स्वबळावर व्यावसायिक साम्राज्य निर्माण करणारी सायकल दुकानदाराची मुलगी : 'यलो फॅशन'ची निर्माती !
ग्रामीण भागातल्या मुलीच्या भरारीची यशस्वी कथा
मध्य प्रदेशातल्या दुर्गम भागातल्या हातपीपल्या या छोट्याश्या गावातली ही गोष्ट आहे. या गावातल्या खराब आणि धुळीनं माखलेल्या रस्त्यावर एक सायकलचे दुकान होते. हे दुकान छोटे होते. पण या दुकानदाराची कामावरची निष्ठा मोठी होती. आपल्या दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं ते अगदी तन्मयतेने करत. या दुकानदाराच्या कामाचे संस्कार त्याच्या मुलीवर झाले.
आपल्या वडिलांचे नाव जगामध्ये मोठं होईल, असे काही तरी ठोस काम करायचे हा निश्चय या मुलीने लहानपणीच केला होता. या मुलीनं केवळ निश्चय केला नाही तर तशी कृतीही केली. स्वबळावर व्यावसायिक साम्राज्य उभे केले. यलो फॅशन डॉट इन ((Yellowfashion.in) या भारतीय महिलांच्या पारंपारिक कपड्यांच्या ऑनलाईन फॅशन स्टोरच्या निर्मितीची ही प्रेरणा आहे. हातपीपल्या या छोट्याश्या गावातल्या पल्लवी पतौडी यांनी आपल्या वडिलांच्या कामापासून प्रेरणा घेत या नव्या उद्योगाची निर्मिती केली आहे.
इंदूरपासून ५० किलोमीटर अंतरावरच्या गावामध्ये पल्लवी यांचे बालपण गेले. त्यांच्या गावामध्ये शिकण्यासाठी चांगली शाळा नव्हती. गावातल्या शाळेत मुलभूत सोयींचा अभाव होता. शाळेतल्या वर्गात केवळ एक फळा आणि टेबल इतकेच साहित्य होते. जमिनीवर बसून शिकावं लागायचं.
“ गावात चांगली शाळा नव्हती. पण आपल्या मुलींना त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षण देण्याचा आई-बाबांनी निश्चय केला होता ”, असे पल्लवी सांगतात. “घरापासून दूर दुस-या गावामध्ये मला आणि बहिणीला आई-बाबांनी शिक्षणासाठी पाठवलं. त्यामुळेच पल्लवी यांनी इंदूरच्या आहिल्या देवी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या गुजराती कॉलेजमधून एमए अर्थशास्त्र पूर्ण केले.”
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच पल्लवी यांचे लग्न झाले. लग्नानंतर त्यांना दोन मुलं झाली. संसार, मुलाबाळांचे संगोपन हे सारे करत असतानाही पल्लवी यांच्यामधला उद्योजक जिवंत होता. स्वबळावर काही तरी करुन दाखवण्याची त्यांची उर्मी कायम होती. पारंपारिक कपड्यांशी संबंधित ऑनलाईन स्टोअर सुरु करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण करण्याठी त्यांनी गुपचूप तयारीही सुरु केली होती.
पल्लवी यांनी नव-याच्या मदतीने घराजवळ छोटीशी जागा भाडेतत्वावर घेतली. या जागेमध्ये त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. मुलांवर लक्ष देता यावं याच उद्देशाने त्यांनी घराजवळची जागा व्यवसायासाठी निवडली होती. आपल्या उत्पादनाच्या फोटोशुटसाठी सुरुवातीच्या काळात त्यांनी बचत तसंच भविष्य निर्वाह निधीचे पैसेही वापरले. तसेच आपल्याकडच्या वेगवेगळ्या वस्तू दाखवण्या-या व्यापा-यांना आगाऊ पैसे मिळतील अशी व्यवस्थाही बनवली.
