एका कल्पक उद्योजिनीची कहाणी...
स्त्रियांच्या कपड्यांच्या आवडीविषयी बोलावे तेवढे कमीच... आजकाल ग्रामीण भागांतही चांगल्या दर्जाचे, फॅशनेबल आणि वैविध्यपूर्ण कपडे सहज उपलब्धही असतात... पण या सुंदर कपड्यांइतकीच स्त्रियांसाठी महत्वाची असतात ती त्यांची अंतर्वस्त्रे... मात्र या गोष्टीचे नाव काढताच काहीशी अवघडलेपणाची भावना दाटून येते... विशेष करुन ग्रामीण भागांत... शहरांमध्ये आज वैविध्यपूर्ण आणि चांगल्या दर्जाची अंतर्वस्त्रे सहज उपलब्धही असतात आणि ती खरेदी करण्याची साधनेही येथील स्त्रियांकडे असतात. त्याचबरोबर मुख्य म्हणजे शरीराची ठेवण लक्षात घेऊन, ऋतुमानानुसार अंतर्वस्त्रांची निवड केली पाहिजे, याची जाणीवही शहरी महिलांमध्ये बऱ्यापैकी दिसून येते.. मात्र या जाणीवेचा अभाव आणि स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांच्या खरेदी-विक्रीमध्ये प्रामुख्याने असलेला पुरुषांचा सहभाग यामुळे ग्रामीण भागांतील स्त्रियांना या अगदी मुलभूत गोष्टीपासून वंचित रहावे लागते..
नेमकी हीच गोष्ट गिरिजा सी पावटे यांना जाणवली... बंगळुरुला प्रवासानिमित्त गेल्या असताना त्यांना प्रकर्षाने हे जाणवले मात्र तेवढ्यावरच न थांबता त्यांनी त्याबाबत काहीतरी ठोस करण्याचा निर्णय घेतला... त्यातूनच जन्म झाला गंगावती एक्सपोर्टस् चा... व्यावसायिक बनण्याचे कोणतेही मोठे स्वप्न नसलेल्या अशा एका सामान्य गृहिणीच्या कष्टांची आणि कल्पकतेची ही गोष्ट.... एका उद्योजिकीचे हा प्रवास जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
दावणगिरीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या गिरिजा यांना डॉक्टर व्हायचे होते. पण खूपच लहान वयात त्यांचे लग्न झाले आणि नवरा आणि कुटुंब हेच त्यांचे आयुष्य बनले. “ घर आणि कुटुंब सांभाळून महाविद्यालयात जाण्याचा मी प्रयत्न केला पण ते खूपच कठीण होते. त्यामुळे मग मी निश्चय केला की किमान माझी मुले तरी चांगले शिक्षण घेतील,” गिरिजा सांगतात.
गिरिजा या स्वतः जरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेल्या नसल्या, तरी मुलांना मात्र त्यांनी इंग्रजी माध्यमाच्याच शाळेत घातले. एवढेच नाही तर त्यांच्या शालेय जीवनातील प्रत्येक पायरीवर त्यांची मदतही केली. “ कोणतीही गोष्ट मन लावून केल्यास, मुळीच अशक्य नसते, यावर माझा संपूर्ण विश्वास आहे,” गिरिजा म्हणतात. त्यामुळे शाळेतील अभ्यास घेऊन जेंव्हा मुले त्यांच्याकडे येत, तेंव्हा त्यांना थोडे अधिक कष्ट घेऊन पहिल्यांदा स्वतःला शिकावे लागे आणि त्यानंतर मुलांची मदत करता येई.
आपण नेहमी ऐकत असलेल्या कुटुंबांसारखेच त्यांचे कुटुंबही पारंपारिक होते. त्यांच्या पतीच्या कुटुंबापैकी बहुतेक जण अमेरिकेत स्थायिक झाले असले, तरी दावणगिरीमध्येही त्यांचा स्वतःचा साड्यांचा व्यवसाय होता. “ मी कुटुंब सांभाळत असे तर माझ्या पतींवर साडीच्या व्यवसायाची जबाबदारी होती,” गिरिजा सांगतात. आयुष्य सुरु होते. मात्र बंगळुरुचा एक प्रवास आपले आयुष्य बदलून टाकेल याची त्यांना कल्पनाच नव्हती. त्यापूर्वी कधीही आपण व्यावसायिक बनावे, अशी कल्पनाही त्यांनी केली नव्हती. मात्र तेथे त्यांना सुचलेल्या एका कल्पनेने सगळेच बदलून गेले.
शहरात खरेदीसाठी फिरत असताना त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आणि दर्जाची स्त्रियांची अंतर्वस्त्रे पहायला मिळाली. “ या गोष्टीने मी विचार करायला प्रवृत्त झाले. मला एक नक्की माहित होते की माझ्या शहरातील मुलींनाही अशी अंतर्वस्त्रे वापरायला जरुर आवडेल, पण त्यांना ती उपलब्धही नाहीत आणि ती घेण्यासाठी त्यांच्याकडे साधनेही नाहीत,” गिरिजा सांगतात.
