गुलाब पाकळ्यांपासून ‘वाईन’ निर्मिती करणाऱ्या जयश्री यादवांचा प्रेरणादायी उद्योग प्रवास
‘प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे’ या समर्थ उक्तीचा प्रत्यय पुण्यातील जयश्री यादव यांच्या गुलाब पाकळ्यांपासून वाईन निर्मितीच्या प्रकल्पाच्या शुभारंभाच्या धडपडीतून येतो. मुळात वाईन निर्मितीच्या उद्योगात एक महिला येते आणि ते देखील ‘गुलाबांच्या पाकळ्यांपासून वाईन’ म्हटल्यावर तुमच्या देखील भुवया उंचावल्या असतील ना! सातत्याने नऊ वर्ष सरकार दरबारी हा उद्योग सुरू करावा म्हणून प्रयत्नांची शर्थ करणाऱ्या जयश्रीताईंचा हा संघर्षमय ‘गुलाबी वाईन’ चा उद्योग प्रवास मात्र गुलाबाच्या ताटव्यांतून नक्कीच झाला नाही.
या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जिद्द आणि आत्मविश्वासपूर्ण वाटचाली बाबत ‘युवर स्टोरी मराठी’ने खुद्द जयश्री यांच्याशी बातचित करून त्यांच्या उद्योग स्वप्नातील गुलाबी वाईनच्या निर्मितीचा थक्क करणारा प्रवास जाणून घेतला, त्यांच्या या अथक मेहनत आणि नवे काही करून दाखविण्याच्या प्रयत्नातून कुणालाही नक्कीच प्रेरणा घेता येईल. शेतीचे फारसे ज्ञान नसताना हर्बल कल्टीवेटींग आणि प्रोसेसिंगच्या व्यवसायात स्वत:चे विश्व निर्माण करण्याचे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
चार चौघींसारखीच एक तरूण गृहिणी पदवी, पदव्योत्तर शिक्षण झाल्यावर संसाराच्या रहाटगाडग्यात लागलेली, लग्नानंतर घर गृहस्थीला हातभार लागावा म्हणून काहीतरी गृहोद्योग करत धडपड करून चरितार्थ चालविण्याचा प्रयत्न करणारी, असाच जयश्री यांचा प्रवास सुरू झाला होता. त्यावेळी त्यांच्या समोर संसारात आणि त्यासाठी सुरू केलेल्या उद्योगात अनंत आव्हाने होती. वेगवेगळ्या उद्योगांचा अनुभव घेता घेता त्यांनी सौंदर्य क्षेत्रात ब्युटी पार्लरच्या व्यवसायात दहा ते बारा वर्ष काम केले. त्याच वेळी त्यांना मैत्रिनीने हर्बल कल्टीवेटींग आणि प्रोसेसिंगच्या व्यवसायाबाबत मदतनीस म्हणून नोकरी देण्याच्या उद्देशाने यातील शिक्षण घेण्याची संधी मिळवून दिली. अशा रितीने या क्षेत्राचा परिचय झाल्याचे जयश्री सांगतात. या नव्या क्षेत्राची माहिती घेताना त्यातील तंत्रशुध्दता कायदे आणि नियमांच्या चाकोरीत काम करण्याच्या व्यावसायिकता यांच्या माहितीतून त्या समृध्द होत गेल्या. त्यात महिलांना व्यवसाय करताना येणा-या वेगळ्या अडचणी, बँकांची नियमावली, एकूणच उद्योगांच्या बाबतीत आपल्याकडे असणा-या उदासीन हेळसांडवृत्तीचा परिचय त्यांना झाला. तरीही नोकरीच्या उद्देशाने हे सारे जाणून घेणा-या त्यांच्या मनात हा स्वत:चा उद्योग करण्याचा विचार बळावत गेला. त्या म्हणतात की,
“साधारण दोन हजार सालच्या सुमारास प्रथम या गुलाबापासून गुलकंद तयार करण्याच्या प्रायोगिक उद्योगाची सुरूवात केली, गुलाब जल, आवळा कँडी असे पारंपारिक पदार्थ तयार करण्यासाठी आधी लहान प्रमाणात उत्पादने तयार करून त्यात जवळच्या परिचितांचे अभिप्राय मिळवत गेले, त्यातून विश्वास आणि हिमंत वाढत गेली”.
