Brands
Discover
Events
Newsletter
More

Follow Us

twitterfacebookinstagramyoutube
ADVERTISEMENT
Advertise with us

‘वेस्टर्न इंडिया स्पोर्टस असोसिएशन’च्या मोटरबाईक्स रँलीच्या आयोजनातही शिस्तबद्ध नियोजन आणि सामाजिक भान जपणारे ‘ऍडवेंचर स्पोर्टस मार्शल ट्रेनर ’ निलेश पटणी!

‘वेस्टर्न इंडिया स्पोर्टस असोसिएशन’च्या मोटरबाईक्स रँलीच्या आयोजनातही शिस्तबद्ध नियोजन आणि सामाजिक भान जपणारे ‘ऍडवेंचर स्पोर्टस मार्शल ट्रेनर ’ निलेश पटणी!

Sunday January 31, 2016 , 7 min Read

भारतासारख्या देशात रस्ते वाहतूक हा विषय एकविसाव्या शतकात आज देखील गुंतागुंतीचा आणि असुरक्षेचा समजला जातो. आपल्या देशातील रस्ते वाहतूक करणा-या चालक-वाहक मंडळीमध्ये रस्ता सुरक्षा याविषयात जाणिव-जागृतीची त्यामुळेच आजही खूपच गरज भासते. रस्त्यावर आपली गाडी वेगाने हाकताना धोके स्वीकारावे लागतात आणि त्याचवेळी स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षेची हमी देखील घ्यावी लागते. अशा प्रकारे समाजभान ठेऊन आपल्या देशातील निकृष्ट दर्जांच्या रस्त्यांवरही चांगल्याप्रकारे मोटारड्राईव्ह करणे म्हणजे कौशल्याचेच काम असते. त्यात जीवनाचे धोके-वळणे यांना कसे सामोरे जावे याचे स्वयंप्रशिक्षण असते. ‘ऍडवेंचर स्पोर्टस’ म्हणून या गोष्टीला जेंव्हा खेळाचा चेहरा मिळतो तेंव्हा ओघानेच अशा सा-या सामाजिक गोष्टी देखील तुम्हाला शिकता येतात. त्यामुळे मुलखावेगळा असला तरी हा खेळ समाजाच्या जाणिव-जागृतीच्या दैनंदिन जीवनाच्या गरजांना व्यापून टाकणारा आहे हे लक्षात येते. या खेळातल्या करिअरला फारसं गांभिर्यानं घेतलं जात नाही.

महाविद्यालयीन जीवनात ट्रेकिंगच्या विश्वात मुशाफिरी करतानाच नाशिकच्या निलेश पटणी यांना १९९४मध्ये मोटरबाईक्सच्या इव्हेंटसाठी मार्शल म्हणजे कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या आय़ुष्याचा ट्रॅकच बदलून गेला. नाशिकमधली वेस्टर्न इंडीया स्पोर्टस् असोसिएशन म्हणजेच WISA ही संस्था ऍडव्हेंचर स्पोर्टस् मधलं मोठं नाव. नाशिककरांना विद्यूत वेगानं, धूळीचे लोट उडवत पळणाऱ्या गाड्या पहाण्याची आवड आणि आता सवय WISA मुळेच झालीय. या संस्थेच्या कार्यकारी सद्स्यांपैकी एक असलेले निलेश पटणी, व्यवसायाने करसल्लागार आहेत. पण आपल्या जगावेगळ्या छंदाला जोपासताना त्यांनी या क्षेत्रातील समाजभान जागे ठेवण्याचा आणि त्यायोगे लोकशिक्षणाचा वसा चालवल्याचे ‘युअरस्टोरी’ने त्यांच्याशी केलेल्या चर्चेतून स्पष्ट झाले.

image


“एखाद्या राष्ट्रीय ‘चॅम्पिअनशीप इव्हेंट’ची तयारी जवळपास चार-पाच महिने आधीपासून सुरु होते. ज्या मार्गानं गाड्या धावणार आहेत त्या मार्गाचे सर्वेक्षण केले जाते. त्या मार्गावरची गावं, चालू बांधकामं यांचा अभ्यास करून अहवाल तयार केला जातो. तो फेडरेशनच्या वतीने मग पोलिस, गृह खात्याची परवानगी घेताना दिला जातो, त्या मार्गावरील प्रत्येक हॉस्पिटलला ‘हाय अर्लट’ दिला जातो. ‘ट्रॉमा ऍम्ब्युलन्स’ तैनात असतात. तसंच कोणताही अपघात हाताळण्यासाठी डॉक्टर्सना सज्ज रहावं लागतं. ही सगळी तयारी झाली की ‘रॅली ड्रायव्हर्स’ना ‘रोड बुक’ दिलं जातं. दोन दिवस चालणाऱ्या या नॅशनल चॅम्पिअनशीपच्या इव्हेंटसाठी २०० ते २५० कार्यकर्ते आणि मार्शल्स काम करत असतात आणि हे सारे काही आतंरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांनुसार पार पाडावे लागते.” निलेश आपल्या व्यवसायातील तंत्रकौशल्याबाबत सांगतात.

