एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या लष्करातील सात महिला अधिकाऱ्यांपैकी एक रिटायर्ड मेजर प्राची गोळे वीएसएम
'शारीरिकदृष्ट्या मजबूत असलेली व्यक्ती एव्हरेस्ट शिखर सर करू शकत नाही तर मानसिकदृष्ट्या मजबूत असलेली व्यक्तीच एव्हरेस्ट सर करू शकते. कारण एका उंचीवर तुमची शारीरिक क्षमता संपुष्टात येते. तेव्हा तुमचे मनोधैर्यच तुम्हाला पुढे जायची प्रेरणा देत असते', हे उद्गार आहेत रिटायर्ड मेजर प्राची गोळे विशिष्ट सेवा मेडल यांचे. २०१२ साली भारतीय लष्करातील सात महिला अधिकाऱ्यांनी नेपाळ मार्गे एव्हरेस्ट शिखर सर करत लष्कराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता, ज्यांचे फोटो आज सोशल माध्यमांवर गौरवाने शेयर केले जात आहेत. लष्कराच्या या एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी झालेल्या सात महिला अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी म्हणजे प्राची. त्यांच्या या अतुल्य आणि साहसी कामगिरीकरिता त्यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते विशिष्ट सेवा मेडल प्रदान करण्यात आले होते. मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या प्राची यांचा एक उत्कृष्ट एथलेट ते कॉलसेंटरमध्ये नोकरी करणारी तरुणी तसेच आर्मीतील प्रवेश ते यशस्वी एव्हरेस्ट मोहिमेबद्दल आम्ही त्यांच्याकडून विस्तृतपणे जाणून घेतले.
प्राची यांनी लहानपणापासूनच एथलेटीक्सचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. कालांतराने त्यांनी जिमनॅस्टीक खेळण्यासदेखील सुरुवात केली. मात्र दोन्ही खेळ एकाच वेळेस खेळू शकत नसल्याने त्यांनी एथलेटीक्सची निवड केली आणि त्याच खेळाचे पुढे प्रशिक्षण घेण्याचे निश्चित केले. विवेक विद्यालयमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान खेळ तसेच एनसीसीकरिता वेळ देता यावा म्हणून त्यांनी कला शाखेची निवड केली. गोरेगावमधील पाटकर विद्यालयातून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्या राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर खेळत होत्या. राष्ट्रीय स्तरावर खेळण्याच्या वेळेस बाला गोविंद हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक प्राची यांना प्रशिक्षण देत होते.आर्मीत जायच्या आपल्या निर्णयाबद्दल बोलताना प्राची सांगतात की, 'मी एका मध्यमवर्गीय घरातली मुलगी आहे. मी भलेही लहानपणापासून एथलेटीक्सचे प्रशिक्षण घेतले किंवा राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर खेळले असेन. मात्र मला एथलेटीक्समध्ये कारकिर्द घडवायची नव्हती. कारण माझ्या आईचे एक ठाम मत होते की, मुलींच्या नावापुढे फक्त मिस आणि मिसेस एवढेच न लागता काहीतरी पदवी लागायला हवी. माझी मोठी बहिण अभ्यासात खूप हुशार असल्यामुळे तिने वैद्यकिय क्षेत्राची निवड केली. त्यामुळे निश्चितच तिच्या नावापुढे डॉक्टर ही पदवी लागणार होती. तिच्या उलट मी शिक्षणात सर्वसामान्य होते. ७०-७५ टक्के मिळाले की, मला ते भरपूर वाटायचे. पण तेवढ्या टक्क्यांवर मी ना वैद्यकिय शिक्षण घेऊ शकत होते ना अभियांत्रिकीचे. त्यामुळे आठवीत शिकत असतानाच मी ठरवले होते की, मी आर्मीमध्ये जाणार. गणवेशाचे आकर्षण कोणाला नसते, मलादेखील गणवेशाचे आकर्षण होते. त्यामुळे मला गणवेशही मिळणार होता आणि नावापुढे पदवीदेखील लागणार होती. त्यानंतर मी त्या अनुषंगाने माहिती मिळवण्यास सुरुवात केली होती आणि त्यानुसार तयारी करण्यास सुरुवात केली होती. पाटकर महाविद्यालयातून इंग्लिश लिटरेचर या विषयात मी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर मी मुंबई विद्यापीठातून त्याच विषयात पदव्युत्तर पदवीदेखील घेतली आहे.'
