूजा बच्छाव, मिनल जाधव, राधिका महाले, मिनल शिंदे, कल्याणी निकम, ललिता चौहान, कल्पेश महाले, अनिकेत शेवळे, सोनी अग्रवाल आणि त्रिवेणी यांनी सहभाग घेतला. हा सारा अनोखा कलापट कसा सूचला आणि साकारला त्यावर भाष्य करताना कला शिक्षक बाहूबली प्रमोद आर्वी म्हणाले की, “ राज्यभर फिरत यापूर्वी देखील अनेक रांगोळ्या पाहिल्या होत्या, मात्र आपण काहीतरी आगळे वेगळे करावे अशी खूप दिवस इच्छा होती. एप्रिल मध्ये बाहूबली -२ वरून संकल्पना सूचली त्यावेळी छोट्या प्रमाणात हा प्रयोग करून पाहिला, मात्र त्याने समाधान झाले नाही आणि ही बाहुबली रंगोळीची भव्य दिव्य कल्पना साकारण्याचे ठरले.” ते म्हणाले की, “ हे सारे करताना विद्यार्थीनी मुलांच्या सहनशिलतेची दाद द्यावी लागेल, त्यांच्या सलग पन्नास तास ४३ डिग्री तापमानात पंखे बंद केल्याने घामात न्हावून निघत असताना कलेच्या प्रेमासाठी समर्पण भावनेतून केलेल्या मेहनतीचा हा परिणाम पहायला मिळाला आहे”


image


ते म्हणाले की, “ यावेळी आम्हाला रांगोळी साकारताना ज्या काही नव्या कल्पना सूचल्या त्या प्रथमच मी वापरल्या, जसे की युध्दात जखमी झालेल्यांच्या जखमा आणि रक्ताच्या वेगवेगळ्या छटा हुबेहुब साकारणे हे आव्हान होते”.


image


आता सर्वत्र कौतूक होत आहे, त्याचा आनंद आहे, तरीही या कलावंताच्या मनात एक खंत आहे जी त्याने बोलुन दाखवली आहे, ते म्हणाले की, “ मालेगाव हे तसे लहानसे शहर आहे, मात्र येथे अजोड अशा कल्पकतेचे कलाकार मोठ्या प्रमाणात आहेत, मात्र त्या सा-यांना त्यांच्या कला साकाराव्या यासाठी नेमके व्यासपीठ नाही, प्रोत्साहन देणारे कुणी नाही किंवा त्यांच्या कलेच्या संवर्धनासाठी कोणतीही सोय नाही, तशी ती असावी असा ध्यास आहे.” त्यासाठी या कलेच्या बाहूबलीला साथ देण्यासाठी या रांगोळी प्रदर्शनाच्या निमित्ताने जगभरातून कौतूक करणा-या कलाप्रेमींनीच आता काहीतरी पुढाकार घ्यावा आणि मालेगावात कलेच्या संवर्धनाचे नवे व्यासपीठ स्वतंत्र इमारत उभारावी अशी इच्छा आर्वी यांनी व्यक्त केली. त्यांच्या या स्वप्नाला बळ देण्यासाठी त्यांना आपण 7840967627  या क्रमांकावर संपर्क करू शकता आणि मदत देखील करू शकता. प्रमोद आर्वी आणि त्यांच्या विद्यार्थी कन्यांच्या बाहूबलातून साकारलेल्या या कलेला ‘युअर स्टोरी मराठी’चा सलाम! मालेगावात सध्या या बाहुबली कलावंताच्या कलाकृतीला पहायला गर्दी होत असताना ‘युवर स्टोरी मराठी’च्या माध्यमातून जगभरातील कलाप्रेमीना देखील त्यात सहभागी करून घेताना आम्हाला आनंद होत आहे.