'रिल लाईफ हिरो' बनण्यासाठी आलेले मनोज बनले 'रिअल लाईफ हिरो'
सिनेमा आणि नाटकात काम करण्यासाठी २००७ साली औरंगाबादहून मुंबईत आलेले मनोज पांचाळ यांचे 'रिल लाईफ हिरो' बनायचे स्वप्न तर अधुरे राहिले. मात्र समाजाप्रती असलेल्या जाणीवेने आणि कर्तृत्वाने त्यांना अनेकांच्या आयुष्यात 'रिअल लाईफ हिरो'चे स्थान मिळवून दिले आहे. डोंबिवली आणि कल्याण स्थानकांवर राहणाऱ्या वृद्ध नागरिकांना घरी आसरा देणारे तसेच त्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा यांसारख्या मुख्य गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारे मनोज हे नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत. मनोज यांनी 'अचिव्हर्स' या संस्थेची स्थापना केली असून, त्याद्वारे ते मेडिटेशन, मोटीवेशन आणि स्ट्रेस मॅनेजमेंटबद्दल मार्गदर्शन करतात. याशिवाय अनेक ठिकाणी त्यांनी मोटीवेशनल स्पिकर म्हणून देखील काम केले आहे. मूळचे नांदेडचे असलेल्या मनोज यांचे मातृछत्र ते अवघ्या सहा महिन्यांचे असताना हरपले. त्यानंतर मनोज यांच्या नातेवाईकांनी त्यांची आणि त्यांच्या दोन भावंडांची रवानगी स्थानिक अनाथाश्रमात केली. बारावीपर्यंतचे शिक्षण मनोज यांनी अनाथाश्रमात म्हणजेच संस्कृती संवर्धन मंडळ, शारदानगर, सदरोळी येथेच पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी औरंगाबाद गाठले. औरंगाबादमध्ये देखील खडतर जीवन जगत त्यांनी आपले ड्रामाटिक्स विषयातील चौदावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अभिनेता व्हायचे स्वप्न उराशी बाळगणारे मनोज यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई गाठली. पण त्यांना त्या क्षेत्रात अपेक्षित असे यश मिळाले नाही. परिणामी त्यांनी अनेक खासगी कंपन्यांमध्ये नोकरी केली. लहानपणापासूनच गरिबीत जीवन जगल्याने तसेच आपल्या आजीची होणारी होरपळ जवळून अनुभवल्याने त्यांनी समाजसेवेचे व्रत हाती घेतले आणि अद्यापपर्य़ंत ते अविरत सुरू आहे.
मनोज सांगतात की, 'मी जेव्हा १५-१६ वर्षाचा होतो, तेव्हा माझ्या आजीची नातेवाईकांनी केलेली उपेक्षा मी फार जवळून पाहिली होती. तेव्हा मला तिच्याबद्दल भरपूर सहानुभूती वाटायची, तिची दया यायची. मात्र माझ्या हाताने तेव्हा काहीच होण्यासारखे नव्हते. तेव्हा मी मनोमन ठरविले होते की, जेव्हा मी स्वतःच्या पायावर उभा राहीन तेव्हा किमान जे इतरांवर अवलंबून आहेत म्हणजेच वृद्ध माणसे आणि लहान मुले यांकरिता काहीतरी काम करायचे. त्यानंतर मी औरंगाबाद येथे शिक्षणासाठी गेलो. तेथे मी सकाळी महाविद्यालयीन शिक्षण आणि दुपार ते रात्र एका हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करत होतो. कारण मला उपजिवीकेचा प्रश्न होता. त्यानंतर मी सिनेमात काम करण्याच्या हेतूने मुंबई गाठली. पण ते काही शक्य झाले नाही. त्यामुळे मी खासगी कंपनीमध्ये नोकरी स्वीकारली. मुंबईत आल्यानंतर मला अनेक वयोवृद्ध माणसे रेल्वे स्थानकांवर भीक मागताना दिसायची. मग त्यांच्यासाठी मी काय करू शकतो, तर त्यांना दोन वेळेचं अन्न देऊ शकतो. त्यामुळे मी कल्याण-डोंबिवली स्थानकांवरील वयोवृद्ध माणसांना घरुन जेवण बनवून आणून द्यायचो. तेव्हा मला स्थानकावर राहणाऱ्या एका आजीने सांगितले की, आम्हाला रात्रीचा इथे वावरणाऱ्या व्यसनी लोकांचा वाईट अनुभव येतो. आमची राहायची सोय होऊ शकते का? एवढ्या वृद्ध माणसांना एखाद्या वृद्धाश्रमात ठेऊन त्यांचा आर्थिक खर्च मला पेलवणारा नव्हता. त्यामुळे मग मी त्यांना माझ्या घरी आणण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मी स्थानकावरील चार-पाच वृद्ध लोकांना माझ्या घरी आणून ठेवले. परंतू आम्ही एका चांगल्या इमारतीत भाडेतत्वावर राहत असल्याने, तेथील स्थानिक लोकांनी आमच्या या कार्याला विरोध केला. त्यामुळे मी मग त्या इमारतीतील घर सोडले आणि डोंबिवलीत एका चाळीत भाडेतत्वावर दोन खोल्या घेतल्या. त्यामधील एका खोलीत मी, माझी पत्नी आणि दोन मुली राहतो आणि दुसऱ्या खोलीत आम्ही या वृद्धांना राहायची सोय करुन दिली. तसेच त्यांना तेथे आम्ही जेवण पुरविणे, वैद्यकिय सेवा उपलब्ध करुन देणे, यांसारखी कामे करण्यास सुरुवात केली. आमच्याकडे राहणाऱ्या वृद्ध लोकांशिवाय इतर वृद्ध मंडळी जी स्थानकांवर राहतात, त्यांना जेवण पुरवण्याचे काम अद्यापपर्यंत सुरू आहे.'