ते म्हणाले की, “मार्शलचं काम हे अत्यन्त कुशलतेचं असतं. रेस आणि रँली असे यातील दोन मुख्य प्रकार असतात. स्पर्धा सुरु झाली की सगळे स्पर्धक एकाचवेळी गाडी सुरु करत नाहीत. दर दोन मिनिटांनी एक अशा पद्धतीनं गाडी सोडतात. या संपूर्ण ‘रुट’मध्ये जो ‘ब्रेक टाईम’ असतो तो वेळ अचुकतेनं मोजणं हेच मार्शलचं काम. त्यासाठी त्याच्याकडे ‘दृष्टी’ हवी”.

image


जमिनीवर आखलेल्या रेषेला गाडीचा टायर लागला की लग्गेच शिट्टी वाजवायची, ‘ऍट द सेम टाईम स्टॉप वॉच’मध्ये नोंद करायची. यात मायक्रो सेंकदाचा जरी फरक पडला तरीही फायनल रिझल्ट बदलू शकतो. असं सगळं जोखमीचं काम.

“मला सुरवातीला दिलेल्या मार्शल या जबाबदारीतील माझे प्राविण्य पाहून मला हळूहळू इतर जबाबदाऱ्याही मिळत गेल्या. मार्शल ते चॅम्पिअनशीपचा ‘डेप्युटी क्लर्क ऑफ कोर्स’ असा गेल्या २१ वर्षातील निलेश यांच्या प्रवासाचा वेग थक्क करुन सोडणारा आहे.

हा थक्क करुन टाकणारा नेमका प्रवास त्यातील संघर्ष आणि त्यावर मात करताना त्यांना आलेला अनुभव काय आहेत हे जाणून घेण्याचा ‘युअर स्टोरी’ने प्रयत्न केला. त्यावेळी बोलताना निलेश म्हणाले की, “ मार्शल म्हणून त्यांचं कौशल्य वाखाणण्याजोगं आहे, म्हणूनच गेली १०-१२ वर्षे ते मार्शल ट्रेनर म्हणून या क्षेत्रात येणाऱ्या नवोदितांना मार्गदर्शन करताहेत. ‘स्पीड तर हवा पण सेफ्टी’ सांभाळून हे या खेळाचं तंत्र आहे. ज्याला ते जमलं तो जेता. “चॅम्पिअनशीपच्या निमित्तानं वेगवेगळ्या रॅली ड्रायव्हर्सना भेटलो. त्यांची स्टाईल, त्यांचं ड्रायव्हिंग स्कील्स् जवळून पहाता आली. या संपूर्ण खेऴात वेळ हा मौल्यवान आहे. कमीत कमी वेळ आणि पेनल्टीमध्ये जिंकणं यातच तुमचा कस आहे.” असे ते सांगतात.

गेली २१ वर्ष वेगवेगळ्या चॅम्पिअनशीपच्या निमित्तानं खूप माणसं भेटली. वेगाचं वेड त्यांच्या डोळ्यात दिसतं. त्या वेगानं त्यांना झपाटून टाकलेलं मी पाहिलय. ते सांगतात की “या ड्रायव्हर्सना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचता यावं यासाठी आम्ही राबत असतो. माझ्याबरोबर चार लोकांची टीम असते. संपर्क,समन्वय आणि बिनतारी GPS तंत्रज्ञान यांचा योग्य मेळ असेल तर ‘इव्हेंट’ यशस्वी होतोच, ते सांगतात.

image


या सगळ्या खेळांना आता खूपच प्रसिध्दी मिळायला लागली आहे. पण पंचवीस वर्षांपूर्वी जेंव्हा दूरचित्रवाणी किंवा मोटारगाड्यांचे जग फारसे विस्तारले नव्हते त्याकाळात मराठी तरुणांसमोर अशा प्रकारच्या खर्चिक खेळाची आवड जोपासणे फारसे शक्य नव्हते. मात्र त्याही काळात काही जाणत्या लोकांच्या मार्गदर्शनाने नाशिक सारख्या तृतीयश्रेणीच्या त्याकाळातील शहरात याखेळाचा विस्तार होताना पटणी यांनी आपला तरुणवयातील छंद देखील जोपासला नव्हे त्यात प्राविण्य मिळवतानाच त्याला समाजभान, आणि दैनंदिन जीवनाला जोडण्याचा यशस्वी प्रयत्न देखील केला असे त्यांच्याशी बोलताना स्पष्ट झाले.

