वृक्षसंपदा आणि जैवविविधतेने सजलेला रंगीबेरंगी फुलपाखरांचा आवास ‘ओवळेकरवाडी बटरफ्लाय गार्डन’
पाना-फुलांवर भिरभिरणारी रंगीबेरंगी फुलपाखरे पहायला सगळ्यांनाच आवडते. मात्र बदलत्या काळाबरोबर वाढलेले सिमेंटचे जंगल आणि त्यासाठी वृक्षवेलींची झालेली कत्तल यामुळे पक्षी आणि झाडांच्या आधाराने वाढणाऱ्या इतर जीवसृष्टीप्रमाणेच फुलपाखरांची संख्याही कमी होऊ लागली आहे. वृक्षतोड ही अन्नसाखळीला बाधा पोहचण्याचे मोठे कारण आहे हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र वृक्ष आणि त्यावर अवलंबून जीवांच्या संवर्धनासाठी अभ्यासपूर्ण पद्धतीने दिवसरात्र मेहनत घेणारे विरळच. अशा मोजक्या लोकांमध्ये ठाण्यातील ओवळेकरवाडीत राहणाऱ्या राजेंद्र ओवळेकर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल.
कॉलेजमध्ये शिकत असताना राजेंद्रना त्यांच्या प्राध्यापकांनी आयुष्यात काहीतरी वेगळं काम करण्याचा दिलेला वडिलकीचा सल्ला त्यांच्या मनात सतत घोळत होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ठाण्यातल्या ‘सेंट पायस’ शाळेत पीटी शिक्षक म्हणून नोकरी करत असतानाच राजेंद्र घरची भातशेतीही सांभाळायचे. राजेंद्र यांना निसर्गाची आवड असल्यामुळे शेताच्या बांधावर असलेल्या झाडांमध्ये आणि त्यावर भिरभिरणाऱ्या फुलपाखरांमध्ये ते खूप रमायचे. पाहता पाहता त्यांना फुलपाखरांची आवड जडली आणि या बांधावर भिरभिरणाऱ्या फुलपाखरांची संख्या वाढविण्याचा ध्यास त्यांच्या मनाने घेतला. “फुलपाखरांबद्दल मिळेल ती माहिती मी आवडीने वाचू लागलो. या वाचनादरम्यान माझ्या लक्षात आले की सर्वच प्रकारच्या झाडांवर फुलपाखरं अंडी घालत नाहीत. फुलपाखराची प्रत्येक जात ही विशिष्ट झाडांवरच वाढते. त्यामुळे महागडे परदेशी वृक्ष किंवा कुठल्याही प्रकारच्या शोभेच्या झाडं-वेली लावून फुलपाखरांचे संवर्धन होऊ शकत नाही. त्यामुळे ही वृक्ष लागवड अभ्यासपूर्ण पद्धतीनेच झाली पाहिजे. मग मी फुलपाखरांना आवश्यक आवास वाढवून त्यांच्या संवर्धनासाठी वाहून घ्यायचं ठरवलं आणि १९९६ पासून ‘बटरफ्लाय गार्डन’ उभारण्याच्या कामाला सुरुवात केली,” असं राजेंद्र सांगतात.
त्यांनी आपल्या शेतजमिनीतील दोन एकर जमीन खास या कामासाठी वापरायची असे ठरवले आणि फुलपाखरांविषयी पूर्ण अभ्यास करुन त्यानुसार या जमिनीवर फुलपाखरांच्या संवर्धनासाठी आवश्यक झाडे वाढवायला सुरुवात केली. राजेंद्र सांगतात, “ठाण्यात पूर्वी खूप झाडं-वेली होत्या. मात्र हळूहळू बांधकामांमुळे स्थानिक झाडं दुर्मिळ झाली. त्यामुळे मला आवश्यक असणारी झाडं मला कुठून कुठून शोधून आणावी लागली. अनेक फुलपाखरांची अंडी घालण्याची झाडं वेगळी असतात. त्याला होस्ट प्लाण्ट म्हणतात आणि ज्यावर फुलपाखरु रस शोषायला येतं ती झाडं वेगळी असतात. त्याला नेक्टर प्लाण्ट म्हणतात. मी सुरुवातीला नेक्टर प्लाण्ट्सची संख्या जास्त लावली. जवळपास दोन ते तीन हजार नेक्टर प्लाण्ट लावली. जेणेकरुन फुलपाखरं बागेकडे फिरकू लागतील. शाळेत येता-जाता माझं परिसरातल्या झाडांचं निरिक्षण करण्याचं काम सुरुच असायचं. एखाद्या झाडाभोवती फुलपाखरु भिरभिरताना दिसलं की मी लगेच जवळ जाऊन तिथे फुलपाखराचे सुरवंट सापडते का हे शोधण्याचा प्रयत्न करायचो. सुरवंट सापडल्यास ते झाड किंवा झाडाच्या बिया आणून त्यापासून रोपटं तयार करुन ते बागेत वाढवायचो. असं करत करत आज नेक्टर प्लाण्ट आणि होस्ट प्लाण्ट मिळून बागेत एकूण दहा हजार झाडं आहेत.”
