कॉलेजच्या प्रोजेक्टमधून स्टार्टअप – foodinger.in

कॉलेजच्या प्रोजेक्टमधून स्टार्टअप – foodinger.in

Friday November 13, 2015,

2 min Read


कोणताही अभ्यासक्रम शिकताना तुम्ही जर एखादा प्रोजेक्ट अभ्यासाचा भाग म्हणून केला तरी तो कदाचित तुमच्या जीवनाला कलाटणी देणार ठरु शकतो. रायपूरच्या एनआयटीमध्ये शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी अशाचप्रकारे रेस्टारंट आणि घरपोच सेवा देण्याच्या क्षेत्रात पाऊल टाकलं. इंजिनीअरींगच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून त्यांनी हा प्रोजेक्ट केला. पण यातूनच छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये सध्या सगळ्यात जास्त मागणी असलेल्या foodinger.in स्टार्टअपची सुरूवात झाली.


image


रायपूरच्या एनआयटीमध्ये शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या अमन, अनिकेत, अपूर्वा आणि यश यांनी यावर्षीच्या सुरूवातीलाच एप्रिलमध्ये हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला त्यांनी एक वेबसाईट तयार केली आणि शहरातील विविध हॉटेल आणि रेस्टॉरंटशी संपर्क साधला. या वेसबाईटच्या माध्यमातून लोक कोणत्याही हॉटेलमधील जागा आरक्षित करु शकतात तसंच त्यांना १० ते १५ टक्के सूटही मिळते. या व्यवसायाची सुरूवात कॉलेजमधील एक प्रोजेक्ट म्हणून केली होती आणि प्राध्यापकांनीही त्यात मदत केल्याचं फूडइंगर डॉट इनचे सह संस्थापक अमन सांगतात.


image


अमन यांच्या मते रायपूर शहरात अशाप्रकारचा प्रयोग अगदीच नवीन होता, पण त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि पहिल्याच दिवशी त्यांना पन्नासपेक्षा अधिक ऑर्डर मिळाल्या. लोकांच्या या प्रतिसादामळे याच प्रयोगातून स्टार्टअप सुरू करण्याचा विचार त्यांनी सुरू केला. त्यातूनच मग त्यांनी विविध हॉटेल्स आणि रेस्टरॉन्ट्समधून घरपोच सेवा देण्याचाही निर्णय घेतला, कारण शहरात त्याआधी अशी सेवा देणारे किमान हजार रुपयांची ऑर्डर घरपोच देण्यासाठी दीडशे रुपये वसूल करत होते.

रायपूर शहरात विद्यार्थ्यांची संख्याही खूप आहे, पण हॉटेलमधून घरपोच जेवण मागवण्याएवढं त्यांचं बजेट नसतं. त्यामुळे स्वस्तात अशी सेवा सुरू करण्याचा निर्णय या मित्रांनी घेतला. फूडइंगर डॉट इनच्या ऍपवरुन ग्राहकांना आपली ऑर्डर बुक करता येते आणि अडीचशे रुपयांपेक्षा जास्त ऑर्डर असेल तर घरपोच सेवेचं शुल्क लागत नाही. अडीचशे रुपयांपेक्षा कमी ऑर्डर असली तर घरपोच सेवेचे ३० रुपये मोजावे लागतात. आता ९ जणांची टीम असून त्यातील ५ लोक घरपोच सेवा देण्याचं काम करतात, पण सुरूवातीला स्वत: घरपोच सेवा देण्याचं काम केल्याचं अमन सांगतात. पहिल्या महिन्यात फक्त ३६ ऑर्डर मिळाल्या. पण त्यानंतर ऑर्डर वाढू लागल्या आणि आता महिन्याला आठशे ते हजार ऑर्डर येत असल्याची माहिती अमन देतात. त्याचबरोबर लवकरच महिन्याच्या ऑर्डरची संख्या दोन हजारांवर जाईल असा त्यांचा दावा आहे.


image


सध्या रायपूर शहरातील दीडशेपेक्षा जास्त रेस्टॉरंट्स foodinger.in सोबत जोडलेले आहेत. शहरातील सगळ्याच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सला सोबत घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर ते सध्या व्यवसाय ते व्यवसाय या मॉडेलवर काम करत आहेत, पण भविष्यात व्यवसाय ते ग्राहक या मॉडेलवर काम करण्याची त्यांची योजना आहे. त्याचबरोबर सध्याचा त्यांचा व्यवसाय टू टायर दर्जाच्या शहरांमध्ये वाढवण्याचं त्यांचं ध्येय आहे. सध्या त्यांचा व्यवसाय वेबसाईट आणि ऍपच्या ऍन्ड्राइड व्हर्जनच्या माध्यमातून चालतोय. पण लवकरच ऍपचं आयओएस व्हर्जन तयार करण्याची त्यांची योजना आहे.