जेव्हा प्राची यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण होत आले होते तेव्हा त्यांचे वडील ज्या मिलमध्ये कामाला होते ती डॉन मिल पूर्णपणे बंद पडली. त्यांची आई त्यावेळी आदर्श विद्यालय येथे शिक्षिका होती. प्राची यांच्या वडिलांची अचानक नोकरी गेल्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक अडचण निर्माण झाली होती. प्राची यांच्या भावंडांचे शिक्षण आईच्या एका पगारात जुळवणे, त्यांना अडचणीचे होत होते. घरच्या या परिस्थितीमुळे प्राची यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि एका कॉलसेंटरमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. कारण त्याकाळी एका पदवीधर विद्यार्थ्याला कॉलसेंटरमध्येच सर्वाधिक पगाराची नोकरी मिळत होती. प्राची सांगतात की, 'अनेकजण सांगतात, कॉलसेंटरमध्ये नोकरीला जाणारी मुलं बिघडतात. पण मी सांगते की, असे काही नसते. आपले संस्कारच आपल्याला घडवत असतात. कॉलसेंटरमध्ये नोकरी करत असताना माझ्या मनात एकच विचार होता की, माझ्या कुटुंबाला पैशाची गरज आहे आणि म्हणून मी नोकरी करत आहे. मी अडिच वर्षे कॉलसेंटरमध्ये नोकरी केली.' जेव्हा प्राची यांच्या कुटुंबाची आर्थिक अडचण संपली तेव्हा त्यांनी पुन्हा आर्मीच्या ध्येयावर लक्ष केंद्रीत केले. नोकरी करत असतानाही प्राची आर्मीसाठी अर्ज करत होत्या पण त्यांना त्यात यश मिळत नव्हते. याबाबत बोलताना त्या सांगतात की, 'मी एनसीसीमध्ये सी सर्टीफिकेट विथ अल्फा ग्रेडिंग होल्डर आहे. त्याकाळी ते सर्वात चांगले ग्रेडिंग होते, मी आयडीसी रिटर्न होते, या सर्व गोष्टी सकारात्मक होत्या पण मला कधी कॉल आला नाही. त्यामुळे मी २००६ साली कॅप्टन वंजारे यांच्या अकादमीमध्ये प्रवेश घेतला. कारण मला कॉल का येत नाही, हे मला जाणून घ्यायचे होते. तेव्हा मला समजले की, मी आर्मीच्या फॉर्ममध्ये सर्व माहिती बरोबर भरत होती. पण त्याच्या कव्हरवर मी संक्षिप्त माहिती लिहित नव्हती. त्यामुळे स्क्रिनिंगमध्येच माझा फॉर्म बाद होत होता. २००६ साली मी सरांच्या मार्गदर्शनाखाली आर्मीत पुन्हा अर्ज केला. त्याच वर्षी मला आर्मीमधून अलाहाबादसाठी कॉलदेखील आला. पण तेव्हा वैयक्तिक कारणामुळे मी तेथे सहभागी होऊ शकले नव्हते. त्यामुळे मी डिसेंबरमधील एब्सेंटी बॅचमध्ये अर्ज केला तेव्हा पुन्हा मला अलाहाबाद एसएसबीचा कॉल आला. तेथील सर्व परिक्षा, वैद्यकिय चाचण्या मी पार केल्या. मला आत्मविश्वास होता की, जर मी चाचणीत निवडले गेले तर नक्कीच मी मेरीटमध्ये येईन.' प्राची यांनी या परिक्षेसाठी अहोरात्र मेहनत घेतली होती. अखेरीस प्राची यांची मेहनत फळाला आली आणि त्या मेरीटमध्ये संपूर्ण भारतातून दुसऱ्या क्रमांकावर आल्या. प्राची यांच्या लष्करात जाण्याच्या निर्णयाला त्यांच्या कुटुंबातील लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. प्राची सांगतात की, 'मी लष्करात जायचे निश्चित केल्यावर माझ्या घरातल्या लोकांना फार आनंद झाला होता. याशिवाय माझ्या गावातील लोकदेखील आनंदित झाले होते. कारण आजवर आमच्या गावातील अनेक लोक लष्करात सहभागी झाले होते मात्र ते तेथे जवान म्हणून जात होते आणि मी लष्करात अधिकारी म्हणून रुजू होणार होते.'
