वंदना जैनः कलाविश्वातील आनंदयात्री
सर्जनाचा ध्यास घेणाऱ्या उद्योजिकेची ही कथा... आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकून कलाक्षेत्रात भरीव काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांच्या आयुष्यात आणखी एक रंगतदार वळण आले.... आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून इतरांच्या आयुष्यात आनंद आणि उल्हासाची उधळण करणाऱ्या या कलाकार म्हणजे वंदना जैन... कलेच्या दुनियेत त्या ओळखल्या जातात ऍना जे या नावाने... जाणून घेऊ या त्यांची ही कहाणी...
वंदना या दिल्ली विद्यापीठाच्या पदवीधर आहेत तर दिल्ली इन्स्टीट्यूट ऑफ आर्टस् ऍन्ड टेक्निकल एज्युकेशन येथून त्यांनी फाईन आर्टस् अर्थात ललित कला या विषयात पदविका पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी जाहिरात क्षेत्रासारख्या एका सर्जनशील क्षेत्रात कामाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी काही अतिशय सुंदर जाहिरात मोहिमा आणि दूरदर्शनवरील जाहिरातींची निर्मिती केली. बारा वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी जाहिरात क्षेत्रात काम केले. त्या दरम्यान त्यांनी लोव लिंटास, ग्रे वर्ल्डवाईड, पब्लिसिस इंडीया, जेडब्ल्यूटी, यांसारख्या भारतातील नामवंत जाहिरात संस्थांसाठी आणि नेस्टले, पेप्सी, सॅमसंग, व्हर्लपूल, मारुती सुझुकी, डीश टीव्ही, डाबर आणि एचपी यांसारख्या आघाडीच्या ब्रॅंडस् साठी काम केले.
मात्र जाहिरात क्षेत्रातील एवढी यशस्वी कारकिर्द असूनही वंदना आतून काहीशा अस्वस्थ होत्या. त्यांचे अंतर्मन सतत त्यांच्या कलेकडे ओढ घेत होते. शेवटी दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या मनाचे ऐकले आणि ‘प्रिटी पिंक पेबेल्स’ ला सुरुवात झाली.
स्वतःला हॅपीनेस डेवलपर अर्थात आनंदाची निर्माती म्हणवून घ्यायला त्यांना आवडते. त्यांच्या मते एका खास उद्दीष्टासाठी त्यांचा जन्म झाला आहे – तो म्हणजे कलेच्या माध्यमातून आपल्या भवतालच्या जगात आनंद आणि उल्हासाची उधळण करायची आणि रोजच्या आयुष्यात कलेचा अविष्कार करायचा... आणि नेमक्या याच उद्देशाने ‘प्रिटी पिंक पेबेल्स’चा जन्म झाला.
दोन वर्षांपूर्वी त्यांनी ‘प्रिटी पिंक पेबेल्स’ हे डोमेन नेम स्वतःसाठी राखून ठेवले. ‘प्रिटी पिंक पेबेल्स’ सुरुवात झाली ती एक ब्लॉग म्हणून... तर अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी या संकेतस्थळाला सुरुवात झाली. वंदना यांनी यामाध्यमातून त्यांच्या कलाकृतींची विक्री करण्यास सुरुवात केली असून काही कलाकृतींची विक्रीही झाली आहे. आपल्याला मिळत असलेला प्रतिसाद अतिशय जबरदस्त असल्याचे वंदना आवर्जून सांगतात.
“ आजकाल सगळ्यांचीच घरे काही खूप प्रशस्त नसतात. पण तरीदेखील प्रत्येकजण आपल्या घरात एक छानसा, आरामदायी कोपरा निर्माण करण्यास नक्कीच उत्सुक असतो. त्या ठिकाणी या आटोपशीर कलाकृती छान शोभून दिसतात,” वंदना सांगतात.
त्या पुढे म्हणतात, “ ऑनलाईन कलाविष्कार आता हळूहळू चांगला आकार घेऊ लागला आहे. स्वतःच्या प्रतिमेला धार लावण्याची संधी येथे कलाकारांना मिळते. सर्वात महत्वाचे म्हणजे यामुळे कलेला एक व्यावसायिक बाजूही प्राप्त झाली आहे. त्यामुळे कलेच्या सकारात्मक वर्धनाची मला आशा आहे.”
कलेच्या दुनियेत वंदना ओळखल्या जातात त्या ऍना जे या नावाने... ‘ऍना’ त्यांच्या नावातील शेवटची तीन अक्षरे तर ‘जे’ हे आडनावातील पहिले अक्षर... गंमत म्हणजे ऍना हे एक हिब्रु/अमेरिकी नाव असून त्याचा अर्थ डौल किंवा शोभा असा आहे.
