भारताचे नाव जागतिक पटलावर नेणाऱ्या वरप्रसाद रेड्डी यांची प्रेरणादायक कहाणी
दोनदा सरकारी नोकरी सोडली... स्थापन केलेल्या कंपनीतून त्यांना काढलं... पण स्वत:च्या विचारांशी कधीच तडजोड न करता भारताचं नाव जगाच्या पटलावर आणणारे वरप्रसाद रेड्डी यांची प्रेरणादायक कहाणी जाणून घेऊ या.
एक इलेक्टॉनिक इंजिनियर, वैज्ञानिक होता. प्रचंड इमानी. देशा आणि समाजासाठी वाहून घेणारा. भ्रष्टाचार, अन्याय, फसवणूक याविरोधात नेहमी उभा ठाकलेला, त्याबद्दल राग असलेला. करदाता आणि सामान्य जनतेच्या पैश्याची होणारी लूट पाहून त्यांनी दोनदा सरकारी नोकरी सोडली. पहिल्यांदा केंद्र सरकारची नोकरी तर दुसऱ्यांदा राज्य सरकारची. पुन्हा नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. आता त्य़ांना स्वत:चा व्यवसाय सुरु करायचा होता. एक बुडीत खात्यात गेलेल्या कंपनीत भागीदार म्हणून गुंतवणूक केली. खूप मेहनत केली. बुडीत जाणाऱ्या या कंपनीला पुन्हा उभं केलं. नवनवीन उत्पादनं बनवून विकली. क्वालिटीमुळे कंपनी पुन्हा नावारुपाला आली. बाजारात पुन्हा उभी राहिली. अनेक पुरस्कार मिळवले. पण इथंही कंपनीतल्या अनियमिततेविरोधात आवाज उठवला आणि त्याला कंपनीतूनच बेदखल करण्यात आलं. ज्या कंपनीच्या विकासासाठी दिवसरात्र मेहनत घेतली, गुंतवणूक केली, स्वप्न पाहिली, त्यामधूनच अशी अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे या वैज्ञानिक इंजिनियरला प्रचंड राग आला. पुढे काय करायचं, कसं करायचं हे प्रश्न त्यांना भेडसावत होते. कधी स्वत:चा व्यवसाय सुरु करायचं मनात यायचं, तर कधीतरी त्यांना वाटायचं की हे सर्व काही सोडून गावी जावं, शेती करावी. याच वेळी ते जिनेव्हाला गेले. तिथं आपल्या एका नातेवाईकाबरोबर जागतिक आरोग्य संस्थेच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमात एका परदेशी महिलेनं भारतीयांचा अपमान केला. भारतीय हातात वाटी घेऊन भीक मागायला तयार असतात अशा शब्दात या महिलेनं भारतीयांचा पानउताराच केला. याचा या वैज्ञानिकाला फार राग आला. त्यांनी मनात विचार केला की याचा बदला घ्यायचा. या परदेशी लोकांना भारताची महती पटवून द्यायची अशी खुणगाठ त्यांनी मनाशी बांधली. भारतात आल्यावर या वैज्ञानिकानं जो काही करिष्मा केला त्यानं भारतात एक सकारात्मक क्रांती आलीच शिवाय जगभरात त्याच्या या संशोधनाचा फायदा झाला. या वैज्ञानिकानं बनवलेलेल्या कंपनीत बनणाऱ्या लसीमुळे संपूर्ण जगभरातल्या करोडो मुलांना एका दुर्धर विकारापासून वाचवण्यास मदत झाली. कित्येक पाश्चिमात्य देशांनी भारतातून या लसी मागवून आपल्या देशातल्या मुलांना आरोग्यदायी बनवले. या वैज्ञानिकानं अखेर सिद्ध करुन दाखवलं की भारत देश याचक नाही तर दाता आहे. या महान वैज्ञानिकाचं नाव आहे वरप्रसाद रेड्डी.
