मोदींचा मान, ‘अॅप्स’ची खाण, देशाची शान, खरा किंग खान… इम्रानभाई!
‘माणसापेक्षा त्याची प्रतिमा (इमेज) अधिक वेगात प्रवास करते’, असे वाळवंटी तत्वज्ञान… राजस्थानातल्या रेती, मातीत रुजलेले… इथल्या माणसांच्या रक्तात भिनलेले. इम्रान खान मरुभूमीतल्या ज्या अलवर भागातले, त्या भागात तर हे तत्वज्ञान लोक जगतात… म्हणजे प्रतिमेला अक्षरश: जपतात… चांगली प्रतिमा पसरली तर हरकत नाही, पण अपकीर्ती होता कामा नये, अशी या लोकांच्या जगण्याची दशा आणि दिशा असते.
आता इम्रान खान यांचेच बघा ना. त्यांनी आपला देश सोडून कुठेही प्रवास केलेला नाही, पण अशी काही प्रतिमा कमवली, की साता समुद्रापार त्यांचे नाव झाले. ते इंग्लंडला गेले नाहीत, पण त्यांचे नाव तिथे जाऊन पोहोचले. प्रतिमा पोहोचली. पसरली. अगदी जगभर.
मिडियाचे लोक कुठून-कुठून मग इम्रान खान यांच्या घरी धडकले. सर्वच चॅनेल्सवर त्यांच्या मुलाखती झळकल्या आणि वर्तमानपत्रांनीही रकानेच्या रकाने भरले.
इंग्लंडच्या वेम्ब्ले स्टेडियममध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून इम्रान खान यांचा उल्लेख काय केला. कोण हे इम्रान म्हणून सर्वदूर उत्सुकता ताणली गेली. मोदी लंडनला शुक्रवारच्या भाषणात म्हणाले होते, ‘‘आमचा भारत तुम्हाला कुठे बघायचा असेल तर तो इम्रान खानसारख्या लोकांमध्ये सामावलेला आहे.’’ आणि अलवरचे इम्रान खान रातोरात स्टार बनले. पत्रकारांनीही लगेचच गुगल सर्चची मदत घेतली. कोण हे इम्रान म्हणून जाणून घेतले. मुलाखत हवी म्हणून त्यांना ईमेल केले. फोन केले.
‘‘मला फार छान वाटते आहे, खुप आनंद होतो आहे,’’ अशीच इम्रान यांची साधीसरळ प्रतिक्रिया होती. ‘दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘एक अस्सल भारतीय’ म्हणून इम्रान खान यांचे प्रतिकात्मक उदाहरण जगासमोर ठेवले, त्याक्षणी तुमच्या मनात कोणता विचार आला,’ या प्रश्नावर इम्रान म्हणाले, ‘‘माझ्या दृष्टीने हे सगळे अनपेक्षित होते. म्हणजे मी स्वप्नातही याची कल्पना केली नव्हती. विचार काय येणार? मी तर थक्क झालेलो होतो. आता माझ्या घरासमोर इतके पत्रकार जमलेले आहेत. ओबी व्हॅन लागलेल्या आहेत. माझ्या आई-वडिलांनाही कळत नाहीये, की त्यांच्या मुलाकडून असे काय आक्रित घडलेय, की आज इतके लोक आपल्या दारी जमलेले आहेत.’’
पेडणेकरांच्या रुपात ‘फरिश्ता’
इम्रान ३४ वर्षांचे आहेत. अलवरमधील संस्कृत विद्यालयात ते शिक्षक आहेत. इथेच लक्ष्मीनगरात एका लहानशा खोलीवजा घरात राहातात.
२०१२ मध्ये अलवरचे तत्कालिन जिल्हाधिकारी आशुतोष पेडणेकर यांनी इम्रान यांची ‘वेबसाइट’ बघितली. सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांची उत्तरे देणारी ही ‘वेबसाइट’ होती. जिल्हाधिकारी पेडणेकर यांना ती फार आवडली. त्यांनी इम्रान यांना, ‘आता जमाना वेबसाइटचा नाही ‘अॅप्स’चा आहे म्हणून ‘अॅप्स’ बनवण्यात तू आपले कौशल्य आजमावून बघ’, असा सल्ला दिला. इम्रान यांना अॅप्स म्हणजे काय तेही माहिती नव्हते. इम्रान यांच्याकडे मोबाईलही साधासुधाच होता. जिल्हाधिकारी पेडणेकरांनी इम्रानला आपल्या स्मार्टफोनवर ‘ॲअॅप्स’ काय असते ते दाखवले. इम्रान यांना आपल्याडून टॅबलेटही भेट म्हणून दिले. इथूनच खरंतर सातासमुद्रापार जाऊन भिडणाऱ्या इम्रान यांच्या प्रतिमेचा प्रवास सुरू झालेला होता.