ते म्हणाले की, हे सारे आयोजन त्याचा दर्जा आंतरराष्ट्रीय दर्जाचा असावा लागतो त्यामुळे त्यातील धोके आणि सुरक्षा तसेच वक्तशिरपणा यांचा अचूक मेळ घालावाच लागतो. मग त्यासाठी प्रशिक्षण घेणे ओघाने आलेच. महाराष्ट्रात मुंबई-पुण्यात असा खेळ लोकप्रिय करण्यासाठी अनेक प्रायोजक मिळत असतात पण नाशिक सारख्या शहराच्या परिसरात त्याची आवड आणि व्यावहारिक आयोजनाची सांगड घालताना अनेक अनुभव आले, पटणी सांगतात.

आज सरकार देखील रस्ता सुरक्षा अभियान सारखे उपक्रम राबवते पण प्रत्येक काम काही सरकारनेच करावे ही आपल्या देशातील मानसिकता दूर झाली पाहिजे असे पटणी आत्मविश्वासाने सांगतात. ते म्हणाले की, रस्त्यावर स्वत:चे वाहन चालवताना त्यातील खरी प्रतिष्ठा तेंव्हाच दिसते जेंव्हा ते चालवणा-याला रस्त्यावरच्या इतर लोकांच्या सुरक्षेची हमी देता येते. स्वत:सोबत इतरांनाही वेगाची मर्यादा सांभाळताना सुरक्षेची जाणिव देणारे चालकच नेहमी आदर्श ठरतात. वाहन चालवताना कमीत कमी हॉर्नचा वापर करणे आणि ध्वनी प्रदुषण तसेच वायू प्रदुषण होणार नाही याचेही भान चालकांना असायला हवे ही सामाजिक जबाबदारी नकळत त्याच्या वागण्यात येण्यासाठी ‘मोटर रँली’सारख्या ‘इवेंट’ची नक्कीच मदत होते. याशिवाय सायकल रँली किंवा ‘मोटर रेस’च्या या आयोजनात प्रत्येक वेळी एक सामाजिक संदेशाची संकल्पना राबवून तश्याप्रकारे गाड्या सजवल्या गेल्या आणि लोकांपर्यंत विशिष्ट संदेश पोहोचवण्यात आला.

दररोज वाहतूक कोंडीत गाड्या हाकणा-या चालकांना वेगानेही गाड्या हाकताना आपली जबाबदारी समजता यावी असा या आयोजनातील महत्वाचा सामाजिक हेतू असतो. त्यासाठी रस्ते वाहतूक विभागाच्या अनेक कार्यक्रमांत पटणी तांत्रिक सल्लागार म्हणून सहभागी होतात. सुरक्षीत वाहने कशी हाकावी याचे लोकशिक्षण देण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. नागमोडी वळण घेताना वाहन कसे हाकावे, वाहन मागे घेताना कोणती काळजी घ्यावी, वायू-ध्वनी प्रदुषण टाळून वाहने कशी हाकता येतात याचे तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य प्रशिक्षण आजच्या तरुण चालकांना असले पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असतो. नाशिक मधील नँब या संस्थेच्या माध्यमातून अंध बांधवांसाठीही वाहन चालवण्याचा आनंद देणारे आयोजन करताना त्यांचा मोलाचा सहभाग असतो. “ब्रेल लिपीच्या माध्यमातून जेंव्हा हे अंध बांधव आपले वाहन चालवण्याचा आनंद मिळवतात त्यावेळी त्यांच्या चेह-यावरील हास्य पाहणे हा अमृतानुभव असतो,” असे पटणी सांगतात.