वरप्रसाद रेड्डी ज्यांनी शांती बायोटेक्निक्सची स्थापना केली आणि जगभरातल्या मुलांना 'हेपटाईटिस बी' आणि अन्य दुर्धर विकारांपासून वाचणाऱ्या लसी अत्यल्प किमतीत उपलब्ध करुन दिल्या. शांता बायोटेक्निक्सच्या स्थापनेपूर्वी या लसी इतक्या महाग असायच्या की फक्त श्रीमंतांनाच त्या परवडत असत पण शांता बायोटेक्निक्सनं भारतात या लसी बनवून अत्यल्प किमतीत त्या विकण्यास सुरुवात केली आणि सर्वसाधारण मनुष्यालाही या लसी विकत घेणं शक्य झालं. वरप्रसाद रेड्डी यांना त्यांच्या या अदभूत कामगिरीसाठी आणि जनसेवेसाठी अनेक पुरस्कार आणि सन्मानानं गौरवण्यात आलं. भारत सरकारनं २००५ मध्ये त्यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात अमुल्य योगदानासाठी पद्मभुषण या देशातल्या तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं. हैद्राबादमध्ये त्यांच्या निवासस्थानी झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपल्या जीवनातल्या अनेक अनुभवाचं कथन केलं.
“मी माझ्या एका नातेवाईकाबरोबर जिनेव्हाला गेलो होतो. त्याला जागतिक आरोग्य संघटनेतल्या एका कार्यक्रमात संशोधनपत्र सादर करायचं होतं. या संमेलनाचा विषय होता लसीकरणाचं महत्त्व. या संमेलनात मला अनेक नवनवीन विषयांची माहिती मिळाली. याच संमेलनादरम्यान पहिल्यांदा मी हेपटाईटीस बी या विकाराबद्दल ऐकलं. मी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर होतो रोग आणि त्यांच्यापासून वाचण्यासाठी लसीकरण या विषयही अत्यंत नवीन होता. जिनेव्हामध्ये मला त्यावेळी कळंल की भारतात त्यावेळी तब्बल ५० दशलक्ष लोक हेपटाईटिसचे शिकार आहेत. तर चीनमध्ये त्यांची संख्या ५५ दशलक्ष होती. सर्वच देश या जीवघेण्या रोगाने त्रस्त होते. त्यावेळी म्हणजे ९० च्या दशकात दोन देशात हेपटायटिस बीच्या लसी बनवल्या जात असत. त्यामुळे त्यांची किंमत सुध्दा खूप जास्त होती. सहाजिकच या लसी निव्वळ श्रीमंतांना परवडणाऱ्या होत्या भारतात सुध्दा या लसी येत असत, पण फक्त श्रीमंतांसाठी. त्यावेळी माझ्याकडे नोकरी सुध्दा नव्हती. आणि काही कामही नव्हतं. त्याचवेळी मी निर्णय घेतला की आपण या लसी भारतात बनवायच्या आणि भारतभर प्रत्येकाला या लसी उपलब्ध होऊ शकतील अशी व्यवस्था करायची जेणेकरुन सर्वसाधारण माणसाला सुध्दा या लसीचा उपयोग होऊ शकेल. माझं पुढचं लक्ष्य मी निर्धारीत केलं होतं.”
आपलं लक्ष्य साध्य करण्यासाठी त्यांनी हालचाली सुरु केल्या. पाऊलोपावली त्यांना संकटांचा सामना करावा लागत होता. प्रत्येक पायरीवर त्यांना नवीन आव्हानांचा सामना करावा लागत होता. जेव्हा वरप्रसाद रेड्डी यांनी परदेशात जाऊन हेपटाईटीस बी निरोधक लसीचा फॉर्मुला आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची हेटाळणी करण्यात आली आणि एका परदेशी व्यक्तीनं तीन गोष्टी अश्या ऐकवल्या ज्यानं त्यांना धक्का बसला. वरप्रसाद रेड्डी यांनी सांगितलं “ एकतर भारतीय लोक भिकारी आहेत. दरवेळी झोळी घेऊन तंत्रज्ञानाची भीक मागत आमच्याकडे येतात. किती वर्षे आम्ही तुमच्या भारतीयांचं ओझं उचलायचं. दुसरी गोष्ट तो जे बोलला त्यानंतर माझं रक्त खवळलं. तो म्हणाला की आम्ही तुम्हाला तंत्रज्ञान दिलं तरी तुम्हा लोकांना त्याला समजून घेऊन वापर करण्यामध्ये वर्षानुवर्षे जातील. ही गोष्ट बोलून त्यानं भारतीय वैज्ञानिकांचा अपमान केला होता. आणि तिसरी गोष्ट तो म्हणाला की भारत खूप मोठा देश आहे. कितीतरी लोक आहेत तिथं दररोज हजारो मुलं जन्माला येतात, तुम्हाला लसींची काय गरज आहे? म्हणजेच त्या परदेशी गृहस्थाचं असं म्हणणं होतं की तुमची मुलं मेली तरी काय फरक पडतो. या तीन गोष्टीं माझ्या मनाला खूप लागल्या. एका कंपनीनं आपल्याला तडकाफडकी काढून टाकणं आणि त्यानंतर हा अपमान यामुळे मी अधिकच विचलित झालो.”
