कुटुंबापासून रोजगारापर्यंत भारतीय संस्थांमध्ये महिला उपेक्षितच : नाझिया इजुद्दीन, सहसंस्थापिका ,एसएन ग्रुप
नाझिया इजुद्दीन यांना एका अर्थाने परस्परविरोधी विचारसरणींचा परिपाकच म्हणावा लागेल. आधुनिक आणि पुरोगामी अशा दोन्ही विचारसरणी एकाचवेळी त्यांच्या कुटुंबात नांदत होत्या. त्यांचे वडील हे एक कार्यकर्ते होते तर लहानशा खेड्यात रहाणारे आजीआजोबा खूपच कडक नियमांनुसार चालणारे खानदानी लोक होते. तर अशी एक वैशिष्ट्यपूर्ण कौटुंबिक पार्श्वभूमी नाझिया यांना लाभली... त्यामुळे एकाच वेळी अगदी दोन टोकाच्या विचारसरणींचा अनुभवही त्यांना घेता आला. वडिलांबरोबर असताना त्यांना एकाबाजूला संपूर्ण स्वातंत्र्य अनुभवता आले तर त्याचवेळी आजीआजोबांसमोर मात्र एकच वेगळा अंकुशही सहन करावा लागला. त्यामुळेच एकीकडे पूर्ण सक्षमीकरण दुसरीकडे अगदी त्याउलट परिस्थिती त्यांनी पाहिली. तसेच त्यांच्या आसपासच्या कुटुंबांमध्येही त्यांना अशी परस्परविरोधी विचारसरणी असल्याचे दिसून आले. मात्र त्या परिस्थितीवर मात करत नाझिया या पुढे जात राहिल्या आणि भारताबरोबरच परदेशातही त्यांनी आपले शिक्षण घेतले आणि तेथेदेखील एक यशस्वी कारकिर्द केली.
एसएन ग्रुप ऑफ कंपनीजच्या सहसंस्थापिका असलेल्या नाझिया इजुद्दीन आज कदाचित म्हणूनच म्हणतात, ““तुम्ही खरे म्हणजे आव्हानांवर कधीच मात करु शकत नाही, तुम्ही जर काही करु शकता, तर अशा प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी अवसान गोळा करु शकता आणि ते देखील शाश्वत असे अवसान....”
हावर्ड आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या माजी विद्यार्थीनी आणि एक फुलब्राईट स्कॉलर असलेल्या नाझिया या समाजसेविका आणि लेखिका आहेत. उत्तराखंड स्थित 'द वर्ल्ड इंटेग्रिटी फांउंडेशन' या संस्थेच्या त्या प्रमुख आहेत.
एकूणच अशा विविध प्रकारच्या विचारसरणींचा अनुभव गाठीशी असलेल्या एका यशस्विनीची ही प्रेरणादायी कहाणी जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
नाझिया या एका अतिशय प्रसिद्ध खानदानी कुटुंबात जन्मल्या - दक्षिण भारतीय संत वेलियानकोडचे ओमर काझी यांच्या कुटुंबात – त्यांचे आजीआजोबा एका लहानशा खेड्यात रहात असत. तेथे त्यांचे आयुष्य खूपच सुरक्षित होते आणि त्यासगळ्यांना गावात अतिशय आदराने वागविले जात असे. “ त्या गावात रहात असताना मलाही नियमांचे कोटेकोर पालन करावे लागे. हे सर्व नियम माझ्या आजोबांनी घालून दिलेले होते आणि या नियमांच्या अंमलबजावणीची जबाबदारी आजीकडे असे. तेथील मुख्य रस्त्यावरुन चालण्याची किंवा सायकल चालविण्याचीही परवानगी आम्हाला नव्हती,” त्यावेळच्या आठवणींना उजाळा देताना नाझिया म्हणतात.
मात्र त्यांच्या वडीलांबरोबरचे त्यांचे दिवस मात्र यापेक्षा अगदी वेगळे असत. “ माझे वडील वकील होते पण त्याचबरोबर एक कार्यकर्ताही होते. त्यामुळे अशा प्रकारच्या परंपरांपेक्षा त्यांचा स्वतःच्या आत्म्यावर आणि मतांवर ठाम विश्वास होता. लहानपणी मी त्यांच्याबरोबर केरळच्या ग्रामीण भागांमध्ये खूप प्रवास केला. मी त्यांच्याबरोबर नेहमीच लोक अदालतींसाठी – जेथे ते न्यायालयाबाहेरच तंटे सोडविण्याचे काम करत असत – जात असे. त्याचबरोबर शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी ते जात असलेल्या सभांनाही – यामध्ये धार्मिक मेळाव्यांचाही समावेश आहे – मी हजर असे. यापैकी बहुतेक ठिकाणी तर मी एकटीच मुलगी असे किंवा एकटीच लहान मुल असे. आता मागे वळून पहाताना मला जाणवते, की त्यावेळी कदाचित मुलीला एवढे स्वांतंत्र्य दिल्याबद्दल त्यांच्यावर टीका झाली असेल,” त्या सांगतात.