आपल्या छंदातून रस्ते सुरक्षा याविषयातील एक विश्व तयार करणा-या पटणी यांना भविष्यातील त्यांच्या कारकिर्दीचा टप्पा म्हणजे राज्यातील इतर शहरातही अशा प्रकारची आयोजने करुन लोकांना वाहने चालवताना ‘टिएसबी’ म्हणजे वेळ सुरक्षा आणि अंतर यांचा कसा मेळ घालावा याचे कौशल्य-प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करायचा आहे. लोकांना यासाठी प्रोत्साहित करणे, प्रेरीत करणे हे केवळ सरकारचे काम नाही असे सांगून ते म्हणतात की आपणही त्यासाठी खूप काही करु शकतो. त्यांच्या ‘विसा’ या संस्थेच्या वेबपोर्टलच्या माध्यमातूनही यासाठी नेहमीच माहिती उपलब्ध करुन दिली जाते. प्रवासात वाहनात काही बिघाड झाले आणि तेही एखाद्या अडचणीच्या ठिकाणी, त्यावेळी आपण स्वत:च वाहनाची दुरुस्ती कशी केली पाहिजे हे देखील साहसी काम आहे त्याचा जीवनातील इतरवेळी सुध्दा उपयोग होतो असे ते म्हणतात. आत्मविश्वासने जगणा-या माणसाला जीवनातील धोके स्वीकारून त्यातून यश मिळवण्याची सवय करून देणे हा साहसी खेळांचा आणखी एक महत्वाचा लाभ असतो असे ते म्हणातात. हे सारे करत असतानाच सन २०१२पासून त्यांनी आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा यासाठी जाणिव जागृतीचेही काम हाती घेतले आहे. ते म्हणतात की सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत धाब्यावर जेवायला गेलो तर त्यापरिसरातील कचरा गोळा करुन आपणच तो कचरा कुंडीत टाकला तर तो कचरा इतस्तत: टाकणा-यांना नकळत त्याची जाणिव होते आणि ते त्यानंतर कचराच होणार नाही यासाठी दक्ष राहतात असा अनुभव आला आहे. पण हे करतानाही धोका पत्करावा लागतो असेही त्यांचे म्हणणे असते काहीवेळा लोक उध्दटपणाने सांगतात की, ‘आमचा कचरा आम्ही पाहून घेऊ’ त्यावेळी त्यांना अस्वच्छता करु नका हे सांगण्याची कला, आत्मविश्वास आपल्यात असला पाहिजे असे ते सांगतात.

गेल्या अनेक वर्षात आपल्या सोबत २००-२५० जणांच्या चमूला घेऊन अनेक सामाजिक जागृतीचे उपक्रम ते राबवित असतात. मोटर रँली-रेसींगच्या या ऍडवेंचर इवेंट करण्यामागेही इतके समाजभान आणि जाणिव-जागृती असू शकते हे पाहणेही विरळाच नाही का?त्यात मोटरबाईकिंग म्हणजे वेगानं चालणाऱ्या गाड्यांवर पैसे खर्च करायचे असा साधा हिशोब लोकं करतात. दोन दिवस चालणाऱ्या या चॅम्पिअनशीपवर १८-२० लाख रुपये खर्च होतो. त्यामुळे हा ‘ऍडव्हेंचर स्पोर्टस् तसा खर्चिक आहे. पण महेंद्रा, कॅस्ट्रॉल, MRF सारख्या बड्या कंपनीज् रॅली ड्रायव्हरला स्पॉन्सर करतात. त्यांच्या परफॉर्मन्सवर पैसे खर्च करतात, परदेशी प्रशिक्षणाला पाठवतात. सध्या भारतात गौरव गील हा सातत्यानं तीन वर्ष चॅम्पिअनशीप पटकावलेला रॅली ड्रायव्हर आहे. चॅम्पिअनशीपचा हा सगळा जामानिमा, असंख्य लोकं, स्पर्धक, यांना एकत्र बांधून ठेवते ती घडाळ्याची टिकटिक. प्रत्येक सेकंद जसं जसं पुढे सरकतं तसतसं कोणाचं तरी नशीब बनत असतं किंवा बिघडत असतं. कोणीतरी जेता तर कोणीतरी पराजीत होतं असतं. वेग आणि वेळाचं हे जादुई जग अनुभवायचं असेल तर एकदातरी या मोटरबाईकिंगच्या विश्वाची सफर करून यायलाच हवी.

युवरस्टोरी वरील यशोगाथा, प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी आमच्या YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या.

यासारख्या आणखी काही कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

समाजाच्या भल्यासाठी धडपडताहेत ‘बाईकर्स फॉर गुड’,प्रत्येक प्रवासाचा उद्देश जन-जागृतीचा!

ज्यांनी मुष्टियुद्धाचे कधीच प्रशिक्षण घेतले नाही, ते आज आंतरराष्ट्रीय खेळाडूंना देत आहेत ‘बॉक्सिंग’ चे धडे ...

ग्राहकांच्या खिशाला परवडेल आणि तरीही बहुआयामी वाहन व्यवसाय करण्याचं झीपझॅपव्हील्सच लक्ष्य