या व्यवसायाची संकल्पना पल्लवी यांना पतीच्या आजारपणात सुचली. पल्लवी यांच्या यजमानांची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांना रुग्णालयातमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले होते. रुग्णालयामधून बरे होऊन त्यांना कामावर परतायचे होते, तर पल्लवी यांना स्वत:चा व्यवसाय उभा करण्याची ओढ लागली होती. त्यावेळी रुग्णालयामध्ये पतीशी झालेल्या चर्चेमधून यलो फॅशनचा जन्म झाला, असे पल्लवी यांनी सांगितले. आजच्या तरुणाईचा पिवळा ( यलो) हा आवडीचा रंग आहे. त्यामुळेच आपल्या व्यवसायाला यलो हे नाव देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केले.
ऑनलाईन फॅशन स्टोअरची संकल्पना आकर्षक होती. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये अडचणींची मालिकाच पल्लवी यांच्या समोर उभी होती. पहिल्या तीन महिन्यात त्यांचा व्यवसाय कासवगतीनं पुढे सरकत होता. या काळामध्ये केवळ २० ते २५ साड्यांची विक्री झाली. त्यांचा रॅक साड्यांनी गच्च भरला होता. पण साड्यांना पुरेसा उठाव मिळत नव्हता. त्यामुळे आगामी काळ पल्लवी यांना अधिक आव्हानात्मक वाटत होता. त्यानंतर त्यांनी आपल्या संकेतस्थळामध्ये सुधारणा केली. वेगवेगळ्या समाज माध्यमातून उत्पादनाचा प्रसार केला. ग्राहकांसाठी आकर्षक सूट जाहीर केली.
पल्लवी यांचे कार्यालय निवासी भागामध्ये होते. याचाही त्यांना फायदा झाला. आसपासच्या भागातल्या महिला साड्या पाहण्यासाठी कार्यालयात येत असतं. त्यापैकी काही जणी साड्यांची खरेदीही करत.
त्यानंतर ‘यलो फॅशन’ने गती पकडण्यास सुरुवात केली.त्यानं फॅशनच्या जगामध्ये आपली ओळख निर्माण केली. आता आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याची पल्लवी यांची योजना आहे. वेगवेगळ्या व्यवसायातल्या महिलांना आवडतील अशा साड्यांची मोठी विविधता ठेवण्याचा त्यांचा विचार आहे. गुजराती असो वा दक्षिण भारतीय, गृहिणी असो वा प्राध्यापक प्रत्येक गटाची आवड आणि गरज पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या महिलांच्या आवडीचे ब्लाऊज तयार करण्यावरही विचार सुरु आहे. त्याचबरोबर या साड्यांवर लवकरच त्यांचे मानचिन्हही असेल.
पल्लवी सांगतात, “ सुरवातीच्या काळामध्ये आमची टीम लहान होती. आमच्या टीममधल्या प्रत्येकालाच वेगवेगळ्या प्रकारची काम करावी लागत. माझा खासगी मोबाइल कस्टमर केअरसाठी वापरला जात होता. विक्रेत्यांसोबतच्या बैठकीत किंवा मुलांना शिकवताना माझा मोबाईल वाजायचा, आणि मी ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचे. हे माझ्या चांगले लक्षात आहे.”
“हा व्यवसाय जरी ऑनलाईन असला तरी त्याला वैयक्तिक टच आहे. ही पल्लवी यांच्यासाठी अभिमानाची बाब आहे. सुरुवातीच्या काळात मुंबईतल्या ग्राहकांना आम्ही स्वत: साड्यांचे वितरण केले. आताही महिन्यातून कमीत कमी एक-दोनदा आम्ही हा प्रयोग करतो. या प्रयोगामुळे ग्राहकांशी आमचे अनोखे नाते तयार झाले आहे. ग्राहक आमच्या अधिक जवळ आले आहेत. हे वैयक्तिक नातं आमच्या यशासाठी महत्त्वाचा घटक आहे ”असे पल्लवी यांनी स्पष्ट केले.