पुढे नाझिया यांनी देशविदेशात शिक्षण घेतले. त्या अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि हावर्ड या अगदी टोकाच्या भिन्न अशा संस्थांमध्ये शिकल्या. अलिगढच्या अनुभवांवर त्यांनी लिखाणही केले आहे. एक स्त्री या नात्याने त्यांना विविध अनुभव आले. त्यांचाही हा जिव्हाळ्याचा विषय....सहाजिकच या दोन संस्थांमध्ये महिलांना मिळणाऱ्या वागणूकीत त्यांना काही फरक जाणवला का? हा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय रहात नाही. त्यावरच्या उत्तरात नाझिया म्हणतात, “एक व्यक्ती म्हणून स्थान मिळविण्यासाठी हावर्डमध्ये एखाद्या स्त्रीला कोणताच संघर्ष करावा लागत नाही. मात्र भारतात हा संघर्ष आजही सुरुच आहे आणि अशा घटना केवळ अलिगढ मुस्लिम विद्यापीठातच दिसतात किंवा तेथेच त्यांना प्रोत्साहन मिळते, असे काही नाही. एक व्यक्ती म्हणून माझी बुद्धिमता आणि क्षमता लोकांनी लक्षात घ्यावी आणि त्यानुसार शैक्षणिक संस्था किंवा वातावरणात मला माझा समान हक्क मिळावा, अशी माझी कळकळीची विनंती आहे. तसेच केवळ महिला म्हणून मी पिचले जाऊ नये किंवा एखाद्या गोष्टीपासून मला वंचित ठेवले जाऊ नये, असेही वाटते,” नाझिया सांगतात.
मात्र आजही भारतीय महिलांना खास करुन शैक्षणिक संस्था आणि नोकरीच्या ठिकाणी खूप खडतर परिस्थितीचा सामना कराना लागत असल्याचे नाझियांना वाटते. “ माझ्या मते सगळ्याच भारतीय संस्थांमध्ये महिलांविषयी अनादर दिसून येतो आणि जाणूनबुजून होणाऱ्या मानहानीचा त्यांना सामना करावा लागतो. यामध्ये कुटुंबसंस्था, विवाहसंस्था आणि त्याचबरोबर पुढे शैक्षणिक संस्था आणि काम करत असलेल्या संस्थांचाही समावेश आहे,” त्या सांगतात. म्हणूनच त्यांना असेही वाटते की एक व्यक्ती या संकल्पनेची सुरुवात घरापासूनच होत असते. जर पालकांनी आपल्या मुलांना एक व्यक्ती म्हणून आदराने वागविले नाही, तर पुढे सामाजिक संस्थांमध्येसुद्धा ही मुले आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची जाणीव निश्चयपूर्वक करुन देऊ शकत नाहीत. “ मी एक व्यक्ती म्हणूनच वाढले किंवा मला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून वाढविण्यात आले आणि मी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणूनच जगते. एक स्त्री असणे हे खरे तर एक वैज्ञानिक सत्य आहे, जसे की हवा, पाणी आणि आपल्या आसपास असलेली इतर नैसर्गिक तत्वे,” नाझिया सांगतात. त्यांच्या मते स्त्रियादेखील माणूसच आहेत. त्यांच्यापैकी प्रत्येक स्त्रीला स्वतःचे व्यक्तिमत्व आहे आणि ती स्वतंत्र आहे. “ रोजच्या रोज हीच गोष्ट ओरडून सांगणे, मला खूपच दुःखद वाटते. कारण स्वातंत्र्यासाठी रोजच संघर्ष करावा लागत असल्याची भावना त्यामुळे दाटून येते आणि आपले अस्तित्व असूनही आपण दुर्लक्षित असल्यासारखे वाटते. आपण सगळे एक माणूस म्हणून जगू शकू, अशा दिवसाचे स्पप्न मी पहात असते... एक असा दिवस जेंव्हा स्त्री असणे हा काही चर्चेचा विषय राहिलेला नसेल... आणि आज एका अर्थाने मानसिक अडथळा बनलेला हा मुद्दा दूर होऊन आपण माणूस म्हणून यासर्वांपासून उंच उठू,” नाझिया सांगतात.
“पण हे स्पप्न तर दूरच राहिले, आजही स्त्रियांना एका विशेष वागणूकीची – मग ती कुठलीही असो, विशेष किंवा खास विशेष नाही अशीदेखील – गरज आहे, ही संकल्पनाच त्यांना मिळणाऱ्या दुय्यम दर्जाचे द्योतक आहे. हे खूपच क्लेशदायक आहे, कारण एक माणूस किंवा व्यक्ती म्हणूनच आमचा स्वीकार होत नसल्याचे यातून दिसते,” नाझिया म्हणतात.
पुरुष, स्त्रिया आणि मुले हे सगळेच स्त्रियांवर पुरुषांची सर्वश्रेष्ठ सत्ता आहे, याच कल्पनेत जगत असतात आणि भारतीय संस्कृतीमध्ये तर हे सर्वदूर पसरलेले सामाजिक सत्य आहे. यासाठी कृत्रिमरित्या तयार केलेले काही घटक हे श्रेष्ठत्व आणि गौणत्वाचा ही सामाजिक रचना जपण्यासाठी मार्गदर्शन करत असतात. भारतीय जातीव्यवस्थेतच या रचनेची मुळे खोलवर रुजलेली आहेत.
यशस्वी कारकिर्द
हावर्डमधील शिक्षणानंतर नाझिया यांना न्यूयॉर्क मधील एका लॉ फर्ममध्ये (कायदा संस्थेत) लिगल असोसिएट (कायदेशीर सहकारी) म्हणून नोकरी मिळाली. ही त्यांची पहिलीच नोकरी होती. न्यूयॉर्कमधील सुरुवातीच्या काही वर्षांनंतर त्यांनी दुबई आणि लंडनमध्ये देखील आणखी एका आंतरराष्ट्रीय संस्थेत काम केले. त्यावेळी प्रकल्प वित्त व्यवस्था आणि इस्लामी वित्त व्यवस्था या विषयांवर त्या काम करत होत्या. नोकरी सोडून २००८ मध्ये त्या डेहराडूनला परतल्या, तोपर्यंत हे काम सुरु होते. “ हे सगळे झाले याचे एकमेव कारण म्हणजे मी माझ्या मनाचे म्हणणे ऐकले. जेंव्हा मी डेहराडूनला रहायला आले, त्यावेळी माझ्यासमोर ठोस अशी कोणतीच योजना नव्हती आणि मी आता काय करणार, तेदेखील मला माहित नव्हते. नवऱ्याबरोबर एका उत्तम आयुष्याची उभारणी करणे आणि आनंदी सहजीवन जगणे हाच मुख्य हेतू होता. न्यूयॉर्क आणि दुबईमध्ये मी अनुभविलेल्या वातावरणाचा आणि जीवनशैलीचा अनुभव देणाऱ्या परिसरातच आम्हाला घर हवे होते,” त्या सांगतात.
ठोस योजना नसली, तरी त्या काही स्वस्थ बसणाऱ्यांपैकी नव्हत्या. त्यांनी एसएन ग्रुप या नावाने स्वतःचा व्यवसाय सुरु केला. हॉस्पिटॅलिटी आणि रियल इस्टेटच्या क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे. “ भारतातील वर्ल्ड इंटीग्रिटी सेंटर या संस्थेची मी संस्थापक अध्यक्षा आहे. लाईफस्टाईल सोशो-कल्चरल सेंटरची ही संकल्पना माझीच असून त्याची स्थापना डेहराडूनमध्ये झाली. यामाध्यमातून एका समग्र जीवनशैलीचा अनुभव देऊ शकतील अशा नाविन्यपूर्ण आणि रंजक कल्पना आम्ही सुचवत असतो. आमच्या सगळ्या प्रकल्पांमध्ये – निवासी किंवा मनोरंजनपर – आमचे ग्राहक आणि उत्पादन यांच्यात थेट नाते निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि त्याद्वारे लोकांचा जगण्याचा अनुभव अधिक समृद्ध कऱण्याचा आम्ही प्रयत्न करतो,” त्या सांगतात.