आर्मीतील आपल्या सुरुवातीच्या काळातील प्रवासाबद्दल बोलताना प्राची सांगतात की, '५ एप्रिल २००७ रोजी मी (अकादमी) प्रशिक्षण संस्थेत रुजू झाले. मी या अकादमीमधूनदेखील मेरीट कार्ड होल्डर होते. याशिवाय त्या अकादमीमधील गोल्फ स्पर्धेची मी विजेतीदेखील होते. अकादमीनंतर माझे पहिले पोस्टींग जोधपूर येथे करण्यात आले. तेथे क्रॉसकंट्री धावण्याच्या स्पर्धेत मी सहभागी झाले होते. त्यापैकी एक क्रॉसकंट्री १२ किमी होती आणि त्यात सहभागी होणाऱ्यांमध्ये मी एकमेव महिला स्पर्धक होती. या स्पर्धेकरिता सहसा एक अधिकारी आणि सहा जवान असा गट बनविण्यात येतो. जोधपूरच्या इतिहासात आजपर्य़ंत या स्पर्धेत कोणतीही महिला सहभागी झालेली नाही. या स्पर्धेत माझा गट दुसऱ्या क्रमांकावर आला. स्पर्धा संपल्यानंतर पहिल्या क्रमांकावर आलेल्या गटाच्या अधिकाऱ्याने त्याचे मेडल आणि एक सुंदर सन्मानपत्र 'I don’t deserve it, You deserved it more than what I do' असे म्हणत माझ्याकडे सोपवले. आर्मीमध्ये मला मिळालेली ती पहिली शाबासकी होती आणि तेव्हा मला जाणवले की, मी केलेले प्रयत्न हे प्रामाणिक होते. आजही मी ते मेडल आणि सन्मानपत्र सांभाळून ठेवले आहे. तेव्हा मला माझ्या अधिकाऱ्यांनी विचारले की, तुला काय वाटते, मी तुला एका महिला अधिकाऱ्याप्रमाणे वागणूक द्यावी की एका अधिकाऱ्याप्रमाणे. तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे उत्तर दिले होते की, एका अधिकाऱ्याप्रमाणे. तेव्हा त्यांनी मला सांगितले की, तुला रात्रीची ड्युटी चेक करावी लागेल, तुला रात्री दोन वाजतादेखील ड्युटी चेक करायला मी पाठवू शकतो. माझे कार्यक्षेत्र खूप मोठे होते जवळपास २२ किमीचे. आर्मीमध्ये मी फार लहान वयातचं अनेक जबाबदाऱ्या निभावल्या. मला तिथे खूप छोट्या छोट्या गोष्टींमधुनदेखील बरेच काही शिकता आले. त्यानंतर मला माउंट एव्हरेस्ट सर करण्याची संधी मिळाली.'
