पुणेकरांना घरपोच भाज्यांचे वितरण करणारे आदर्श स्टार्टअप 'पुणेसब्जी'
खास पुणेकरांसाठी ताज्या आणि चांगल्या दर्जाच्या भाज्या माफक दरात घरपोच उपलब्ध करुन देणारे स्टार्टअप म्हणजे 'पुणेसब्जी'. त्यामुळे पुणेकरांना आता भाजी खरेदीसाठी मंडईत किंवा बाजारात जाण्याची गरज नाही. फक्त एका क्लिकवर ताज्या आणि चांगल्या दर्जाच्या भाज्या तसेच फळे त्यांना घरपोच मिळू शकतात. आदर्श केदारी यांनी हा स्टार्टअप सुरू केला असून, गेल्या तीन वर्षांपासून तो यशस्वीरित्या कार्यरत आहे. २०१२ साली पदवीपर्य़ंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आदर्श यांनी एका कंपनीत सहा महिने कामाचा अनुभव घेतला. तेव्हादेखील कायम त्यांच्या मनात स्वतःचा व्यवसाय करायचा विचार घोळत होता. दरम्यानच्या काळात दिल्लीमध्ये ई-कॉमर्स क्षेत्रात बऱ्याच घडामोडी घडल्या. तेव्हा आदर्श यांच्या लक्षात आले की, ई-कॉमर्स क्षेत्राला खूप मोठे आणि उज्ज्वल भविष्य आहे आणि त्यांनी या क्षेत्रात व्यवसाय करण्याचे निश्चित केले. आदर्श केदारी, वृशाल कापडनीस आणि प्रविण पोखरकर, हे स्टार्टअपचे सह-संस्थापक आहेत.
एक सजग आणि जबाबदार उद्योजक या नात्याने ग्राहकांना किरकोळ आणि घाऊक माध्यमातून फळे आणि भाजीपाल्यासाठी ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, हे या स्टार्टअपचे ध्येय आहे. तसेच सर्वोत्तम दर्जाचा आणि ताजा भाजीपाला, फळे ग्राहकांना घरपोच उपलब्ध करुन देणे, हा या स्टार्टअपचा गाभा असल्याचे आदर्श सांगतात. मॅकेनिकल अभियांत्रिकीचे पदवीधर आदर्श हे एका बड्या ऑईल इंडस्ट्रीमध्ये नोकरी करत होते. पगारातील फक्त दहा हजार रुपयांच्या बचतीद्वारे त्यांनी पुणेसब्जी स्टार्टअप सुरू केला. पुणेसब्जीचा प्रवास २०१३ सालापासून सुरू झाल्याचे आदर्श सांगतात. भाज्यांच्या आणि फळांच्या किंमतीत पारदर्शकता राखून प्रत्येकाच्या घरोघरी मार्केट उपलब्ध करुन द्यायचे, असा विचार आदर्श यांनी केला आणि जन्म झाला तो पुणेसब्जी स्टार्टअपचा. आपला प्रवास विस्तृतपणे उलगडताना आदर्श सांगतात की, 'मला एक असा ई-प्लॅटफॉर्म सुरू करायचा होता, जो ग्राहकांना ताजे आणि सर्वोत्तम दर्जाचे उत्पादन घरपोच उपलब्ध करुन देईल. आणि त्यातही त्या उत्पादनांच्या किंमतीत पारदर्शकता असेल तसेच त्यांना त्या उत्पादनांची खरेदीदेखील सुकर पद्धतीने करता येईल. पुणेसब्जी हा पहिला असा स्टार्टअप बनला, ज्याने शेल्फ लाईफ कमी असलेली उत्पादने (नाशवंत) ही ऑनलाईन बाजारपेठेद्वारे उपलब्ध करुन दिली. पहिल्याच महिन्यात आमच्या स्टार्टअपला एवढे यश मिळाले की, आमच्या सेवेमुळे समाधानी झालेले शंभर ग्राहक आमच्याशी आपसूकच जोडले गेले. या प्रवासादरम्यान प्रवीण पोखरकर आणि वृषाल कापडनीस जे माझ्या महाविद्यालयात शिकत होते आणि मला ज्युनियर होते, ते माझ्या या स्टार्टअपसोबत सह-संस्थापक म्हणून जोडले गेले. एक टीम म्हणून पुढचा प्रवास