त्यानंतर वरप्रसाद रेड्डी भारतात आले आणि त्यांनी शांता बायोटेक्निक्सचा पाया रचला. पाया तर रचला गेला मात्रं आव्हानं आ वासून समोर उभी होती. ज्यावेळी शांता बायोटेक्निक्सची स्थापना झाली त्यावेळी भारतात एकसुध्दा बायो-फार्मा कंपनी नव्हती. अनेक महाविद्यालयांमध्ये बायो-टेक्नॉलॉजी हा विषय शिकवला जायचा, मात्र या क्षेत्रात अजिबात काही होत नव्हतं. यामुळे वरप्रसाद रेड्डी यांना आपल्या कंपनीसाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ मिळवणं हे एक आव्हान होतं. या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी त्यांनी एक क्लुप्ती योजली. त्यांनी आपल्या कंपनीसाठी अश्या लोकांचीच निवड केली ज्यांच्यामध्ये देशभक्तीची भावना होती आणि मेहनत करण्याची तयारी होती. वरप्रसाद रेड्डी यांच्या मते, लोकांचा दृष्टीकोन योग्य असेल तर त्यांना कोणतंही काम शिकवता येऊ शकतं. चांगले विचार आणि मोठं काम शिकण्याची आवड असणाऱ्या आणि मेहनती लोकांना या कंपनीमध्ये संधी मिळाली. वरप्रसाद रेड्डींनी सांगितलं की सुरुवातीला गुंतवणूकीची मोठी समस्या समोर आली. त्यांनी कसेतरी एक कोटी ९० लाख रुपये जमवले. यात त्यांची स्वत:ची ६८ लाख इतकी गुंतवणूक होती. पण रक्कम शोध आणि संशोधनासाठी कमी पडत होती. वरप्रसाद रेड्डी म्हणाले की “ आमची विचारधारा चांगली होती आणि त्यामुळेच कदाचित देवानं आम्हाला ओमानवरुन मदत पाठवली. ओमानच्या परराष्ट्रमंत्र्यांना योजना आवडली आणि त्यांनी आमच्या कंपनीत दोन कोटी रुपयांची गुंतवणूक आमच्या कंपनीत केली. इतकंच नाही तर ओमान सरकारकडून कर्जही देऊ केलं. आता पैश्यांची समस्या दूर झाल्याने आमच्या कामांना वेग मिळाला होता.”
वरप्रसाद रेड्डी यांना मात्र या गोष्टीचा राग आहे की त्यावेळी भारतीय बँकांनी त्यांची मदत केली नव्हती. ते अनेक बँक अधिकाऱ्यांना भेटले होते पण कुणी कर्ज द्यायला किंवा मिळवून द्यायला सुध्दा मदत केली नाही. त्यांचा सर्वात जास्त राग आयडीबीआय आणि आयएफसी या संस्थांवर आहे कारण या दोन्ही संस्थांची जबाबदारी आहे की भारतात नवनवीन उद्योगांना प्रोत्साहन देणं आणि शोध आणि संशोधन करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक सहाय्य देणं मात्र या दोन्ही कंपन्यांनी शांता बायोटेक्निक्ससाठी काही केलं नाही. वरप्रसाद रेड्डी सांगतात बँकांचे अधिकारी त्यांनी विचित्र प्रश्न विचारायचे, तर काही जण त्यांना विचारायचे की तुम्ही स्वत: इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहात तर बायोटेक्निक्स क्षेत्रात कसं काम कराल. काही अधिकारी म्हणायचे की भारतात बायोटेक्नॉलॉजी आणि जेनेटीक इंजिनियरींग सारख्या गोष्टी नाहीयत मग तुम्ही काम कसे कराल. काही बँकांचे अधिकारी या लसींची मार्केटमध्ये काय मागणी असेल य़ाबद्दल विचारायचे. आणि या प्रश्नाचे उत्तर वरप्रसाद रेड्डी त्यांना द्यायचे ते असं की, भारतात दरवर्षी २५ दशलक्ष बालकांचा जन्म होतो आणि प्रत्येक मुलाला हेपटायटिस बी पासून वाचवण्यासाठी तीन वेळा लस देणं गरजेचं असतं. याचाच अर्थ की भारतीय बाजारात दरवर्षी ७५ दशलक्ष लसींची गरज आहे. इतकंच नाही तर परदेशी कंपन्या या प्रत्येक लसीमागे ८४० रुपये आकारतात आणि शांता बायोटेक्निक्स फक्त ५० रुपये प्रत्येक लसीमागे आकारणार आहे. मात्र कोणत्याच बँकेच्या अधिकाऱ्यानं त्यांना कर्ज दिलं नाही. शांता बायोटेक्निक्सचं काम ओमानकडून मिळालेल्या पैश्याने पुढे सुरु झालं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शांता बायोटेक्निक्सच्या संशोधनामध्ये भारत सरकारनं कोणतीच मदत केली नाही. तर अडथळे आणि आव्हानांचा सामना करत वरप्रसाद रेड्डींचा प्रवास सुरुच राहिला. शांता बायोटेक्निक्सच्या संशोधनाला शेवटी यश मिळालंच. त्याचे परिणाम सुध्दा चांगले आले. भारतात हेपेटायटिस बी ची लस तयार झाली.