एव्हरेस्ट सर करण्याच्या आर्मीच्या मोहिमेबद्दल आणि त्यातील आव्हानाबद्दल विस्तृतपणे बोलताना प्राची सांगतात की, 'मी आजवर अनेक गिर्यारोहण मोहिमा केल्या होत्या. मात्र माझ्या यादीत एव्हरेस्ट कधीच नव्हते. वैयक्तिकरित्या एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठीचा खर्च हा जवळपास २२ लाख ते २५ लाखांपर्यंत होतो. जो मला जमणारा नव्हता. मी अकरावीत शिकत होते, तेव्हा मी गिर्यारोहण मोहिमा करायला सुरुवात केली. मी तेव्हाच ठरवले होते की, मी भारतातील गिर्यारोहणाच्या मोहिमांमध्ये सहभागी होईन. आर्मीतल्या एव्हरेस्ट मोहिमेबद्दल सांगायचे तर २०१० साली आर्मीतील महिलांकरिता एव्हरेस्ट मोहिम आखणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली. तेव्हा ती फक्त बेसकॅम्पपर्यंतची मोहिम होती. नंतर त्यात एव्हरेस्ट शिखर सर करायचे, असे ठरवण्यात आले. एव्हरेस्ट मोहिमेकरिता जवळपास ४४ महिला अधिकाऱ्यांनी अर्ज केला. तब्बल दोन वर्षे आम्हाला विविध ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले. सियाचीनमध्ये आम्हाला बेसिक आणि एडव्हान्स प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर आम्हाला मनालीमध्ये काही काळ प्रशिक्षण देण्यात आले. अखेरीस आम्हा सातजणींची या मोहिमेकरिता निवड करण्यात आली. आम्ही सात महिला अधिकारी, तीन पुरुष अधिकारी, १२ जेसीओ आणि इतर रॅंकचे जवान या मोहिमेत सहभागी झालो होतो. आम्हाला पाठीवर ३० किग्रॅपेक्षा अधिक वजन घेऊन हा प्रवास साध्य करायचा होता. आम्ही नेपाळमधील लहानशा जिरी गावातून माउंट एव्हरेस्टच्या दिशेने प्रवास सुरू केला. जिरी येथून बेसकॅम्पपर्यंत गिर्यारोहण करण्यासाठी आम्हाला १७ दिवसांचा कालावधी लागला. बेसकॅम्पपर्यंतच्या गिर्यारोहणामुळे आमच्या शरिराला त्या वातावरणाशी जुळवून घेण्याची सवय होत होती पण जगाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज होती. आम्ही या गिर्य़ारोहणाचे एक व्यवस्थित नियोजन केले होते. विशेष म्हणजे, सर्व गिर्यारोहक ते कटाक्षाने पाळतदेखील होते. बेसकॅम्पनंतर आमच्यासमोर आलेले पहिले आव्हान म्हणजे खुम्बू बर्फवृष्टी. या वातावरणात गिर्यारोहण करणे, हे सोपे नव्हते. प्रत्येक पाऊल तेव्हा सांभाळून टाकावे लागत होते. अनेक रुंद दऱ्यादेखील ओलांडाव्या लागत होत्या. जवळपास ६४०० मीटरचा प्रवास केल्यानंतर आम्ही कॅम्प २ मध्ये पोहोचलो. तेथून आम्हाला कॅम्प ३च्या दिशेने जायचे होते, जे जवळपास समुद्रसपाटीपासून ७२००-७४०० मीटरवर आहे आणि तेथील उतार (स्लोप) सुमारे ८०-८५ अंशाचा आहे. तेथील हवेचा वेग हा अडचणींमध्ये वाढ करत होता. कॅम्प ३ नंतर आम्हाला कॅम्प ४च्या दिशेने प्रवास करायचा होता, जो यलो बॅण्ड एरीया आणि जेनेवा स्पर म्हणून ओळखला जातो. हा परिसर खुप खडकाळ आणि चढण्यास कठीण असा होता. हा खडकाळ परिसर पार केल्यानंतर आम्ही साऊथ कोलला पोहोचलो होतो, जो समुद्रसपाटीपासून जवळपास ८००० मीटरवर होता. या ठिकाणी आम्हाला जाणवले की, ऑक्सिजनशिवाय जगणे म्हणजे काय असते. कृत्रिम ऑक्सिजनची या परिसरात गरज भासते. बाल्कनी पार केल्यानंतर साऊथ समिट, हिलरी स्टेप आणि अखेरची वाट पार केल्यानंतर आम्ही जगातील सर्वोच्च शिखरावर पोहोचणार होतो. पहिल्यांदा