मनोज यांच्या या कार्याचे फेसबूक आणि व्हॉट्सअप यांसारख्या सोशल माध्यमांवर अनेकांनी कौतुक केले. तसेच मनोज यांच्या उपक्रमात त्यांच्यापरीने होणारी मदत देऊ केली. तसेच अनेकांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. अशाप्रकारे मनोज यांच्या या उपक्रमाच्या मागे अनेकजण सहकार्य़ाच्या हेतूने उभे राहिले. दरम्यानच्या काळात कसारा येथील आदिवासी पाड्यात काम करताना मनोज यांना त्या पाड्यातील कुपोषणाचा प्रश्न निदर्शनास आला. तेथील एका मुलीचा कुपोषणाने मृत्यू झाला होता. त्यामुळे मनोज यांनी त्या पाड्यातील कुपोषणाचा प्रश्न मुळापासून सोडवण्याचे ठरविले. त्यावर उपाय म्हणजे त्या पाड्यातील गरोदर स्त्रियांना ते महिनाभर पुरेल एवढे पौष्टीक खाद्यपदार्थ प्रतिमाह पुरवत असत. गरोदर स्त्रीला पहिल्या महिन्यापासून ते बाळ जन्मल्यानंतर पुढील तीन महिने म्हणजेच एकूण १२ महिन्याच्या कालावधीकरिता ते अन्नधान्य पुरवत. त्यात विविध प्रकारच्या डाळी, गुळ, खोबरे, हरभरा यांचा समावेश असे. तसेच त्या ठिकाणी ते त्यांच्या मित्रांच्या सहाय्याने वैद्यकिय सेवादेखील पुरवत असतं. ज्या कोण्या व्यक्तीला या पाड्यातील गरोदर स्त्रीला अन्न पुरवायची इच्छा असेल, त्याने स्वतः वैद्यकिय कॅम्प सुरू असताना तेथे येऊन स्व-हस्ते एखाद्या स्त्रीला मदत करावी, अशी भूमिका मनोज यांनी घेतली. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा हिशेब मनोज यांना बाळगावा लागत नाही. शिवाय समाजसेवेच्या त्यांच्या या प्रयत्नातदेखील अनेकजण आपसूकच सहभागी होत जातात. विशेष म्हणजे, मनोज यांच्या या उपक्रमाला एवढे यश आले की, सध्या त्या पाड्यात कोणीही बाळ कुपोषणग्रस्त म्हणून जन्माला आले नाही. कसारा आदिवासी पाड्यात मनोज यांनी वैद्यकिय कॅम्पदेखील यशस्वी आयोजित केले आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी ते आदिवासी पाड्यात वैद्यकिय कॅम्पचे आयोजन करतात. सध्या मनोज हे वीटभट्टी कामगार असलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करत आहेत. हातावर पोट असलेल्या वीटभट्टी कामगारांना कामामुळे अनेकदा स्थलांतर करावे लागते. या गोष्टीचा त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत असतो. मनोज यांनी त्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करुन त्यांना शैक्षणिक वस्तू पुरवण्याचे काम ते करतात. विशेष म्हणजे मनोज यांची मुलगीदेखील त्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेते.