यानंतर वरप्रसाद रेड्डी यांना अत्यंत मेहनतीनं या लसींच्या विक्रीचा परवाना घ्यावा लागला. त्यावेळी या लसींसाठी कोणता प्रोटोक़ॉल नव्हता किंवा औषधांच्या यादीत लसी सामील नव्हत्या. रेड्डी यांना ही कामं स्वत:च करावी लागली. हेपेटायटिस बी रोखण्यासाठी शांता बायोटिक्सनं आपली पहिली लस ऑगस्ट १९९७ मध्ये बाजारात आणली. आणि हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्याची सुवर्ण जयंतीचं सुध्दा होतं. अश्या ऐतिहासिक क्षणाला शांता बायोटेक्निक्सनं एक नवीन इतिहास रचला. बायोटेक्नोलॉजी आणि जेनेटीक इंजिनियरींग क्षेत्रात त्यांनी नवीन क्रांती आणली होती.
आता भारतात हेपटाईटीस बी रोखणारी लस सर्वसामान्यांच्या आवाक्यात होती. या नंतर शांता बायोटेक्निक्सनं अनेक लसी बाजारात आणल्या आणि लोकांना अत्यल्प किमतीत या लसी उपलब्ध करवल्या. शांता बायोटेक्निक्समुळेच जगभरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांना लसीच्या किंमती कमी कराव्या लागल्या. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतात ती लस तयार झाली तरीही सरकारनं आपल्या लसीकरण कार्यक्रमात या लसीला सामील केलं नाही. मात्रं पाकिस्तानसहीत भारताच्या सर्वच शेजारी देशांनी आणि जगभरातल्या अनेक देशांनी सुध्दा शांता बायोटेक्निक्समधून या लसी खरेदी करुन आपल्या मुलांना द्यायला सुरुवात केली. १४ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हेपेटाईटीस बी या रोगाला रोखणाऱ्या या लसीला राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात सामील करण्यात आलं.
वरप्रसाद रेड्डी यांनी अत्यंत दु:खानं सांगितलं की भारतातल्या काही आरोग्यमंत्र्यांनी या राष्ट्रीय लसीकरणात सामील करुन घेण्यासाठी लाच मागितली होती. मात्रं वरप्रसाद रेड्डी आपल्या विचारांवर ठाम होते आणि त्यांनी कधीच लाच दिली नाही.
विचारधारेवर ठाम राहण्याचं कारण म्हणजे लहानपणापासून त्यांच्या आईनं आणि मामानं दिलेले संस्कार. वरप्रसाद रेड्डी यांच्यावर आपल्या आईचा खूप प्रभाव होता. आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या पहिल्या कंपनीचं नाव आपल्या आईच्या नावावर ठेवलं, त्यांची आई शांता ही गृहिणी होती तर वडील व्यंकटरमना रेड्डी श्रीमंत शेतकरी होते. वरप्रसाद रेड्डी यांचा जन्म १७ नोव्हेबर १९४८ साली आंध्रप्रदेशच्या नेल्लूर जिल्ह्यामध्ये पापीरेड्डीपालेम या गावात झाला. त्याचे वडील सहावी पर्यंत शिकलेले होते पण आई मात्र आठवी पर्यंत शिकलेली होती. त्यावेळी आठवी परिक्षाही मोठी असायची. वरप्रसाद रेड्डी यांनी सांगितलं की त्यांची आई अत्यंत धार्मिक होती. सदैव धार्मिक कामात मग्न असायची. एकत्रित कुटुंब पध्दती असल्यामुळे वरप्रसाद यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या आईनं त्यांना मामाच्या घरी पाठवलं. त्यांचे मामा नेल्लूर शहरामध्ये राहत होते. त्याचे मामा हे डाव्या विचारसारणीचे होते. त्यावेळचे प्रसिध्द नेते पुचलपल्ली सुंदरय्या यांच्या विचारांनी अत्यंत प्रभावित होते त्यांनी आपली संपूर्ण मालमत्ता कम्युनिस्ट पक्षाच्या नावे केली होती. त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजसेवेसाठी समर्पित केलं होतं. समाजसेवेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांनी लग्न केलं नाही. आयुष्यभर त्यांनी गरीबांच्या उध्दारासाठी कार्य केलं. वरप्रसाद यांच्यावर त्यांच्या मामाच्या या स्वभावाचा अत्यंत गहिरा प्रभाव होता. लहानपणापासून वरप्रसाद सुध्दा आपल्या मामासह समाजसेवेशी निगडीत कार्यांमध्ये सामील होऊ लागले होते.