नंतर ॲअॅप्स विकसित करण्याचे तंत्र हा जणू इम्रान यांचा ध्यास बनला. यासंदर्भातली पुस्तके ते झपाटल्यागत वाचू लागले. अधिक माहितीसाठी ऑनलाइन सर्चिंग करू लागले.
पेडणेकरांबद्दलच्या कृतज्ञेतेची इम्रानकथा सुरू असतानाच इम्रान यांचे लहान भाऊ इद्रिस एक छानसा व्यत्यय आणतात. म्हणतात, ‘‘पेडणेकरांशी भेट झाल्यानंतर कॉम्प्युटर सायन्सवरील माझ्या पुस्तकातूनही इम्रानभाईंनी ‘एनसीईआरटी’साठी एक सायंस ॲअॅप साकारले.’’
इम्रान यांनी नंतर कितीतरी विषयांवर ॲअॅप्स विकसित केले. प्राथमिक आणि पूर्वमाध्यमिकच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील, असे भूगोल, इतिहास, गणित या विषयावरील ॲअॅप्स तयार केले. स्पर्धा परीक्षांसाठीही ॲअॅप्स तयार केले.
‘ऐ मेरे वतन, तेरा तुझ को अर्पण’
केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी इम्रान खान यांना खास बोलावून घेतले होते. इम्रान अभिमानाने सांगतात, ‘‘मी तयार केलेले सगळे ॲअॅप्स मी राष्ट्राला अर्पण केले. मोबदल्याविषयी मला विचारणा झाली होती, पण मी त्याला नम्रपणे नकार दिला.’’ इम्रानचे हे ‘ॲअॅप्स डोनेशन’ म्हणजे केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेचाच एक भाग. विद्यार्थ्यांना आणि पालकांना ऑनलाइन शैक्षणिक साहित्य पुरवणे, या मोहिमेंतर्गत अभिप्रेत आहे. देशातील कोट्यवधी विद्यार्थी आणि पालकांची सेवा आपण या माध्यमातून बजावू शकलो, याचा इम्रान यांना सार्थ अभिमान आहे.
शास्त्रज्ञ व्हायचे होते…
इम्रान बारावी शिकलेले आहेत. पुढले शिक्षण सोडून शिक्षकाची नोकरी त्यांना पत्करावी लागली. इम्रान सांगतात, ‘‘माझे वडील शेतकरी. गणित आणि विज्ञान या विषयांत मला कमालीची गती होती, पण वडिलांना त्याचे सोयरसुतक नव्हते. त्यांच्यासह सगळेच सरकारी नोकरी मिळते आहे तर चिटकून जा, असेच मला सांगत सुटले. किंबहुना माझ्या मागेच लागले. मीही मग धरली नोकरी.’’
इम्रान सिंहावलोकन करतात. पुढे नोकरी सांभाळून त्यांनी एका खासगी महाविद्यालयातून डबल एमए केले. आधी इंग्रजी साहित्यातून आणि नंतर अर्थशास्त्रातून.
सारिस्का व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या खारेडा या खेड्यात इम्रानचे बालपण गेले. शाळा त्याच्या घरापासून दहा किलोमीटर अंतरावर होती. अर्थात याचा त्याने कधी बाऊ केला नाही, पण विज्ञान विषयात उच्च शिक्षण घेण्याची संधी त्याला केवळ त्याच्या एकूण वातावरणामुळे मिळू शकली नाही, याचे वैषम्य आजही आहे. ‘‘मला शास्त्रज्ञ व्हायचे होते. गणित आणि विज्ञानाचे मला वेड होते. पण प्रोत्साहन नव्हते, की पाठबळ नव्हते. हे विषय मला पुढे घ्यायचे होते. स्पेशलायझेशन करायचे होते, पण काहीच जमले नाही. नोकरी करावीच लागली. इथं अलवरलाच असं नाही, आपल्या देशातच सरकारी नोकरी म्हणजे जणू इंद्राचं आसन, असाच सर्वसाधारण समज आहे. मी त्याचाच बळी ठरलो.’’