ते पुढे सांगतात, “स्टॅचिटार्फेटा हे ब्राझिलियन नेक्टर प्लाण्ट मी मोठ्या प्रमाणात लावलं. कारण त्याच्यावर वर्षभर फुलं असतात. त्यामुळे वर्षभर फुलपाखरं बागेत येत राहतात. त्याचबरोबर ट्रायडॅक्स म्हणजेच एकदांडी, दिंडा, घाणेरी ही नेक्टर प्लाण्ट लावली. काही प्रकारचं गवत, पानफुटी, निळं कृष्णकमळ, कडिपत्ता, लिंबू, रुई, आंबा, नारळ, शिंडी, फॅनपाम, विलायती चिंच, एरंड, खाजखुजली, बांबू, उंबर, मुसांडा, बोर, चिंच, वाघोटी, अशोक हे काही होस्ट प्लाण्ट्स आहेत. यासह आणखीही काही होस्ट प्लाण्ट्स बागेमध्ये लावलेले आहेत.”
जसजशी बागेतील झाडांची संख्या वाढत गेली तसतशी इथे भिरभिरणाऱ्या फुलपाखरांची संख्याही वाढू लागली. “संपूर्ण भारतामध्ये १० हजारापेक्षा जास्त जातीची फुलपाखरं आढळतात. मुंबईमध्ये १७० ते १८० प्रकार पहायला मिळतात. यापैकी १३८ प्रकारची फुलपाखरं आतापर्यंत ‘ओवळेकरवाडी बटरफ्लाय गार्डन’मध्ये दिसली आहेत,” असं राजेंद्र सांगतात.
महाराष्ट्राचा राज्यपक्षी असलेले ब्ल्यू मॉर्मनही येथे हजेरी लावते. भारतातील सर्वात मोठं फुलपाखरु सदर्न बर्डविंगही वारंवार बागेत दिसावं म्हणून राजेंद्र यांचे प्रयत्न सुरु असतात. त्याशिवाय रेड पायरट, कॉमन सेलर सारखी फुलपाखरं, वेगवेगळे स्कीपर्स, लहान लहान पिवळ्या आणि निळया रंगाची कॉमन बटरफ्लाइजही इथे आढळतात. तसेच काही प्रकारच्या गवतावर येणारी फुलपाखरंही पहायला मिळतात.
ओवळेकरवाडीच्या या बागेत आल्यावर फुलपाखरांविषयी नवनवीन आश्चर्यकारक माहिती मिळते. “साधारणपणे आपल्याला फुलपाखरु फुलावर येतं एवढंच माहिती असतं. पण असं नाही. फुलपाखरं फुलांपेक्षा गंधाकडे आकर्षित होऊन येतात. काही प्रकारची फुलपाखरं ही पक्व फळांवर येतात. तर काही मेलेल्या चिंबोऱ्या आणि मास्यांवर त्यांच्या शरिरातून मीठ जमा करायला येतात. अशी फुलपाखरंही बागेत यावीत, लोकांना ती पहायला मिळावीत म्हणून मी बागेत पिकलेली केळी, अननस, सिताफळ अशी फळं ठेवतो. यावर आलेली गाउडी बॅरोन सारखी फुलपाखरं लोकांनी पाहिलेली आहेत. अधून-मधून क्वचित चिंबोऱ्या मासेही ठेवतो. त्यांच्यावर ब्लॅक राजा, टावनी राजा अशी फुलपाखरं येतात,” असं राजेंद्र सांगतात.
ओवळेकरवाडी बटरफ्लाय गार्डन हे बटरफ्लाय लव्हर्स, फोटोग्राफर्स, बटरफ्लाय गार्डनवर पीएचडी करणाऱ्या व्यक्ती आणि लहान मुलांचे आवडते ठिकाण बनले आहे. “अनेकदा लहान मुलं आपल्या शाळेच्या सहलीबरोबर इथे येतात. इथे आलेल्या प्रत्येकाला आम्ही फुलपाखराच्या जीवनचक्राबद्दल आणि एकूणच फुलपाखरांबद्दल सर्व माहिती देतो. फुलपाखराच्या आयुष्याचे चार टप्पे असतात. फुलपाखराची मादी होस्ट प्लान्टच्या पानांच्या खाली अंडी घालते. जेणेकरुन अंड्यातून सुरवंट बाहेर पडल्यावर त्याला लागणारं अन्न म्हणजेच पानं त्याला खायला मिळतील. या सुरवंटाची पूर्ण वाढ झाल्यावर त्याचं कोषात रुपांतर व्हायला सुरुवात होते. या अवस्थेत ते काहीच खात नाही. कोष ही अवस्था स्थिर असते. लाळेच्या सहाय्याने तो झाडाच्या फांदीला चिकटतो आणि मग हळू हळू आपली कातडी टाकायला सुरुवात करतो. कोष कालांतराने गडद रंगाचा होतो. या गडदपणावरुन कोषातील फुलपाखराची वाढ समजते आणि एक दिवस या कोषातून सुंदर फुलपाखरु बाहेर येतं. ही सर्व माहिती सांगितल्यामुळे आणि प्रत्यक्ष या गोष्टी इथे पहायला मिळत असल्यामुळे लहान मुलं खुप खूष होतात. अनेकदा ती आपल्या पालकांना घेऊन पुन्हा बाग बघायला येतात,” असं राजेंद्र सांगतात.