साकारत असताना पुणेसब्जीने कोणत्याही मोठ्या विपणन पद्धतीचा वापर केला नाही. जाहिरातीकरिता त्यांनी फक्त वर्तमानपत्राद्वारे पत्रके वाटणे, एसईओ यांचा वापर केला. मात्र त्यांना सर्वाधिक फायदा झाला तो मौखिक प्रसिद्धीचा. आमची सेवा आणि उत्पादनाचा दर्जा पाहून आमची मौखिक प्रसिद्धी फार मोठ्या प्रमाणावर होत होती. २०१३ सालापासून ते २०१४-१५ पर्य़ंत आम्ही ऑफलाईन मार्केटींगवरच अधिक प्रमाणात भर दिला होता. सुरुवातीला आम्ही बेसिक संकेतस्थळ सुरू केले, ज्यावर आम्ही कोणतीही ऑफर देत नव्हतो. फक्त भाज्यांच्या किंमती दाखवत होतो. स्थानिक भाजीविक्रेत्यांकडूनच आम्ही ग्राहकांना पुरवठा करत होतो. २०१५ साली आम्ही अद्ययावत संकेतस्थळ सुरू केले आणि ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही पद्धतींने ग्राहकांच्या ऑर्डर्स घेण्यास सुरुवात केली. आमचे अकाऊंट्स, लॉजिस्टिकदेखील व्यवस्थित सुरू केले.'
या स्टार्टअपच्या उभारणीच्या काळात आलेल्या अडचणींबद्दल बोलताना आदर्श सांगतात की, 'पुणेसब्जीला सुरुवातीच्या काळात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. फळांची तसेच भाज्यांची शेल्फ लाईफ ही फार कमी असते. ज्यामुळे स्टार्टअपसाठी मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत होता. मात्र आमच्या टीमने अनेक तंत्र वापरुन त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दुचाकी वाहनांचे एक नेटवर्क तयार केले, ज्यामुळे उत्पादने ग्राहकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवता येतील. या साध्या सोप्या तंत्रज्ञानाचा वापर करुन आम्ही हजारो ग्राहकांशी जोडले गेलो.' पुणेसब्जी स्टार्टअप यशस्वी होत असताना तिन्ही संस्थापकांच्या मनात एकच प्रश्न उद्भवत होता. त्याबाबत अधिक बोलताना आदर्श सांगतात की, 'दशकांपूर्वी गुलटेकडी बाजार सुरू झाला होता, जो लाखो पुणेकरांना सेवा पुरवत होता. गेल्या काही वर्षांपासून लोकसंख्येतदेखील वाढ होत आहे. मात्र शेतीउत्पादनाकरिता तोच आणि तेवढ्याच परिसरातील बाजार स्त्रोत होता आणि अजून काही वर्षे राहिलदेखील. हीच परिस्थिती प्रत्येक शहरात आहे. एवढा लहानसा बाजार शेतीउत्पादनाची वाढती मागणी आणि पुरवठ्याशी कशाप्रकारे झुंजत असेल?, पुरवठा साखळीत नवनव्या प्रकारची संशोधने त्या बाजारात कशाप्रकारे होत असतील?, असे प्रश्न आमच्यासमोर उभे राहिले होते. त्यामुळे एक उद्योजक म्हणून आम्ही या प्रश्नांची उत्तरे विविध पैलूंचा विचार करुन शोधत होतो. बाजार अधिक कार्यक्षम बनवण्यापेक्षा आम्ही एक ऑनलाईन बाजारपेठ बनवण्याचे ठरविले, जेथे शेतकरी, किरकोळ तसेच घाऊक व्यापारी, ई-कॉमर्स संकेतस्थळे, स्थानिक दुकाने आपल्या उत्पादनांची विक्री करू शकतात आणि ग्राहक या उत्पादनांची खरेदी करू शकतात. या व्यासपीठाकरिता आम्ही प्रयत्न करत असून, लवकरात लवकर आम्ही तो उपलब्ध करुन द्यायचा प्रयत्न करू.'