त्यानंतर मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स सारख्या संस्थांच्या मदतीने आणि सहकार्यातून उद्योगांचे परवाने नियम आणि मार्गदर्शन मिळाले. त्यातून मग आजच्या जयश्री प्रॉडक्टस् या कंपनीचा जन्म झाला. त्यात सध्या पाच प्रकारची उत्पादने तयार केली जातात ज्यांना चांगली मागणी आहे. त्यात गुलाब जल, गुलकंद, आवऴा कॅन्डी, वाळा सरबत अशा पारंपारिक उत्पादनांची निर्मिती केली जाते.
या सा-या उद्योग निर्मिती मध्ये कोणत्याही प्रशिक्षण किंवा शेती अथवा व्यावसायिक शिक्षणाशिवाय काम करत असल्याने सुरूवातीला अनेक अडचणी आल्या अगदी बाजार विपणनापासून, भांडवल उभारण्यासाठी बँकांच्या कठोर नियमांपर्यंत, मात्र जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी या बळावर वाटचाल होत राहिली असे जयश्री म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, “याच काळात काही महिला बचत गटांना प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली त्यांना शिकवता शिकवता गुलाबाच्या पाकळ्यापासून गुलकंदा प्रमाणेच इतरही उत्पादने तयार करता येतील असा विचार तयार झाला.”
वेगवेगळी सरबते कशी तयार करावी यावर अभ्यास आणि प्रयोग करताना गुलाबाचे सरबत देखील त्यांनी बाजारात आणले. देशी गुलांबाची स्वत: लागवड करून त्यातून दर्जा संवर्धनांचा प्रयत्न सुरू झाला. कधीही शेती न केलेल्या केवळ गृहिणी असलेल्या महिलेने या उद्योगात केलेली ही भरीव लक्षणीय प्रगतीच म्हणावी लागेल. त्यानंतर दहा एकरात गुलाब शेती आणि प्रक्रिया यांच्या या उद्योगाचे बस्तान बसले, त्यात घरच्यांचा सहभाग पाठिंबा आणि सहकार्य याशिवाय काहीच शक्य नव्हते असे त्या म्हणतात. अगदी स्वत:च्या मुलींपासून भाच्यांपर्यंत सा-यानी वेळोवेळी पाठीशी मदत तयार ठेवली नव्या कल्पना, संकल्पना, चर्चा यातून हे उद्योगांचे गुलाबपुष्प फुलत राहिले!
“त्यानंतर सन २००७- ०८च्या सुमारास वाईनरी बाबतचा विचार प्रथम मनात आला” जयश्री सांगतात. शेतीचे फारसे ज्ञान नसलेल्या महिलेने कशाप्रकारे हर्बल उद्योगात रोजगारक्षम उद्योग यशस्वीपणे उभा केला यावर एक माहितीपट त्यांच्या या कार्यावर तयार करण्यात आला होता, त्याच सुमारास त्यांना राज्य सरकार आणि अनेक खाजगी संस्था आणि संघटनाकडून त्याच्या उद्योगविश्वातील कामासाठी पुरस्कार देखील मिळण्यास सुरूवात झाली होती. सुमारे १०-१२ जणांना रोजगार देणा-या व्यवसायात त्यांनी स्वत:ची उत्पादने बाजारात आणली होती. वाईन निर्मिती बाबत त्यांच्या कन्या कश्मीरा यादव यांनी विशेष प्रशिक्षण घेतले आणि गुलाबाच्या वाईनसाठी का प्रयत्न करू नये असा विचार केला. कश्मीरा यादव यांनी तुर्की मध्ये गुलाबापासून तेल काढण्या-या संस्थेत दीड महिना इंटर्नशिप केली आहे.
सध्या देशात वाईनरी उद्योग सामान्य गृहिणी असलेल्या महिलेच्या आवाक्यातील उद्योग असेल असे समजण्याचे कारण नाही, मात्र धाडस आणि जिद्द यांच्या बळावर या गुलाबी स्वप्नांचा पाठलाग सुरू झाला. आपल्या राज्यात वाईनरीसाठी प्रस्थापित चौकटीत, कायद्याच्या परिभाषेत आणि संशोधनपर नव्या संकल्पनातून नव्या उद्योगांच्या उभारणीत जी उदासीनवृत्ती आहे ती या स्वप्नाना आडवी आलीच. द्राक्ष, चिकू, जांभूळ अशा फळांपासून वाइन निर्मिती होत असताना राज्य सरकारने गुलाबाच्या पाकळ्यांपासून वाइन निर्मिती करण्याच्या देशातील पहिल्या वहिल्या प्रकल्पाला आज जरी कायद्यात बदल करून हिरवा कंदील दाखवण्यासाठी पुढाकार घेतला असला तरी नऊ वर्षापूर्वी त्याला नकार देण्यात आला. त्यात कायदेशीर अडचणी परवाना पध्दती आणि बाबूशाही यांचा हिमालय मध्ये आला.