मी एवढे मोठे गिर्यारोहण करणार होते, त्यामुळे मी त्यासाठी आतुर झाले होते. जगातील सर्वोच्च शिखरावरुन जग कसे दिसते, ते पाहण्याचा मला मोह झाला होता. त्यासाठीचा प्रवास हा निश्चितच अवघड होता. फक्त आमचे मनोधैर्य आम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देत होते. दरम्यानच्या काळात माउंट एव्हरेस्टवर हिमवादळ आल्याने आम्हाला पुन्हा परत बोलवण्यात आले आणि आम्ही निराश मनाने पुन्हा बेसकॅम्पला परतलो. माउंट एव्हरेस्टला नेपाळी लोक 'सगरमाथा' म्हणजे समुद्राचा माथा, असे संबोधतात. तर तिबेटीयन लोक 'चोमोलुंगा' म्हणजे धरणीमातेची देवता असे संबोधतात. तिची जेव्हा इच्छा असेल, तेव्हाच ती तुम्हाला बोलवेल, त्यामुळे तुम्ही वाट पहा की, तुमच्या नशिबात काय आहे?, असे ते सांगत. माझा यावर विश्वास होता. वातावरण सुरळीत झाल्यानंतर आम्हाला माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी पुन्हा एक संधी देण्यात आली, जी सहसा कोणाला दिली जात नाही. २३ तारखेला आम्ही बेसकॅम्पवरुन कॅम्प १ वगळत थेट कॅम्प २ ला पोहोचलो. ही चढण खूप लांबलचक आणि थकवणारी होती. मात्र आम्ही सर्वजणी खूप आतुर होतो. कॅम्प २ वर पोहोचल्यावर आम्ही काही काळ आराम केला आणि नव्या दिवशी कॅम्प ३ च्या दिशेने प्रवास सुरू केला. उन्हाळ्याचा कालावधी असल्याने तेथील तापमानात वाढ होत होती. तेथील वातावरण जवळपास ५२ अंश सेल्सियस एवढे होते, तेथे अजिबात वारा वाहत नव्हता. ज्यामुळे पुढील चढाई करण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागत होते. कॅम्प ३ वर पोहोचल्यानंतर आम्ही काही काळ आराम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता आम्ही कॅम्प ४ म्हणजेच साऊथ कोलच्या दिशेने प्रवास सुरू केला. या यलो बॅण्ड परिसरात पाच तासांचा दीर्घ प्रवास केल्यानंतर आम्ही साऊथ कोलला पोहोचलो होतो. तेथील वातावरण चांगले होते, वारादेखील जास्त वेगाने वाहत नव्हता. आम्ही साऊथ कोलवर रात्री आठ वाजेपर्यंत आराम केला. आता आम्ही या मोहिमेतील अखेरचा प्रवास करणार होतो. त्यामुळे आम्ही आमच्याजवळ पुरेसे पाणी, अन्न आहे का, याची तपासणी केली. माझ्याकरिता हा वेगळाच अनुभव होता कारण एकाच वेळेस मी आनंदी होते आणि थोडीशी घाबरलीदेखील होते. आम्हाला या प्रवासादरम्यान अनेक गिर्यारोहकांची शव दिसली होती, जे एव्हरेस्ट सर करण्यात अपय़शी ठरले होते. आम्ही त्यांच्या प्रयत्नांना सलाम करुन पुढचा प्रवास करत होतो. हिलरी स्टेप पार करणे, हे या प्रवासातील सर्वात मोठे आव्हान होते. ते एका अनुकूचितदार त्रिकोणाप्रमाणे होते. हे मोठे आव्हान पार केल्यानंतर आम्ही सर्वोच्च शिखरावर पोहोचणार होतो. आम्ही ते आव्हान पार केले आणि अखेरीस तो क्षण आला, २६ मे २०१२, सकाळी अंदाजे ५.