पुणेसब्जीबाबत अधिक बोलताना आदर्श सांगतात की, 'ऑफलाईन आणि ऑनलाईन मार्केटींगशिवाय आम्ही 'बिझनेस टू बिझनेस' एक्सेसदेखील सुरू केला आहे. भाज्यांचे घरपोच वितरण करण्याशिवाय आम्ही हेल्थी पुणे नावाचा एक उपक्रमदेखील हाती घेतला आहे. त्यात आम्ही काही कंपन्यांशी संपर्क साधला असून, त्यांच्या कार्य़ालयात जाऊन आम्ही तेथील कर्मचाऱ्यांना सकाळच्या नाश्त्याचे महत्व पटवून देतो. त्यापैकी काही कंपन्यांना आम्ही सकाळचा नाश्ता पुरवण्याचे काम करतो. याशिवाय आम्ही हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटच्या काही कंपन्यांशी टायअप केले असून, त्यांनादेखील आमच्याशी जोडून घेतले आहे. एक गोष्ट विशेष, ती म्हणजे अद्यापही आमची मौखिक प्रसिद्धी होत आहे आणि आमच्या जाहिरातीत तिचा महत्वाचा वाटा आहे.' पुणेसब्जीमध्ये सध्या ११ लोक कार्यरत असल्याचे आदर्श सांगतात. पुणेसब्जीचे सध्याचे संकेतस्थळ हे मोबाईल पोर्टेबल आहे. तरीही जून-२०१६ मध्ये पुणेसब्जीचे मोबाईल एप्लिकेशन तयार करण्यात येणार असल्याचे आदर्श सांगतात.
पुणेसब्जीवरुन तुम्ही चार माध्यमातून फळे तसे भाज्यांची ऑर्डर देऊ शकता. टेलिफोनद्वारे, ई-मेलद्वारे, सोशल मिडियाद्वारे तसेच संकेतस्थळावरुन तुम्ही ऑर्डर देऊ शकता. याशिवाय पुणेसब्जी संकेतस्थळावर तुम्हाला पैसे चुकते करण्यासाठी ऑनलाईन तसेच कॅश ऑन डिलिव्हरी असे पर्यायदेखील उपलब्ध आहेत. पुणेसब्जी संकेतस्थळावर ग्राहक फक्त उत्पादनांना घरपोच करण्याची तारीखच नाही तर वेळदेखील निश्चित करू शकतो. तसेच तीन दिवस पूर्वीदेखील एखाद्या उत्पादनाची ऑर्डर देऊन ठेऊ शकतो, असे आदर्श सांगतात. ते पुढे सांगतात की,'आम्ही उत्पादनांची खरेदी शेतकरी किंवा स्थानिक बाजारातून करतो. त्यातही आमचा कल अधिकाधिक शेतकऱ्यांकडून उत्पादने खरेदी करण्यावर असतो. एखादे उत्पादन ग्राहकांकडे पाठवण्यापूर्वी आम्ही त्याची पडताळणी करुन त्यातील सर्वोत्तम उत्पादन ग्राहकांना पाठवतो. आम्ही विविध प्रयोग करुन एक सोपी आणि स्वच्छ प्रक्रिया निर्माण केली आहे. आम्ही उत्पादनांचे पॅकिंग स्वतः करतो, ज्यात उत्पादने सुरक्षित आणि ताजीतवानी राहतात.'
आपल्या भविष्यातील योजनांबद्दल आदर्श सांगतात की, 'सध्या पुणेसब्जी हे पुण्यात सक्रीय असून, आम्हाला गर्व आहे की आम्ही पुणेकरांना आमची सेवा पुरवत आहोत. पुणेकर नागरिक हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणाकरिता प्रसिद्ध आहेत आणि ते आम्हाला आमच्या सेवेबद्दल कधीच चुकीची प्रतिक्रिया देणार नाहीत. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे आम्हाला फायदा होतो. आमच्या काही चुका आम्हाला समजतात. त्यानुसार आम्ही आमच्या यंत्रणेत योग्य ते बदल करुन ती सर्वोत्तम बनवण्याचा प्रयत्न करतो. इतर शहरांमध्ये काम करण्याचा सध्यातरी आमचा विचार नाही. पुण्याकरिताच भाज्या आणि फळांची विक्री करणारी एक आदर्श वितरण साखळी आम्हाला तयार करायची आहे. त्यानंतर इतर शहरे ही आहेतच. फक्त महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील इतर शहरांचादेखील त्यानंतर विचार करता येऊ शकतो.' अधिक माहितीकरिता तुम्ही http://www.punesubji.com/store/home या संकेतस्थळाला भेट देऊ शकता, असे आदर्श सांगतात.
यासारख्या आणखी काही स्टार्टअप संबंधित घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा