अनाथ ‘ज्योती'च्या जिद्दीची भरारी : शेतमजूर ते सॉफ्टवेअर सोल्यूशन 'सीईओ'
अनाथआश्रमात राहणा-या मुलीनं त्या रात्री सर्व नियम तोडले. आपल्या मैत्रिणी ज्यांना ती प्रेमाने अक्का म्हणत असे त्यांच्यासोबत ती मुलगी मध्यरात्रीनंतर चित्रपट पाहून परतली होती. तेंव्हाचे आंध्र आणि आता तेलंगणात असलेल्या वारंगल जिल्ह्यातल्या अनाथआश्रमामध्ये ती मुलगी आपल्या मैत्रिणींसोबत राहत असे.
ती शिवरात्र होती. त्या दिवशी ब्रम्हांडामधले सगळे ग्रह भगवान शंकराच्या प्रभावशाली नृत्याचे साक्षीदार होण्यासाठी एकत्र येतात अशी समजूत आहे. शिवरात्रीला गावातल्या शंकराच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्या मुलीनं धाडस करण्याचं ठरवलं.सर्व मुलींसोबत प्रेम चित्रपट पाहण्याचा तिनं निश्चय केला.
अनिला ज्योती रेड्डी यांनी आयुष्यामध्ये मोठी मजल मारलीय. तरीही तेलंगणा राज्यातल्या वांरगल जिल्ह्यातल्या छोट्या गावात घडलेली घटना ती घटना अगदी काल घडल्यासारखी त्यांना आठवते. “ त्या रात्र आम्ही रात्री उशीरा अनाथआश्रमात परत आलो. त्यावेळी अधिक्षकांनी आमची चांगलीच खरडपट्टी काढली. आम्हाला बराच मारही खावा लागला.पण त्यावेळी चित्रपटाची नशा माझ्या डोक्यात भिनली होती. त्या नशेत मला काहीच जाणवलं नाही. आपणही प्रेमात पडून लग्न करावं हेच मला सारखं वाटत होतं,” असं ज्योती यांनी सांगितलं.
पण ज्योती यांच्या नशिबात वेगळंच काही लिहिलं होतं. चित्रपट वेडानं झपालेल्या ‘त्या’रात्रीनंतर बरोबर वर्षभरानंतर त्यांचं लग्न झालं. त्यावेळी ज्योतींचं वय होतं अवघे सोळा वर्ष. ज्योतींचा नवरा त्यांच्यापासून दहा वर्षांनी मोठा होता. या बालविवाहामुळे सुखी आयुष्याचं ज्योतीचं स्वप्न तुटलं. त्यांचा नवरा जेमतेम शिकलेला शेतकरी होता. तेलंगणातल्या कडक उन्हात ज्योतींना दररोज शेतामध्ये घाम गाळावा लागत असे. दिवसभर राबल्यानंतर त्यांना मजुरी मिळायची ती फक्त पाच रुपये.१९८५ ते ९० ही पाच वर्ष ज्योती हेच खडतर काम करत होत्या.
सध्या ज्योती अमेरिकेत राहतात. दरवर्षी हैदराबादमध्ये येणा-या ज्योती यांनी फोनवरुन गत आयुष्याला उजाळा दिला. “१७ व्या वर्षीच मी आई बनले. रोज सकाळी लवकर उठून घरातली सारी कामं पूर्ण करायची.त्यानंतर दिवसभर शेतामध्ये मजुरी केल्यानंतर संध्याकाळी पुन्हा घरातली कामं करावी लागत. त्यावेळी आमच्या घरामध्ये स्टोव्ह देखील नव्हता. त्यामुळे चुलीवरच सारा स्वयपांक करावा लागत असे.”असं ज्योती यांनी सांगितले.
१५ दशलक्ष डॉलर टर्नओव्हर असलेल्या सॉफ्टवेअर सोल्यूशन या अमेरिकी कंपनीच्या ज्योती सीईओ आहेत. त्यांच्या आयुष्याची गोष्ट ही एखाद्या कादंबरी सारखी आहे. ज्यामधली नायिका आयुष्यभर सतत कष्ट केल्यानंतर श्रीमंत होते. आपलं नशीब बदलण्यासाठी ज्योती यांनी प्रचंड कष्ट केले आहेत. प्रचलित आयुष्याच्या वाटेवर चालण्यास त्यांनी नकार दिला. वेगळ्या वाटेवर चालत असताना आलेल्या सर्व संकटांचा जिद्दीनं सामना केला. त्या संकटांवर यशस्वी मात करुन त्या यशस्वी झाल्या.
ज्योती यांचा जन्म गरिब घरात झाला. त्यांच्या सासरीही अगदी बेताची परिस्थिती होती. पोट भरण्यासाठी चार वाटी डाळ आणि भात मिळणं ही त्यांना स्वप्नवत वाटत होतं. “ त्या परिस्थितीमध्येही मुलांना चांगलं आयुष्य कसं मिळेल याचा मी सतत विचार करत असे. मी जगतेय तेच आयुष्य मुलांना जगायला लागू नये अशी माझी इच्छा होती .” सोळाव्या वर्षी त्यांचं लग्न झालं. त्यानंतर वर्षभराच्या अंतरानेच त्यांनी दोन मुलींना जन्म दिला. अठराव्या वर्षीच ज्योती दोन मुलींच्या आई झाल्या होत्या. मुलांसाठी औषधं किंवा खेळणी घेण्यासाठी आवश्यक पैसे त्यांच्याकडे नव्हते. त्यांनी मुलींना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत न घालता तेलगू माध्यमाच्या शाळेत घातलं. कारण “तेलगू शाळांची फी प्रती महिना २५ रुपये होती. तर इंग्रजी शाळांची फी होती प्रती महिना ५० रुपये. दोन्ही मुलींच्या शिक्षणावर दर महिन्याला ५० रुपयेच खर्च करणे मला शक्य होते.त्यामुळे मुलींना तेलगू माध्यमाच्या शाळेत घातलं ,” असे ज्योती यांनी सांगितले.
ज्योती यांना तीन भावंडं आहेत. घरची गरिबी असल्यानं आई वारली असं सांगत ज्योती आणि त्यांच्या बहिणीला वडिलांनी आनाथआश्रमात घातलं. पण ज्योतीची बहीण अनाथआश्रमात टिकली नाही. “ मी पाच वर्ष अनाथआश्रमात राहिले. तिथलं आयुष्य खऱोखरच अत्यंत खडतर होते. माझ्या बहिणीनं स्वत:ला त्या वातारवणाशी जुळवून घेतलं.पण मला ते शक्य झालं नाही. त्यामुळे पाच वर्षानंतर वडिलांनी मला परत नेलं. पण ज्योतीचा निर्धार कायम होता. आईची सतत आठवण येत असूनही ज्योती अनाथआश्रमाच्या वातावरणाशी एकरुप झाली.” अशी आठवण त्यांच्या बहिणीनं सांगितली.
अनाथ आश्रमातल्या आठवणी ज्योती आजही विसरलेल्या नाहीत. मला आठवतंय, “दरवर्षी एक श्रीमंत व्यक्ती आश्रमात मिठाई आणि पांघरुणाचं वाटप करण्यासाठी येत असे. त्यावेळी मी अत्यंत अशक्त होती. तेंव्हा एक दिवस मी खूप श्रीमंत बनेल आणि माझ्या सुटकेसमध्ये एकाचवेळी १० साड्या असतील अशी स्वप्न मी पाहत असे ” , अशी आठवण ज्योतींनी सांगितली.
ज्योती दरवर्षी २९ ऑगस्ट या दिवशी भारतामध्ये येतात. याच दिवशी मायदेशी येण्याचं कारणही खास आहे. कारण २९ ऑगस्टला ज्योती यांचा वाढदिवस असतो. तो दिवस वारंगलमध्ये वेगवेगळ्या अनाथआश्रमातल्या मुलांच्यासोबत ज्योती साजरा करतात. त्याचबरोबर मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या मुलांसाठीही त्या एक संस्था चालवतात. “ या संस्थेमध्ये २२० मुलं राहतात. देशाच्या लोकसंख्येच्या दोन टक्के व्यक्ती अनाथ आहेत. त्यांना जवळचं कोणीच नाही. त्यांची कोणतीही ओळख नाही. कुणालाच याची चिंता नाही. त्यांना दुस-या व्यक्तींच्या प्रेमाची गरज आहे. पण अनाथआश्रमात काम करणा-यांना याचं काहीच सोयरसूतक नाही. ती मंडळी केवळ पैशांसाठी काम करतात ”, अशी खंत ज्योतींनी बोलून दाखवली.
अनाथआश्रमातल्या मुलांच्या विकासाचा ध्यास ज्योतींनी घेतलाय. गेल्या अनेक वर्षांपासून याच विषयावर त्या काम करत आहेत. या मुलांची परिस्थिती सुधारावी यासाठी सत्तारुढ नेते, तसंच मंत्र्यांना भेटून या प्रश्नाकडे त्यांचं लक्ष वेधण्याचं काम त्यांनी केलंय. राज्य सरकारनं वेगवेगळ्या रिमांड होममध्ये दहावीपर्यंत शिकणा-या मुलांची आकडेवारी जाहीर केलीय. पण मुलींची अशी कोणतीच एकत्रित माहिती उपलब्ध नसल्याचं त्या सांगतात. अनाथ मुली कुठे आहेत ? त्या कुठं गडप झाल्यात ? हा प्रश्न ज्योती विचारतात. अर्थात या प्रश्नाचं उत्तरही ज्योतींनी दिलंय. या मुलींची तस्करी केली जाते.त्यांना जबरदस्तीनं वेश्या व्यवसायात ढकललं जातं. हैदराबादमधल्या एका अनाथआश्रमात दहावीत शिकणा-या सहा मुली आई झाल्याचं मला त्या आश्रमाच्या भेटीदरम्यान आढळलं होतं. एकाच अनाथआश्रमात या अनाथ मुली आपल्या अनाथ मुलांसोबत राहत होत्या, असं सुन्न करणारं वास्तव ज्योती यांनी सांगितलं.
आज ज्योती समाजासाठी काही तरी करण्याच्या स्थितीमध्ये आहेत. त्यावेळी मिळालेल्या प्रत्येक स्टेजचा उपयोग ते अनाथ मुलांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी करतात. या मुलांची व्यथा दुर्लक्षित राहू नये यासाठी त्यांची धडपड सुरु असते. कारण ऐकेकाळी नवरा आणि सासरच्या व्यक्तींचा त्रास त्यांना मूकपणे सहन करावा लागला होता. “त्यावेळी खाणारी तोंड खूप होती, आणि उत्पन्न काहीच नव्हतं. त्यावेळी मला सर्वात जास्त मुलांची काळजी होती. मला अनेक बंधन पाळावी लागत होती. मी परपुरुषांशी बोलू शकत नव्हते, तसंच मला शेतावर काम करावं लागायचं असं ज्योतींनी सांगितलं.”
पण जिथं इच्छा असते तिथं मार्ग मिळतोच असं म्हणतात. ज्योतींच्या बाबतीतही हेच घडलं. त्यांना संधी मिळाली,आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. रात्रशाळेत त्यांनी अन्य मजूरांना शिकवण्यास सुरुवात केली. अशा पद्धतीनं त्या या मजूरांच्या शिक्षिका बनल्या. “ मी त्यांना मूळ संकल्पना समजून सांगत असे, तेच माझं काम होतं.लवकरच मला बढती मिळाली. त्यानंतर मी वारंगलमध्ये अनेक महिला आणि पुरुषांना कपडे शिकवण्यासाठी जाऊ लागले.त्यामुळे मला दरमहा बाराशे रुपये मिळू लागले. हे बाराशे रुपये मला एक लाख रुपयांच्या बरोबर होते. कारण या पैशांमध्ये मुलांची औषधं घेणं मला शक्य होतं.”त्या दिवसांच्या आठवणी सांगताना ज्योती भावून झालेल्या असतात.