मात्र लहाणपणापासून वरप्रसाद रेड्डी अत्यंत द्विधा मनस्थितीत वाढले आणि याचं कारण म्हणजे त्यांची आई धार्मिक स्वभावाची आणि ईश्वराला मानणारी तर त्यांचा मामा इश्वराचं अस्तित्वच मानत नव्हते. या दोघांचा समान प्रभाव असल्यानं नेमकी कोणती जीवनशैली स्विकारावी याबाबत त्यांचा निर्णय होत नव्हता. अत्यंत विचारअंती त्यांनी एक मध्यममार्ग निवडण्याचं ठरवलं. त्यांनी स्विकारलं की त्यांची आई ज्या अदृष्य शक्तीवर विश्वास ठेवते ती नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी ईश्वरीय शक्तीचा स्विकार केलाच. दुसरीकडे आपल्या मामाचा समाजसेवा भाव त्यांनी मनापासून स्विकारला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईकडून मिळालेला भक्तीभाव आणि मामाकडून मिळालेला सेवाधर्म या दोन्हीची सांगड घालून ते आजही मार्गक्रमण करत आहेत.
वरप्रसाद रेड्डी लहाणपणी आपल्या तेलुगु शिक्षकाकडूनही अत्यंत प्रभावित होते. हे शिक्षक ज्या पध्दतीनं त्यांना तेलगू भाषा शिकवायचे त्यामुळे वरप्रसाद रेड्डी यांची तेलगू भाषा आणि साहित्यातली रुची वाढत गेली. तेलगू भाषा आणि साहित्यामध्ये त्यांची आवड वाढत गेली. त्यांनी आपला पदवी अभ्यासक्रमही याच भाषेत पूर्ण करायचा होता. त्यांनी आपली ही इच्छा मामासमोर ठेवली. मात्र मामानं त्यांचा हा प्रस्ताव साफ नाकारला. वरप्रसाद रेड्डी म्हणाले त्यावेळी भारतात नवनिर्मितीचं वारं वाहत होतं. देशात प्रत्येक क्षेत्रात मोठमोठ्या योजना बनत होत्या. देशाला चांगल्या आणि प्रभावशील अभियंत्यांची गरज होती. त्यामुळे त्यांच्या मामाने त्यांना अभियंता बनण्याचा सल्ला दिला ज्यामुळे त्यांना देशाच्या विकासात मोठं योगदान देता येईल. वरप्रसाद रेड्डी म्हणतात “मला जबरदस्तीनं विज्ञान शाळेत घालण्यात आलं. मी कधीच पहिला किंवा दुसरा आलो नाही. मी असाधारण विद्यार्थी नव्हतो अगदी साधारण होतो. माझा क्रमांक सातवा किंवा आठवा यायचा.“
वरप्रसाद यांनी तिरुपतीच्या श्रीव्यंकटेश्वरा महाविद्यालयामधून १९६७ साली बीएससीची पदवी प्राप्त केली. बीएससीनंतर त्यानी काकीनाडामधील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथं त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये पद्व्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. १९७० मध्ये वरप्रसाद रेड्डी इंजिनियर झाले. त्यानंतर ते कंप्युटर सायन्स शिकण्यासाठी जर्मनीला गेले.