आजच्या या महागाईच्या काळात मनोज हे एवढ्या माणसांचा खर्च उचलतात. यासाठी मनोज आपले आर्थिक गणित कसे जमवतात याबाबत बोलताना ते सांगतात की, 'मी माझ्या सर्व गरजा या किमान पातळीवर आणून ठेवल्या आहेत. मी आहे त्या परिस्थितीत स्वतःला समाधानी मानतो. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या जीवनावश्यक वस्तू आहेत, हे आपण लहानपणापासून शिकत आलो आहे. तेच समीकरण मी माझ्या आयुष्याला लागू केले आहे. मी माझी जीवनशैली माझ्या शेजाऱ्याकडे किंवा मित्र परिवाराकडे पाहून अजिबात ठरवत नाही. माझी मुलगीदेखील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेते, जिथे त्या वीटभट्टी कामगारांची मुले शिकतात. याशिवाय कोणी आजारी पडल्यास मी आवर्जुन सरकारी रुग्णालयातील सेवांचा लाभ घेतो. या योजना आपल्यासाठी आहेत जर आपणच त्यांचा लाभ घेणार नाही, तर त्यांचा दर्जा तरी कसा सुधारणार. जर आपण आपल्या गरजा किमान स्तरावर आणून ठेवल्या तर इतरांना मदत करण्यासाठीदेखील आपल्याकडे बरेच काही शिल्लक राहते. मी जेव्हा आदिवासी पाड्यात वैद्यकिय कॅम्प आयोजित करण्याचे ठरवितो आणि एखाद्या डॉक्टरना त्याबद्दल विचारणा करतो. तेव्हा ते देखील आमचा हेतू पाहून आम्हाला मोफत मदत करण्यास तयार होतात. विशेष म्हणजे डॉक्टरांकडे आलेली औषधांची सॅंम्पल्स, माझ्या मित्रांनी गोळा केलेली औषधे यांच्या जोरावरच आम्ही वैद्यकिय कॅम्पचे आयोजन करतो.'
मनोज यांना आजवर अनेक स्वयंसेवी संस्थांनी स्वतःसोबत काम करण्याचे आवाहन केले. मात्र मी हे काम केवळ माझ्या समाधानासाठी करतो, असे सांगत मनोज यांनी त्या संधी नाकारल्या. वृद्धांना मदत करताना कोणतेही प्रकरण अंगाशी येऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मनोज यांना त्यांच्या मित्रांनी एक स्वतःची स्वयंसेवी संस्था नोंदणीकृत करण्याचा सल्ला दिला. त्यावर विचार करुन अखेरीस मनोज यांनी ऑगस्ट २०१५ मध्ये 'जाणीव' नावाच्या स्वयंसेवी संस्थेची नोंदणी केली. मात्र त्या संस्थेच्या माध्यमातून फक्त वृद्धांची सेवा करण्याचा मनोज यांचा मानस आहे. भविष्यकाळात तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. मनोज सांगतात की, 'तृतीयपंथींयांचा वृद्धापकाळ हा अतिशय दयनीय आहे. जोपर्यंत त्यांच्या अंगात शक्ती आहे, ते चालू फिरू शकतात, तोपर्य़ंत ते भिक मागून आपली गुजरण करतात. मात्र जेव्हा त्यांचा वृद्धापकाळ येतो तेव्हा त्यांच्या वाट्याला हालाखीचे जीणे येते.' याबाबत काम करण्याच्या विचारामागील अनुभव मनोज यांनी कथन केला. ते सांगतात की, 'एकदा पुण्याहून मुंबईत येत असताना मला ट्रेनमध्ये एक सुशिक्षित तृतीयपंथी बांधव भेटला. त्याची जीवनकथा ऐकून मला जाणवले की, आपल्यासारख्या सो कॉल्ड सुशिक्षित लोकांमुळेच त्यांच्या वाट्याला हे उपेक्षितांचे जीणे आले आहे. जेव्हा अशा मुलांच्या घरातल्यांना त्यांच्या लैंगिक परिस्थितीबद्दल समजते, तेव्हा ते त्यांना समजून घेत नाहीत तर समाजातील खोट्या इभ्रतीपायी त्यांना घरातून बाहेर काढतात. कितीही चांगल्या किंवा सुशिक्षित घरातून आलेल्या या लोकांना पदोपदी अवहेलना सहन करावी लागते किंवा कायम त्यांची चेष्टा केली जाते. मुळात आपणच त्यांना मुख्य प्रवाहात सामील करुन घेण्याऐवजी त्यांची कायम अवहेलना करत राहतो. अशा परिस्थितीत त्यांच्यासमोर फक्त भीक मागून जगण्याचा उपाय शिल्लक राहतो आणि ही परिस्थिती आपणच त्यांच्यावर आणून ठेवली आहे. त्यामुळे मला या लोकांसाठी काहीतरी प्रयत्न करायचे आहेत.'
मनोज यांच्या पत्नीचे आणि त्यांच्या मित्रपरिवाराचे त्यांना या समाजकार्य़ात मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळते. तसेच त्यांच्या घरमालकानेदेखील त्यांच्या या उपक्रमाला पाठिंबा देत, त्यांना या वृद्ध माणसांना घरी ठेवण्याची परवानगी दिली, असे मनोज सांगतात. मनोज यांच्या या समाजकार्य़ाची महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाने दखल घेत त्यांना उत्कृष्ट समाजसेवेकरिता 'महाराष्ट्र दिप' या पुरस्काराने सन्मानित केले आहे. आपल्यापैकी अनेकांच्या समोर 'रिल लाईफ हिरो'चे आदर्श असतात किंवा आपण कायम त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या, त्यांना मदतीचा हात देणाऱ्या मनोज पांचाळ या 'रिअल लाईफ हिरो'चा आदर्श ठेवल्यास आपल्या आसपास सकारात्मक बदल नक्कीच घडतील, ज्याचा फायदा आपल्या समाजालाच होईल.
यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा संबंधित कहाण्या :