४५ वाजता आम्ही जगातील सर्वोच्च शिखरावर पाऊल ठेवले होते. हा संपूर्ण प्रवास थकवणारा होता मात्र तेथे पाऊल ठेवल्यावरचे वातावरण थक्क करणारे होते. तेथील वातावरण एवढे सुंदर होते की, त्याचे शब्दात वर्णन करता येणार नाही. तेथे पाऊल ठेवल्यावर आमचा थकवा क्षणात दूर झाला. तेव्हाची माझी भावना शब्दात मांडता येणार नाही. मी तिथे पोहोचले होते, जेथे जायचे मी फक्त स्वप्न पाहिले होते. मी पहिल्यांदा सूर्य खालून वर येताना पाहिला होता, एवढ्या उंच ठिकाणी मी होते. I am on the seven heavens, I am on the top of the world, I am on cloud 9 या वाक्यांचा खरा अर्थ मला एव्हरेस्ट शिखरावर गवसला होता. निसर्गाचा अद्भूत अविष्कार आम्ही तेथून पाहत होतो. आमच्या आसपासचे पर्वत आणि शिखरे आम्हाला लहान दिसत होती. तेथे काही काळ घालवल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. आमची ही मोहिम १०० टक्के यशस्वी झाली होती, कारण या मोहिमेत कोणतीही जिवीतहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नव्हती. बेसकॅम्पमध्ये आमचे सहकारी आमच्या स्वागतासाठी तयार होते. नेपाळमधील लोकांनी आमचे भरपूर कौतुक केले. भारतात परतल्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते फ्लॅगइन कार्यक्रम पार पडला होता. तसेच राष्ट्रपतींच्या हस्ते लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आम्हाला विशिष्ट सेवा मेडल प्रदान करण्यात आले.'
एव्हरेस्ट मोहिमेमधील विशेष आठवण सांगताना प्राची म्हणतात की, 'एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्या आमच्या मोहिमेच्या सुरुवातीला मी माझ्या पालकांकरिता 'थॅंक यू' कार्ड लिहून ठेवले होते. एव्हरेस्ट सर करण्याच्या प्रयत्नात मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा दर हा १०:४ असा आहे. जर मी या मोहिमेतून परतले नाही तर ज्या लोकांनी मला यशस्वी करण्यासाठी सर्वकाही केले म्हणजेच माझे पालक, त्यांचे आभार मानण्यासाठी मी 'थॅंक यू' कार्ड लिहून ठेवले होते. या मोहिमेत डिस्कव्हरीचे कॅमेरामनदेखील सहभागी झाले होते. कारण ते या मोहिमेवर एक डॉक्युमेंट्री बनवत होते. एव्हरेस्ट सर करताना कायम माझ्या खिशात माझ्या आईवडिलांचा आणि गुरुंचा फोटो असायचा. जेव्हा मी शिखरावर पोहोचले, तेव्हा मी त्यांचा फोटो माझ्या खिशातून काढून त्या शिखरावर ठेवला. आजही डिस्कव्हरी चॅनेलच्या त्या डॉक्युमेंटरीमध्ये मी ते फोटो पाहू शकते. माझे आईवडिल ज्यांनी माझ्यासाठी सर्वकाही करुन मला या मोहिमेयोग्य बनवले आणि माझे गुरू ज्यांच्यावर माझी श्रद्धा आहे आणि ज्यांच्यामुळे माझे मनोधैर्य कायम उंच होत राहिले, त्यांचे फोटो मी जगाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवले होते.' एव्हरेस्ट मोहिमेमधील भावनिक उलाढालीबद्दल बोलताना प्राची सांगतात की, 'आम्ही जेव्हा एव्हरेस्ट शिखर सर करत होतो. तेव्हा आम्हाला एका शेरपाचे शव दिसले. त्यानंतर तत्काळ आम्हाला दरी पार करायची होती. तेव्हा मला पहिली शिकवण मिळाली ती म्हणजे, जपून पुढे जा कारण पर्वत तुम्हाला दुसरी संधी कधीच देत नाही. मला या प्रवासात गुडघ्याला बऱ्याच प्रमाणात दुखापत झाली होती. याचा अर्थ जर तुम्हाला पर्वताने शिखर सर करायची संधी दिली आहे तर खंबीर रहा. साऊथ कोलवर गेल्यावर माझ्या मनात एकच भावना होती ती म्हणजे अजून काही तास आणि एक नवे जग तुमची वाट पाहत आहे. शिखरावर पोहोचल्यावर मला असे वाटत होते की, जर मी अजून थोडी उंच असती तर आज माझे हात आकाशाला लागले असते. या मोहिमेनंतर माझ्या पालकांशी बोलल्यानंतर मला असे वाटले की, आयुष्य खूप सुंदर वाटते जेव्हा तुमच्यामुळे तुमचे प्रियजन आनंदी होतात.'