‘भाईजान म्हणजे अब्दुल कलाम’
बंधू इद्रिस पुन्हा मध्ये टपकतात. अर्थात मधाच्या थेंबांसारखेच… ते म्हणतात, ‘‘इम्रान भाईजान म्हणजे आमच्या कुटुंबातले अब्दुल कलाम! (स्वर्गीय राष्ट्रपती)’’ इद्रिस २५ वर्षांचे आहेत. सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. ते म्हणतात, ‘‘कुटुंबातल्या इतर मोठ्यांमुळे स्वत:चे झाले तसे माझे नुकसान इम्रानभाईंनी होऊ दिले नाही. मी आज जे काही आहे ते केवळ त्यांच्यामुळेच. ते माझे आदर्श आहेत. मलासुद्धा त्यांच्याप्रमाणेच कुटुंबाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करायचेय.’’ इम्रान, इद्रिस मिळून चार भाऊ आहेत आणि तिन बहिणी. इम्रान तिसरे.
इम्रान यांचे ॲअॅप जगत
इम्रान यांच्या नावावर ५३ ॲअॅप्स आहेत. ‘gktalk_Imran’. गुगल प्ले स्टोअरवरून ते उपलब्ध होतात.
‘जनरल सायंस’ हे त्यांचे हिंदीतील सर्वांत लोकप्रिय ॲअॅप आहे. ५ लाखांहून जास्त ते डाउनलोड करण्यात आलेले आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटीची या ॲअॅपला गरज नाही, हे विशेष. जीवन विज्ञान विषयावर ३०० प्रश्न आणि उत्तरे त्यात आहेत. ‘हे ॲअॅप विज्ञानाच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देते. विद्यार्थ्यांसाठी तर ते उपयुक्त आहेच, त्यासह आयबीपीएस, आयएएस, स्टेट पीएससी, एसएससी आणि इतर शासकीय परीक्षांसाठीही उपयुक्त आहे. शासकीय आस्थापनांतून संधीच्या शोधात असलेल्यांसाठीही ते उपयुक्त आहे. पात्रता परीक्षार्थींनाही यातून फायदाच आहे, असे या ॲअॅपच्या उपयुक्ततेबद्दल प्लेस्टोअरवर नमूद करण्यात आलेले आहे.
इम्रानचे दुसरे लोकप्रिय ॲअॅप म्हणजे इतिहास सामान्य ज्ञानावरील आहे. एक लाखांवर लोकांनी ते डाउनलोड केलेय. हिंदी व्याकरण, भूगोल, हिंदी, भारतीय राजकारण सामान्य ज्ञान या विषयांवरील इम्रानच्या ॲअॅप्सनाही एवढेच डाउनलोड साधारणपणे मिळालेले आहेत.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सौर उर्जा, निबंध लेखन, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द, मूलभूत संगणकीय ज्ञान, मानवी शरीररचना, मोगल साम्राज्य आणि असल्या लहानमोठ्या विषयांवरही इम्रान यांनी ॲअॅप्स तयार केलेले आहेत.
तरुणांना इम्रान यांचे एकच सांगणे आहे…
‘‘जी काही तुमची आवड आहे. ती प्रामाणिकपणे जोपासा. भले ती आवड जोपासण्यातून तातडीने फळ मिळणार नसेल. पण तीच तुम्हाला भविष्यात सगळं काही मिळवून देईल.’’
दृष्टिक्षेपात इम्रानपट
• शुक्रवारी सव्वा बारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘माझा भारत अलवरच्या इम्रानमध्ये वसलेला आहे.’’ इम्रान यावेळी झोपलेले होते
• राजेश नावाच्या एका मित्राने इम्रानला फोन करून कळवले, की पंतप्रधान तुझ्याबद्दल हे असं बोललेत म्हणून. इम्रानला वाटले आपण झोपेतच आहोत आणि स्वप्न बघतोय म्हणून, पण हे खरे होते.
• इम्रान यांनी ३ वर्षांत ५२ ॲअॅप्स आणि शंभराहून अधिक वेबसाइटस् तयार केलेल्या आहेत. इम्रान यांच्या घरात टीव्ही नाही. अॅप बनवण्याचे रितसर ट्रेनिंगही त्याने घेतलेले नाही.
• इम्रान विवाहित आहेत. २५ लाखांहून अधिक लोकांनी त्यांचे ॲअॅप्स डाउनलोड केलेले आहेत, यावरून त्यांच्या कामाची गुणवत्ता व त्यांची लोकप्रियता लक्षात येते.
• इम्रान यांना ॲअॅपसंदर्भात दररोज शंभराहून अधिक ईमेल आणि फोन येतात. त्यांची मुलगी सामिया अॅप्सच्या डिझाइनचे काम बघते. लवकरच ते मुलांसाठी व्हिडियो अपलोड करणार आहेत.