जयश्री म्हणाल्या की, “ या प्रकल्पाला कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या होत्या. राज्याच्या विधी आणि न्याय विभागाने ‘अदर सबस्टन्स’पासून वाइन निर्मिती करण्याच्या शब्दाला हरकत घेतल्याने हा प्रकल्प खोळंबला होता. मात्र, आता या उल्लेखाला वगळण्यात आल्याने हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू होण्यास काही अडचण येणार नाही.” नऊ वर्ष त्यासाठी त्यांच्या जिद्द आणि संयमाची परिक्षा सरकारने घेतली. एका उद्योगिनीला राजकीय नेते, खेडचे तत्कालीन आमदार दिलीप मोहिते पाटील, तत्कालिन मंत्री गणेश नाईक या सा-यांना यासाठी आपल्या प्रकल्पाचे अभिनव स्वरूप आणि त्याची निकड याचे महत्व पटवून द्यावे लागले. त्यांनी त्यास होकार देवून सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतरही या देशाच्या नोकरशाहीने उद्योग जगताला मारलेल्या मगरमिठीचा अनुभव घेत शेवटी भाजपाच्या स्थानिक आमदार माधुरी मिसाळ आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राजकीय पाठींब्यामुळे शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्नाचे साधन देण्यासाठी गुलाब पाकळ्यांच्या वाइन प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी पाऊल उचलण्यात आले. जयश्री यादव यांच्या या प्रायोगिक प्रकल्पाचा सुरुवातीचा खर्च ३१.८० लाख रुपये आहे. आतापर्यंत राज्यात द्राक्ष, चिकू, जांभूळ अशा फळांपासून वाइन निर्मिती केली जात आहे. मात्र, फुलांचे खोड, पाने, फुले यांचा वापर करत नैसर्गिक पदार्थांपासून वाइन निर्मिती करण्याबाबत हा देशातील पहिलाच प्रयोग आहे.
जयश्री यादव यांनी गुलाब फुलांच्या पाकळ्यांपासून वाइन निर्मिती करण्याचे पेटंट मिळवले आहे. आता या प्रकल्पाला ‘पायलट’ (पथदर्शी) म्हणजे प्रायोगिक तत्त्वावर मान्यता मिळाली. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांच्या गुलाब शेतीला प्राधान्य मिळू शकते. मुख्य म्हणजे वाइन निर्मितीला चालना मिळाल्यास राज्य सरकारला नव्या उत्पन्नाच्या तसेच रोजगारांच्या संधी मिळणार आहेत. यातून सुमारे २५-३० जणांना रोजगार सुरूवातीला मिळणार आहे. नऊ वर्षांच्या भगीरथ प्रयत्नांनंतर नव्या गुलाब वाइन्सच्या उद्योगाला मूर्त स्वरूपात आणण्याची किमया साधणा-या या उदयोगिनीचा ‘युवर स्टोरी मराठी’ ला नितांत आभिमान आहे. त्यांच्या या अभिनव प्रयोगशिलता जिद्द आणि संकल्पनेचे कौतूक करताना राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “जयश्री यादव यांनी संशोधन केलेल्या गुलाब पाकळ्यांचा हा वाइन प्रकल्प खूपच वेगळा आहे. असे प्रकल्प यशस्वी झाल्यास रोजगार निर्मिती तसेच देशी गुलाबाच्या शेतीला चालना मिळेल. विधी व न्याय विभागाने मंजुरी दिल्याने हा प्रकल्प मार्गी लागेल ”.
अखेर सरकारला जाग आली त्यानंतरही आपल्या संयमीपणाची प्रचिती देताना जयश्री यांनी प्रतिक्रिया दिली की, “ सरकार माझ्या प्रयोगाला मान्यता देत आहे, हे ऐकून आनंद झाला. महिन्याभरातच परवानगीचे पेपर्स माझ्या हाती मिळतील. गुलाबाच्या पाकळ्यांपासून मद्यनिर्मितीचा प्रयोग ७ ते ८ वर्षांपूर्वी केला आणि त्याचे पेटंट मिळवले आहे आता पुढच्या प्रवासाची वाट सोपी झाली आहे.”