या दरम्यान वरप्रसाद रेड्डी यांना जर्मन संस्कृतीनं आणि शिस्तबध्द आयुष्यानं अत्यंत प्रभावित केलं. याच दरम्यान काही कारणासाठी ते अमेरिकेला सुध्दा गेले. मात्र अमेरिका त्यांना तितकीशी भावली नाही. वरप्रसाद रेड्डी म्हणतात “ मला वाटतं फिरायला अमेरिका हा चांगला देश आहे पण राहण्यासाठी आणि नोकरी करण्यासाठी अमेरिका योग्य देश नाही”. परदेशवारी करुन वरप्रसाद १९७१-७२ मध्ये भारतात परत आले. ते इंजिनियर होते. त्यामुळे त्यांना लवकरच हैद्राबादमधल्या डिफेन्स इलेक्ट्रॉनिक रिसर्च लॅबोरेटरीमध्ये वैज्ञानिक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. केंद्र सरकारच्या या प्रतिष्ठीत संस्थेमध्ये शोध आणि संशोधनाचं कार्य होतं. असा शोध आणि संशोधन ज्यामुळे भारत देश सुरक्षा क्षेत्रात संपूर्णपणे आत्मनिर्भर बनेल. भारताला इलेक्ट्रॉनिक उपकरणं परदेशातून मागवावी लागू नयेत आणि अत्यावश्यक अशी उत्पादनं भारतातच तयार करता यावीत. मात्र वरप्रसाद रेड्डी यांना सरकारी संस्थांमध्ये होणाऱ्या कामाची पध्दती पसंत आली नाही. त्यांच्या मते “ त्यावेळी डिफेन्स इलेक्ट्रॉनिक रिसर्च लॅबोरेटरीमध्ये शोध संशोधन कमी आणि विकास जास्त होत होता. मला असं वाटायचं की देशातल्या करदात्यांचे पैसे फुकट खर्च होत आहेत. मला याविरोधात आवाज उठवावासा वाटला. पाच वर्षे काम करुन मी तिथल्या नोकरीचा राजीनामा दिला. कारण मला तिथली व्यवस्थाच पटली नाही.”
वरप्रसाद रेड्डी यांच्या बोलण्याचा अर्थ होता की डिफेन्स इलेक्ट्रॉनिक रिसर्च लॅबोरेटरीमधले अधिकारी स्वत:च्या विकासावर अधिक भर देत असत. देशासाठी उपयोगी आणि सार्थक शोध लावण्यामध्ये त्यांना काहीही रुची नव्हती. वरप्रसाद रेड्डी यांना डिफेन्स इलेक्ट्रॉनिक रिसर्च लॅबोरेटरीचे कठोर नियम मान्य नव्हते. त्याना खुलेपणानं काम करायचं होतं. पण कंपनीतल्या लालफिती कारभारामुळे आणि सैनिकी नियमांमुळे ते इतके त्रस्त झाले की त्यांनी नौकरी सोडण्याचा निर्णय घेतला. गावाकडे जाऊन शेती करण्याचा विचारही त्यांच्या मनात येऊन गेला. शहरापासून दूर गेलो तर या डिईआरएल कंपनीच्या आठवणी विसरता येतील.
१९७७ मध्ये रेड्डी यांना आंध्रप्रदेश औद्यागिक विकास महामंडळात काम करण्याचा प्रस्ताव आला. हा प्रस्ताव त्यांना प्रकल्प संचालक डॉ. राम के वेपा यांनी दिला होता. वेपा यांची काम करण्याची पध्दत त्यांना माहित होती म्हणून त्यांनी हा प्रस्ताव स्विकारला. वरप्रसाद रेड्डी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असल्याने महामंडळातर्फे संचालित इलेक्ट्रॉनिक उद्योगांचं सर्वेक्षण आणि विकासासंदर्भातली जबाबदारी त्यांना देण्यात आली. त्यांना मानद संचालक नेमण्यात आलं. पण काही महिने काम केल्यावर वरप्रसाद यांना समजलं की महामंडळाच्या कामात अनेक घोटाळे होत आहेत. काही मोठे अधिकारी आणि नेते मंडळी आपल्या नातेवाईंकांना व्यवसायी सांगून महामंडळातर्फे कर्ज घेतात. अशाप्रकारच्या खासगी-सरकारी एकत्रितपणे चालवण्यात येणाऱ्या उद्योगांना दिल्या जाणाऱ्या कर्जांमध्ये मोठा घोटाळा होत होता. वरप्रसाद सांगतात,” कुणीही व्यवसायी नव्हता. सरकारी खजिना लुटण्यासाठी त्यांना व्यवसायी बनवण्यात आलं होतं. यात अधिकारी आणि राजकारणी दोघे सामील होते. आपला हा घोटाळा लक्षात येऊ नये म्हणून चार चार बॅलेन्सशीट दाखवल्या जायच्या. त्या अर्थात खोट्या असायच्या. खरी बॅलेन्सशीट या लोकांकडे असायची, दुसरी सरकारला पाठवली जायची, तिसरी एक बिजनेस पार्टनरसाठी आणि चौथी इंडस्ट्रीसाठी. या सर्व घोटाळ्यावर मी लिखित स्वरुपात प्रश्न विचारले. काही कागदपत्रांवर शेरे मारले तेव्हा कुठे तरी यावर कारवाई होण्यास सुरुवात झाली.”