आपल्या प्रेरणेबद्दल बोलताना प्राची सांगतात की, 'यासाठी मला सर्वाधिक प्रेरणा मिळाली ती माझ्या आईवडिलांपासून. कारण मुलींनी पुढे यायला हवे, काहीतरी लक्षवेधी कारकिर्द घडवायला हवी, असे त्यांचे मत असायचे. त्यामुळे आम्हाला कायम पुढे जाण्याची प्रेरणा मिळायची. माझ्या आईने मला लहानपणीच सांगितले होते की, तू एथलेटीक्सचे शिक्षण घे कारण भविष्यात ते तुला उपयोगी ठरेल आणि तसेच घडले. मला एथलेटीक्स या खेळाचा माझ्या संपूर्ण आयुष्यात नेहमी फायदाच झाला.' भविष्यात एखादी प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा विचार आहे का, असे विचारले असता प्राची सांगतात की, 'मी सोशल मिडियावर सक्रिय आहे. त्या माध्यमातून अनेक लोक माझ्याशी संपर्क साधतात आणि गिर्यारोहणाबद्दल मार्गदर्शन करायला सांगतात, माझा अनुभव विचारतात. मी देखील त्यांना योग्य ते मार्गदर्शन करते. जेव्हा मला माझ्या शाळेत किंवा महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी बोलवण्यात येते, तेव्हा मी त्यांनादेखील मार्गदर्शन करते. यासाठी कोणती संस्था सुरू करण्याचा माझ्या सध्यातरी विचार नाही. लाईफ मे कुछ भी हो सकता है, भविष्यात कदाचित मला संधी मिळाली तर मी गिर्यारोहणाबद्दल मार्गदर्शन करणारी एक संस्था सुरू करेन. कारण आर्मीनंतर गिर्यारोहण हे एकच क्षेत्र असे आहे, ज्यात मला समाधान मिळेल.'
सध्या आर्मीतील महिलांच्या प्रमाणाबद्दल बोलताना प्राची सांगतात की, 'आमच्या काळाच्या तुलनेत ते फारच सकारात्मक आहे. हल्ली आर्मीत कारकिर्द घडवण्याकडे मुलींचा कल अधिक असतो, जी चांगली गोष्ट आहे. पूर्वी आर्मीत मुलींना सहभागी करण्यासाठी वर्षातून एकदाच भरती करत असत, सध्या ती भरती वर्षातून दोन वेळेस होते, जे फारच सकारात्मक आहे.' या क्षेत्रात कारकिर्द घडवण्यासाठी इच्छूक असलेल्या युवांना सल्ला देताना प्राची सांगतात की, 'माझे असे म्हणणे आहे की, मी जे काही केले आहे, ते कोणीही करू शकते. ९९ टक्के प्रयत्न आणि एक टक्का नशीब, असे समीकरण माझे आहे. प्रयत्न हे शिड्यांप्रमाणे असतात आणि नशीब हे लिफ्टप्रमाणे असते. लिफ्ट एखाद्या वेळेस बिघडू शकते. पण शिड्या कधीच बिघडत नाहीत. त्यामुळे ९९ टक्के प्रय़त्न करा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.'