त्यांच्या कामातून त्यांना समुदाय निर्माण करणे आणि त्याचबरोबर वास्तव आणि मूर्त अशा जीवनशैलीची निर्मिती करणे शक्य झाले आहे आणि कामातील हीच गोष्ट त्यांना विशेष उल्हासित करते. “ लोकांच्या आयुष्याला स्पर्श करुन, त्यांच्या रोजच्या जगण्यावर प्रभाव टाकता येतो परिणामी त्यांचा स्वतःच्या जगाकडे आणि आसपासच्या जगाकडे पहाण्याचा दृष्टीकोनही बदलता येतो. एकूणच बांधकामाचे हे काम अधिक अर्थपूर्णपणे करता येते,” त्या सांगतात.
देशविदेशांतील प्रवासांमुळे विविध संस्कृतींशी झालेली ओळख, वेगवेगळ्या क्षेत्रातील कारकिर्द, यामुळे नाझिया यांना नक्कीच एक वेगळा दृष्टीकोन आहे. त्यांच्या समृद्ध अनुभवांबाबतही त्या विस्ताराने सांगतात. “ मी जगभरातील काही अतिशय उत्तम संस्थांमध्ये काम केले आहे. मी जेवढा देशांतर्गत प्रवास करते तेवढाच परदेशातही प्रवास करत असते. पण शिक्षणाबाबत एक गोष्ट मात्र मी नक्कीच शिकले आहे, ती म्हणजे, शैक्षणिक संस्था किंवा पुस्तकांतून मिळालेले ज्ञानच केवळ तुम्हाला शिकवत नाही. मला भेटलेल्या अतिशय प्रेरणादायी व्यक्तींपैकी सगळेच काही हावर्ड किंवा ऑक्सफर्डला गेले नव्हते किंवा खूप उच्च शिक्षितही नव्हते. मात्र मी त्यांच्याकडून जगण्याची मूल्ये शिकले. निस्वार्थी प्रेम, जगाला देण्याची भावना, इत्यादी अनेक गोष्टी शिकले आणि मुख्य म्हणजे माणसाची पारख त्याच्या संपत्तीवरुन न करण्याची महत्वाची गोष्ट शिकले,”त्या आवर्जून सांगतात.
“ औपचारीक शिक्षण कदाचित तुम्हाला हे मूल्यशिक्षण देऊ शकणार नाही. मी जगाकडून, प्रवासांतून, माणसांकडून, संस्कृती आणि संस्थांकडून मूल्ये, सहिष्णुता आणि विविध संस्कृतींचा आदर करायला शिकले. हावर्डसारख्या संस्था कल्पनांचा, एकापेक्षा जास्त वास्तवांचा आणि एकाच विचारसरणीला चिकटून न रहाता वेगळ्या विचारांचा आदर करत असल्यानेच श्रेष्ठ ठरल्या आहेत. खास करुन स्त्रियांनाच मला हे सांगायचे आहे. कारण ही भेट पालकच आपल्या मुलांना देऊ शकतात, त्यांचे बालपण समृद्ध करु शकतात आणि त्यामुळे त्यांना अधिक सक्षम बनवू शकतात,” त्या सांगतात.
या संपूर्ण प्रवासात त्यांना वयाच्या अकराव्या वर्षीच मिळालेला एक सल्ला नेहमीच लक्षात रहातो. त्यांच्या वडीलांच्या एका मित्राने त्यांना एक गोष्ट सांगून, हा सल्ला दिला होता. “ त्यांनी मला बसमध्ये जागा पकडण्यासाठी लोक करत असलेल्या धावपळीची गोष्ट सांगितली. लोक कशाप्रकारे जागा मिळविण्यासाठी भांडतात, सगळे लक्ष मोकळ्या जागेवर ठेवतात, जेणेकरुन ते धावत जाऊन ती जागा पकडू शकतील. मात्र जर तुम्हाला जागा मिळाली नाही आणि संपूर्ण प्रवास तुम्हाला उभ्याने करावा लागला, तर आयुष्यात काय फरक पडेल? शेवटी तो केवळ एक बसप्रवास आहे. त्यामुळे आपल्याला तिकीट पहिल्यांदा मिळाले का शेवट याने काहीच फरक पडत नाही. तुम्ही रांगेत शेवटी असल्यानेही काही फरक पडत नाही. बस तुम्हाला सोडून जाणार नाही आणि जरी गेलीच तर दुसरी येईल. अशा प्रकारे काही मिळविण्यासाठी पहिले येण्याची ही लढाई योग्य आहे का?” नाझिया त्या सल्ल्याबाबत विस्ताराने बोलतात. यानंतर आपला स्पर्धा, यश, सर्वात आधी काही तरी मिळविणे यांसारख्या संकल्पनांबाबतचा दृष्टीकोन नक्कीच बदलल्याचेही त्या मान्य करतात.