पण ही जी कारवाई होत होती ती जनता आणि करदात्यांचा पैसा लुटणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी होत होती. महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकदिवस वरप्रसाद यांना आव्हानं दिलं आणि म्हणाले की व्यावसायिक होणं इतकं सोपं नाही. व्यवसाय सुरु करण्यासाठी काही घोटाळे करावेच लागतात. एकदा तू स्वत: व्यवसाय सुरु कर मग तुला कळेल. या गोष्टी वरप्रसाद यांच्या मनात अगदी कोरल्या गेल्या होत्या. आणि त्याचवेळी त्यांनी निर्णय घेतला की ते व्यावसायिक बनणार आणि सर्व नियमांचे पालन करुन इमानदारीनं व्यावसायिक बनता येऊ शकतं. हाच तो क्षण होता जेव्हा वरप्रसाद रेड्डी यांच्या आयुष्यानं नवं वळण घेतलं आणि व्य़ावसायिक बनण्याच्या दृष्टीनं त्यांनी प्रवास सुरु केला.
विचार स्पष्ट होते, धोरण साफ होतं, मेहनत करण्याची तयारी होती, आणि डोक्यात काहीतरी करण्याचं वेड होतं आणि यामुळे त्यांना व्यावसायिक बनण्याची संधी सुध्दा लवकरच मिळाली.
वरप्रसाद रेड्डी यांना त्यावेळी हैद्राबाद बॅटरीज या कंपनीची माहिती मिळाली. ही कंपनी तोट्यात सुरु होती आणि लवकरच बंद होण्याच्या मार्गावर होती. मात्र या कंपनीचे प्रमोटर एक विद्वान व्यक्ती होते. ते न्युयॉर्क विद्यापीठात अस्थायी प्रोफेसर होते, एडमिनिस्ट्रेटीव्ह स्टाफ कॉलेजमध्ये सुध्दा ते शिकवायचे. बॅटऱ्यांबद्दल त्यांना बरीचशी माहिती होती. वरप्रसाद रेड्डी यांनी या संधीचा फायदा उचलायचं ठरवलं. हैद्राबाद बॅटरीज या कंपनीमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आणि ते कंपनीचे भागीदार बनले. त्यांनी खूप मेहनत केली. दिवसरात्र एक केला, सर्व ज्ञान पणाला लावलं आणि काहीच महिन्यात त्यांच्या मेहनतीचा रंग दिसू लागला. कंपनीला फायदा होऊ लागला. कंपनीने मोठमोठ्या विमानांसाठी, क्षेपणास्त्रांसाठी आवश्यक बॅटरी बनवायला सुरुवात केली. कंपनीला एकामागून एक मोठमोठ्या ऑफर्स मिळत गेल्या. कंपनी धावू लागली. आणि खूप नफा सुध्दा होऊ लागला. याच दरम्यान प्रमोटरनं नफा वाढवण्यासाठी सरकारला दिल्या जाणारा कर देऊ नये असा सल्ला दिला. आणि या सल्ल्यानं प्रमोटर आणि वरप्रसाद रेड्डी यांच्यात ठिणगी उडाली.
वरप्रसाद रेड्डी संस्कारी होते. नियमांचे आणि कायद्याचे पालन करणारे होते. आई आणि मामा यांच्या संस्कारांपासून ते कधीच वेगळे झाले नाहीत, त्यांनी नेहमीच अनियमितपणाचा विरोध केला होता. नैतिकता हा त्यांचा मोठा दागिना होता आणि अर्थातच यामुळे कंपनीत होणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांना रोखण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यामुळे नाराज झालेल्या प्रमोटर्सनं अचानकच अत्यंत वाईट पध्दतीनं त्यांना कंपनीतून काढून टाकलं. आयुष्याच्या त्या प्रवासाची आठवण करताना वरप्रसाद रेड्डी म्हणतात “ ते दिवस माझ्यासाठी खूप वेदनामय होते. मला खूप धक्का बसला होता. मला लवकरच कळलं की षडयंत्र करुन काढण्यात आलंय. कंपनीला पुनरुज्जीवीत करण्यासाठी मी कोणतेच प्रयत्न बाकी ठेवले नव्हते. या कंपनीमुळे मी व्यावसायिक बनलो होतो पण माझी इमानदारी काही लोकांना पसंत पडली नाही ”.