भारतातील इतर कुठल्याही लहान शहरांप्रमाणेच दावणगिरीमध्ये देखील अंतर्वस्त्रांमध्ये मर्यादीत पर्यायच उपलब्ध होते. यामागचे प्रमुख कारण म्हणजे प्रामुख्याने पुरुषच अंतर्वस्त्रांच्या विक्रीमध्ये सहभागी असल्याने खरेदी करताना एक प्रकारचा अवघडलेपणा असे. यातूनच बहुतेक महिलांना शरीराच्या ठेवणीनुसार योग्य पद्धतीने अंतर्वस्त्रांची निवड केली पाहिजे, ही जाणीवही नसायची.
“ यासाठी काही तरी करावे अशी माझी इच्छा होती आणि आमच्या साडीच्या दुकानातच मी अंतर्वस्त्रांची विक्री करावी, असा विचार मी केला. पण त्याचवेळी मला हेदेखील माहित होते, की मला हवा असलेला ग्राहकांचा आवाका यामधून गाठता येणार नाही,” त्या सांगतात. त्यामुळे बऱ्यास संशोधनानंतर आणि कुटुंबाशी केलेल्या विस्तारीत चर्चेनंतर, त्यांनी स्वतःच्या संकेतस्थळामार्फतच ही अंतर्वस्त्रे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला.
ऑनलाईन जाण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल अधिक विस्ताराने सांगताना, गिरिजा म्हणतात, “ आजकाल सगळेच जण संगणकाचा वापर करतात. अगदी माझ्या शहरातही, लोकांना संगणक सहजपणे उपलब्ध असतो, मात्र चांगल्या दर्जाची अंतर्वस्त्र उपलब्ध नसतात. हेच चित्र भारतातील सगळ्याच छोट्या शहरांमध्ये दिसते. त्यामुळे या दोन गोष्टी एकत्र करण्याचे मी ठरविले.”
त्यांच्या संशोधन आणि योजनेतून त्यांना असे दिसून आले की, या उद्योगाची सुरुवात करतानाच मोठ्या नावांकडे जाणे किंवा एमबीए लोकांना नोकरीवर ठेवणे, फारसे व्यवहार्य नाही. त्यामुळे त्यांनी दावणगिरिमध्येच उद्योगाला सुरुवात केली आणि याच शहरांतील लोकांबरोबर काम सुरु केले. गिरिजा यांच्या मुलांनीच त्यांच्यासाठी संकेतस्थळाची उभारणी केली आणि हा व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक ते सॉफ्टवेअरही तयार केले आणि अशा प्रकारे गंगावती एक्सपोर्टस् चा जन्म झाला.
उद्योग सुरु करण्यामागचा मुख्य हेतू हा ग्रामीण भागातील महिलांना चांगल्या दर्जाची अंतर्वस्त्रे माफक किंमतीत उपलब्ध करुन देणे, हा असल्याने, मुख्य आव्हान होते ते शिपिंगचे आणि ग्राहकापर्यंत माल पोहचविण्याचे... पॅकेजिंग मात्र सोपे होते कारण त्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि साधने कुटुंबाच्याच साडीच्या दुकानात उपलब्ध होती.
सुरुवातीला कंपनीने स्पीड पोस्टचा पर्याय निवडला, पण त्यामाध्यमातून ग्रामीण भागातील त्यांच्या ग्राहकांपर्यंत उत्पादने पोहचण्यासाठी जास्त वेळ लागत होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी, वेगवेगळ्या कुरीयर कंपनींबरोबर जोडले जाण्याचा निर्णय गिरिजा यांनी घेतला.
व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, जेंव्हा त्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडत होत्या, तेंव्हा इबे (eBay) ने त्यांना जबरदस्त आधार दिला आणि हा व्यापार वाढविण्यासाठी मदत केली.
यापुढचा टप्पा म्हणजे दावणगिरीच्या महिलांना या उपक्रमात सहभागी करुन घेणे, हा होता. “ एखादी महिला विक्रेती अंतर्वस्त्रे विकत असल्यास स्त्रियांना सहाजिकच जास्त मोकळे वाटते. त्यामुळे सुशिक्षित महिलांना या उद्योगात गुंतविण्यासाठी ही मला एक संधी वाटली,” गिरिजा सांगतात.
आज गंगावती एक्सपोर्टस् केवळ भारतभरच नाही तर जगाच्या वेगवेगळ्या भागांत आपली उत्पादने पोहचवत आहेत. “जगातील सगळ्या तरुण मुलींना, मग त्या कोणत्याही आर्थिक पार्श्वभूमीच्या असोत, छान, उत्तम दर्जाची अंतर्वस्त्र माफक दरात उपलब्ध व्हावीत, हीच माझी इच्छा आहे,” त्या सांगतात.
गिरिजांच्या या उपक्रमाकडे लोकांचे लक्ष वेधले जात असून त्या सर्वार्थाने यासाठी कार्यक्षम आहेत. इबे (eBay) च्या शीमीन्सबिझनेस या स्पर्धेतील सहा विजेत्यांपैकी त्या एक आहेत.
“ भारतातील प्रत्येक स्त्रीला, अगदी ग्रामीण भागांतीलही, वैविध्यपूर्ण आणि चांगल्या दर्जाची अंतर्वस्त्रे मिळावीत, या एकाच गोष्टीवर मी लक्ष केंद्रीत केले आहे,” गिरिजा सांगतात.