‘प्रिटी पिंक पेबेल्स’ हा स्वतःचा ब्रॅंड उभारण्यात गर्क असलेल्या वंदना सहाजिकच एक कलाकार तर आहेतच पण त्याचबरोबर त्या एक लेखिकाही आहेत. तसेच कॅनव्हासवरील कलाकृतींबरोबरच खूपच सुंदर अशा किटल्या आणि गारगोट्यांचा वापरही त्या आपल्या कलाकृतींमध्ये मोकळेपणाने करतात. या गोष्टी त्यांच्या कलाकृतींना निश्चितच वेगळेपण मिळते. त्याचबरोबर भविष्यात ‘ ऍबस्ट्रॅक्ट हार्मनिज’ या ब्रॅंड अंतर्गत हाताने रंगविलेले दुपट्टे आणि त्यासारखीच लाईफस्टाईल उत्पादनेही बाजारात आणण्याचा त्यांचा मानस आहे.
वंदना यांच्या मते गेल्या दोन वर्षांत त्यांना खूपच चांगल्या गोष्टी शिकता आल्या आहेत. सुरुवातील ब्लॉग आणि आता स्वतःचे संकेतस्थळ सुरु करुन इंटरनेटच्या मदतीने त्या एक उद्योजिका बनल्या आहेत.
“ हे फारसे अवघड नव्हते आणि खरे तर व्यवसाय वाढविण्यासाठी याची मला मदतच झाली. त्याशिवाय काही मोक्याच्या ठिकाणी काही पॉप अप शोप्स सुरु करुन त्यामाध्यमातून किरकोळ विक्रीही सुरु केली आहे,” वंदना सांगतात.
वंदनाला एक कलाकार म्हणून स्वतःची ओळख बनवायची आहे. तसेच फावल्या वेळात त्या त्यांच्या लेखनाचा छंदही जोपासत असून सध्या एका लघुकथांच्या संकलनाचे काम करत आहेत.
त्याचबरोबर त्या हाताने रंगविलेल्या वस्तूही बनवत असून त्यांना कलेबरोबर लाईफस्टाईल आणि फॅशन यांची सांगड घालायची आहे. सध्या त्या एकट्याच काम करत आहेत मात्र लवकरच त्यांना एखाद्या दागिन्यांच्या ब्रॅंडशीही जोडून घ्यायचे आहे... जेणेकरुन लाईफस्टाईल उत्पादनांसाठी मदत होईल.
आपली सर्व बचत त्यांनी यामध्ये गुंतविली असून कलांमध्ये वैविध्य देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर आगामी काळात त्या कदाचित त्यांच्या कलाकृतींच्या संग्रहाची एखादी मर्यादीत आवृत्ती किंवा हाताने रंगविलेल्या कलाकृती आणू शकतात. “ शेवटी ही एक कला आहे आणि माझ्या कलाकृतीतील गुलाबी ठिपक्यालाही काही उद्देश आहे. कोणालाच लहान वाटता कामा नये आणि माझा असा दृढ विश्वास आहे की, सगळे काही असामान्य असते,” वंदना सांगतात.
त्यांचा दैवावर विश्वास आहे आणि कलाकार हा केवळ ईश्वरापर्यंत पोहचण्याचा एक अध्यात्मिक मार्ग आहे, असे त्या मानतात.
या संपूर्ण प्रवासात त्यांच्या कुटुंबाची भूमिका अतिशय महत्वाची आहे. एक अतिशय समजूतदार असे कुटुंब आपल्याला मिळाल्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. वंदनांकडून हा कलेचा वारसा घेतला आहे त्यांच्या साडे सात वर्षांच्या मुलाने... “ शाळेतून आल्याआल्या तो धावत माझ्या स्टुडिओत येतो, हे पहाण्यासाठी की मी दिवसभरात काय नविन केले आहे, हा अनुभव खूपच छान आहे. त्याची आई काही तरी निर्मितीचे काम करते आहे, हे त्याला माहित असते आणि त्याच्या चेहऱ्यावर तो आनंद पहाणे मस्तच असते. माझा स्टुडिओ ही एक आनंदी जागा आहे आणि कधीतरी तो देखील तेथे येऊन काम करतो.. त्या जागेत त्याला काम करताना पहाणे फारच आनंददायक असते,” त्या अभिमानाने सांगतात.