हळू हळू ज्योतींच्या स्वप्नांना नवे पंख फुटू लागले. त्यांनी आंबेडकर मुक्त विद्यापीठामधून एक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर वारंगलच्या काकतीया विद्यापीठामध्ये इंग्रजीत एमए करण्यासाठी प्रवेश घेतला. त्यावेळी अमेरिकेत राहणा-या ज्योती यांच्या नातेवाईकाने त्यांना नवा मार्ग दाखवला. ज्योतींनी अमेरिकेत यावं असा सल्ला या नातेवाईकाने दिला. गरिबीच्या गर्तेमधून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेत जाणं आवश्यक आहे, असे ज्योती यांना वाटू लागले.
ज्योतींना अमेरिकेमध्ये जाण्यासाठी मदत करणा-या एनआरआय व्यक्तीची एक खास पद्धत होती, असे ज्योती सांगतात. “ पण मी त्यांच्यापासून पूर्ण वेगळी होते. मी कधीही माझे केस मोकळे सोडले नव्हते. उन्हात कधी गॉगल घातला नव्हता. कार चालवली नव्हती. अमेरिकेत मी येऊ शकते का ? असा प्रश्न मी त्यांना विचारला.
त्यावेळी, तुमच्या सारख्या महात्त्वाकांक्षी महिलेसाठी अमेरिका हाच योग्य पर्याय आहे. अमेरिकेमध्ये तुम्ही स्वत:ला घडवू शकता.” असे त्यांच्या नातेवाईकांनी ज्योतीला सांगितले. त्यानंतर ज्योती यांनी एकही क्षण न घालवता सॉफ्टवेअरच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला. या कोर्ससाठी त्यांना दररोज हैदराबादला ये-जा करावे लागत होते. कारण बाहेर एकटं राहण्यास ज्योतीच्या नव-यानं परवानगी दिली नव्हती. या सर्व अडथळ्यांवर मात करुन अमेरिकेत जाण्याचा त्यांचा निर्धार पक्का होता. पण त्यासाठी नव-याची परवानगी घेणं हे ज्योतींसाठी खूप आव्हानात्मक काम होतं. माझ्या मुलांचं आयुष्य सुसह्य करण्यासाठी अमेरिका हा एकमेव मार्ग मला दिसत होता. त्यामुळे अमेरिकेमध्ये जाण्यासाठी मी उतावीळ झाले होते, असे ज्योतींनी स्पष्ट केले.
ज्योतींनी अमेरिकेत जाण्यासाठी त्यांचे मित्र आणि नातेवाईकांची मदत घेतली. “ मी मला उपलब्ध असलेले सर्व पर्याय वापरले. शिकवत असताना कोणताही वेळ वाया घालवला नाही. दुस-या प्राध्यापकांसोबत चिट फंड सुरु केला. १९९४-९५ मध्ये माझा मासिक पगार पाच हजार रुपये होता. त्याचबरोबर चिट फंडच्या माध्यमातून मी दरमहा २५ हजार रुपयांची कमाई करत होते. त्यावेळी माझं वय २३-२४ इतकं होतं. मला अमेरिकेत जायचं होतं. त्यासाठी मी जास्तीत जास्त बचत करत होते.”
ज्योतींची कार चालवण्याची जबरदस्त इच्छा होती. ही इच्छा अमेरिकेत गेल्यानंतरच पूर्ण होईल हे त्यांना पक्क माहिती होतं. घरामध्ये अनेक प्रकारची बंधनं होती. “ मला माझ्या नव-यानं दोन मुलींची आई बनवलं. त्यामुळेच मला परिस्थितीशी लढण्याची शक्ती प्राप्त झाली. नव-यानं माझ्यासाठी केलेली ही एकमेव चांगली गोष्ट असल्याचं ज्योती सांगतात. माझ्या दोन्ही मुली माझ्या सारख्या आहेत. त्या देखील भरपूर कष्ट करतात. तसंच अजिबात वेळ वाया घालवत नाहीत. त्या दोघीही सॉफ्टवेअर इंजिनिअर झाल्या. आता लग्नानंतर अमेरिकेतच राहतात.”असे त्यांनी सांगितले.