इथे आलेल्या प्रत्येकाला विविध प्रकारची सुंदर सुंदर फुलपाखरं, त्याच्या जीवनचक्राविषयी माहिती आणि प्रत्यक्ष फुलपाखराचं जीवनचक्र यासह इथे असलेल्या विविध वनस्पतीही पहायला मिळतात. राजेंद्र यांनी प्रत्येक झाडावर त्याच्या इंग्रजी आणि मराठी नावाची पाटी लावल्याने मुलांना झाडांचीही माहिती होते. त्याशिवाय आता शहरामध्ये सहसा न दिसणारे कोंबड्या, बदक, ससा इथे असल्यामुळे लहान मुलांसाठी ते सुद्धा या बागेचे आकर्षण ठरते. त्याचबरोबर इथे असलेल्या झाडांमुळे विविध पक्षी आणि खार, सरडे, चतुर अशा झाडावर राहणाऱ्या जीवांचाही वावर इथे मोठ्या प्रमाणात असतो. या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी पाहता येत असल्यामुळे फक्त रविवारी सकाळी ८:00 ते दुपारी १२:३० पर्यंत सुरु असणाऱ्या या ‘बटरफ्लाय गार्डन’ला प्रत्येक आठवड्यामोठ्या प्रमाणात लोक भेट देतात. “दर रविवारी किमान शंभर लोक या गार्डनला भेट देतात. वर्षभरात इथे भेट देणाऱ्यांची संख्या दोन ते तीन हजारांवर आहे. इतर लोकांसाठी हे गार्डन फक्त रविवारी सुरु असतं. मात्र शाळांच्या सहली असतील तर त्यासाठी मी कधीकधी गुरुवारी गार्डन सुरु ठेवतो. गुरुवार माझा शाळेचा सुट्टीचा दिवस असल्याने तो दिवस मी या कामाला देतो,” असं राजेंद्र सांगतात.
ते पुढे सांगतात, “लहान मुलांना गार्डन दाखवण्यात मला जास्त आनंद असतो. कारण या त्यांच्या सहलीमुळे नकळत त्यांच्यामध्ये वृक्ष संवर्धनाची आवड निर्माण होत असते. केवळ लहान मुलांनाच नाही तर प्रत्येकाला माझं सांगणं असतं की तुम्ही तुमच्या घरामध्येही फुलपाखरांचा अनुभव घेऊ शकता. त्याकरिता गुंजाच्या, चिंचेच्या, लिंबाच्या बिया गोळा करा आणि रुजवा. पानफुटी, कृष्णकमळ, कडिपत्ता अशी कुंडीत लावता येणारी झाडं लावा. म्हणजे फुलपाखरं तुमच्या घरातही नक्की येतील.”
राजेंद्र यांनी आता होस्ट प्लान्ट वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ते सांगतात, “आता बदाम, विलायती चिंच, बहावा यासारखी झाडं मोठ्या प्रमाणावर लावायची आहेत. कारण या झाडांवर अनेक जातीच्या फुलपाखरांच्या माद्या अंडी घालतात. यामुळे एकतर फुलपाखरांची अंडी मोठ्या प्रमाणात घातली जातील. त्यामुळे सुरवंटही मोठ्या प्रमाणात तयार होतील आणि सुरवंटांसाठी विविध पक्षीही बागेत येऊ लागतील. दुसरं कारण म्हणजे फुलपाखरं मोठ्या प्रमाणात तयार होतील आणि मधमाशीपाठोपाठ परागीकरणाचा मुख्य स्रोत असलेल्या फुलपाखरांमुळे वृक्षसंपदा वाढायला मदत होईल.”
राजेंद्र यांच्या या दृष्टीकोनामुळे जैवविविधता आणि अन्नसाखळी यांचे परस्परावलंबत्व लोकांना प्रत्यक्ष अनुभवता येत असल्याने ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या संदेशाचे महत्त्व लोकांच्या मनात अधोरेखित होत आहे. विशेष करुन लहान मुलांच्या मनात वृक्षसंवर्धनाचे बीज रुजत आहे. यातूनच भविष्यात आपल्या भोवतालचा परिसर पाना-फुलांनी, पक्षी-पाखरांनी आणि आपल्या रंगीबेरंगी पंखांसह वृक्षवेलींवर भिरभिरणाऱ्या फुलपाखरांनी पुन्हा जिवंत होईल अशी आशा करायला हरकत नाही.