कंपनीतून काढल्यानंतर ते प्रमोटरचं कौतुक करतात. वरप्रसाद रेड्डी म्हणतात “ ते माझ्यापेक्षा जास्त हुशार आहेत. कंपनी चालवण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं. आम्ही खुप सारे पुरस्कार जिंकलो. जगभरात आमची चर्चा होऊ लागली. मी नेहमीच गुणवत्तेवर भर दिला आणि या अव्वल गुणवत्तेमुळेच आमच्या बॅटरींजना बाजारात खूप मागणी होती. मी त्या कंपनीतून खूप शिकलो. “ पुढे ते म्हणतात “ मी प्रमोटरकडून दोन मोठ्या गोष्टी शिकलो, काय करायला हवं आणि काय नाही.”
या गप्पांच्या दरम्यान हे जाणवलं की ज्यावेळी ते उदास व्हायचे, नोकरी सोडलेली असायची किंवा काढलेले असायचे तेव्हा ते गावी परत जाण्याचा विचार करायचे. आम्ही त्यांना विचारलं तुम्ही कित्येकदा गावी परत जाण्याचा विचार केला. पण तिथं राहिला नाही. शेती का नाही केली. या प्रश्नाचं त्यांनी अत्यंत सौम्य हसत उत्तर दिलं. “ माझ्या वडिलांना सतत वाटायचं की मी गावी येऊन इथंच राहीन त्यामुळे त्यांनी सर्व शेतीच विकून टाकली.”
शांता बायोटेक्निक्सच्या ऐतिहासिक यात्रेच्या सुखद घटनेविषयी बोलताना ते म्हणतात, शांता बायोटेक्निक्सच्या कर्मचाऱ्यांना चालकापासून ते वैज्ञानिकापर्यंत कंपनीत समभाग देण्यात आले होते. एका परदेशी कंपनी सनोफीनं हे समभाग विकत घेतले तेव्हा सर्व कर्मचारी मालामाल झाले. सगळे आनंदी झाले. आणि एक मोठी गोष्ट म्हणजे सनोफीनं खूप मोठी रक्कम देऊन कर्मचाऱ्यांकडून हे समभाग खरेदी केले होते. एका शेअरसाठी प्रत्येकाला सुमारे ५०० रुपये मिळायला हवे होते मात्र या परदेशी कंपनीनं प्रत्येकी २३४५ रुपये दिले होते. वरप्रसाद रेड्डी यांच्या मते शांता बायोटेक्निक्सची खरेदी केल्यानंतरही ही सनोफीनं कर्मचाऱ्यांप्रती अत्यंत उदारता दाखवली होती. सनोफीनं कंपनी ताब्यात घेतल्यानंतर सुध्दा वरप्रसाद रेड्डी कंपनीचे अध्यक्ष आणि ब्रँड एम्बेसेडर आहेत.
एका प्रश्नाचं उत्तर देताना वरप्रसाद रेड्डी यांनी म्हटलं, "मी एका तऱ्हेनं परदेशात झालेला अपमानाचा बदला घेतला होता. भारतात बनलेल्या या लसी युनिसेफ आणि अन्य आंतरराष्ट्रीय संस्थांनी खरेदी केल्या आणि जगभरातल्या करोडो मुलांना दिल्या. अत्यंत गर्वाने वरप्रसाद रेड्डी सांगतात आम्ही अनेक लसी मोफतही दिल्या आणि अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये या लसी मोफत देण्यात आल्या. भारतानं सिद्ध केलं की हा देश घेणारा नाही तर देणारा सुध्दा आहे.“
अत्यंत संयमित पध्दतीनं आपली कहाणी सांगणाऱ्या वरप्रसाद रेड्डीनं सांगितल की, "मी नफा कमवण्यासाठी किंवा व्यावसायिक योजना म्हणून शांता बायोटेक्निक्सची सुरवात केली नाही. मला खिजवण्यात आलं होते. आणि हे खिजवल्यामुळेच मी ही स्वत:ची कंपनी सुरु केली. आणि त्या परदेशी अपमानाला उत्तर दिलं.
यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा संबंधित कहाण्या :