अखेर सर्व अडथळ्यांवर मात करुन ज्योती आपल्या स्वप्नांच्या जगात म्हणजेच अमेरिकेत दाखल झाल्या. न्यू जर्सीमध्ये एका गुजराती परिवारात त्या पेईंग गेस्ट म्हणून राहत असत. त्याचं त्यांना दरमहा ३५० डॉलर भाडं द्यावं लागायचं. सुरुवातीच्या काळात उदारनिर्वाहासाठी ज्योती यांनी सेल्स गर्ल, मुलं सांभाळणारी आया, हॉटेलमध्ये रुम सर्व्हिसचं काम करणारी कर्मचारी तसंच गॅस स्टेशनमध्ये कर्मचारी अशी वेगवेगळी कामं केली.
ज्योती सांगतात, “ दोन वर्षांनी मी भारतात परतल्यानंतर शिव मंदिरात पूजा करण्यासाठी गेले. त्यावेळी अमेरिकेत तूला स्थायी नोकरी मिळणार नाही, व्यापर केला तर त्यामध्ये यश मिळेल असं भविष्य त्या व्यापा-यानं सांगितले. त्यावेळी पुजा-याचे शब्द मी थट्टेत उडवून लावले. पण पुजा-यानं व्यक्त केलेली भविष्यवाणी खरी होणार होती.” त्यानंतर थोड्याच दिवसांनी आपले पती आणि मुलींसह ज्योती अमेरिकेला रवाना झाल्या.
भारताचे स्वर्गीय राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम हे ज्योती यांचे आदर्श. ११ ते १६ या वयोगटामध्येच कोणत्याही मुलाच्या व्यक्तित्वाची घडण होत असते. असे कलाम सांगतात. “ मी माझ्या आयुष्यातला हा कालखंड अनाथआश्रमात घालवला. पण त्यावेळीही मी दुस-या मुलांना मदत करत असे. अडचणीत सापडलेल्या मुलांची काळजी घेण्याबरोबरच त्यांच्यासाठी मी चॉकलेटची व्यवस्थाही करत असे ”, असे ज्योतींनी सांगितले.
ज्योतींना आजही आपले जुने दिवस आठवतात. त्या काळात तळपत्या उन्हात अनवाणी पायांनी त्यांना चालावं लागत असे. आज त्यांच्याकडे दोनशे बुटांचे जोड आहेत. मला कपड्याशी मॅचिंग बूट किंवा सँडल्स घेण्यासाठी १५ ते २० मिनिटं लागतात. शिक्षक म्हणून काम करताना ज्योती यांनी पहिल्यांदा स्वत:साठी साडी विकत घेतली होती. कारण त्याकाळात ज्योती यांच्याकडे केवळ दोनच साड्या होत्या.१३५ रुपयांना घेतलेली ती साडी ज्योतींनी आजही सांभाळून ठेवलीय. आज ज्योतींच्या कपाटात अनेक साड्या आहेत. त्यापैकी लहान मुलीच्या लग्नासाठी घेतलेली साडी ही आजवरची सर्वात महागडी साडी आहे. निळ्या आणि हिरव्या रंगाची ती साडी ज्योतींनी १ लाख ६० हजार रुपयांना घेतली होती.
आज ज्योती अमेरिकेतल्या सहा आणि भारतामधल्या दोन घरांची मालकीण आहेत. त्यांनी कार चालवण्याचं स्वप्न पूर्ण केलंय. आज त्या मर्सिडीझ बेंझही चालवतात. काळा गॉगल घालतात. तसंच केसही मोकळे सोडतात.
ज्या काकतीय विद्यापीठातून ज्योतींनी इंग्रजीचं शिक्षण घेतलं, त्या विद्यापीठात त्यांच्या आयुष्यावरचा धडा शिकवला जातो. याच विद्यापीठानं ज्योतींचा नोकरीचा अर्ज निर्दयतेनं फेटाळला होता. “ गावातली अनेक मुलं माझ्याविषयी वाचतात, आणि ही व्यक्ती नक्की कोण आहे, याची त्यांना उत्सुकता असते, असे ज्योती अभिमानानं सांगतात.”