शिक्षणक्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या स्मितिन यांचे 'स्मार्टस्टेप्स'
आजकाल शिक्षणक्षेत्रात होणारे बाजारीकरण पाहता, आपल्या पाल्याला माफक दरात दर्जेदार शिक्षण देणे हे प्रत्येक पालकासमोरील आव्हान आहे. आपल्या पाल्याने सर्वात चांगल्या आणि महागड्या शिक्षणसंस्थेत शिक्षण घेणे, हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. अनेक पालकांना आर्थिकदृष्ट्या ते शक्य नसते. तरीही वेळप्रसंगी ते आपल्या पोटाला चिमटा काढून पाल्याला महागड्या संस्थांमध्ये शिक्षणासाठी पाठवतात. अनेक पालकांचा तर तो स्टेटसचा प्रश्न असतो. पालकांच्या या प्रश्नावर स्मितीन ब्रीद यांनी उत्तर शोधताना 'स्मार्ट स्टेप्स प्रीस्कूल'ची स्थापना केली आहे. अनेक मध्यमवर्गीय पालकांना समाजातील आपल्या स्टेटस पायी पाल्याने सरकारी शाळेत शिक्षण घेऊ नये, असे वाटत असते. तसेच मोठ्या शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तेथे होणाऱ्या खर्चामुळे आर्थिक जुळवाजूळव करताना अनेकदा त्यांच्या नाकी नऊ येतं. अशा मध्यमवर्गीय पालकांकरिता 'स्मार्ट स्टेप्स प्रीस्कूल' ने सुवर्णमध्य साधण्याचे काम केल्याचे स्मितीन सांगतात. तब्बल २० वर्षे 'प्रथम' या सामाजिक संस्थेत शिक्षणक्षेत्रात काम केल्यानंतर त्याच क्षेत्रात धोरणात्मक बदल घडवण्याचा स्मितीन प्रयत्न करत आहेत. स्मार्टस्टेप्स प्रीस्कूल आणि एकंदरीत आजकालच्या शिक्षणव्यवस्थेवर आम्ही युअरस्टोरीच्या माध्यमातून स्मितीन यांची मते जाणून घेतली आहेत. स्मितीन ब्रीद हे स्मार्ट स्टेप्सचे सहसंस्थापक आणि संचालक आहेत.
मुलांच्या आय़ुष्यात पूर्वप्राथमिक शिक्षण किती महत्वाचे आहे, याबाबत स्मितीन सांगतात की, ''प्रथम' संस्थेत काम करत असताना शिक्षणाबद्दलची ही भीषण परिस्थिती माझ्या समोर आली होती. शिक्षणामुळे समाजात चांगले बदल होत असतात, हे काही मी सांगायची गरज नाही. आपल्या सर्वांना याची कल्पना आहे. पण त्याची सुरुवात कुठून व्हायला पाहिजे, यावर आम्ही काम केले. तेव्हा आमच्या लक्षात आले की, शिक्षणाचा पाया हा कायम मजबूत व्हायला हवा. जेवढा पाया मजबूत होणार तेवढीच त्यावर उभी राहणारी इमारत मजबूत होणार. प्राथमिक शिक्षण जर चांगले व्हायला हवे असेल, तर त्यासाठी मुलांची पूर्वप्राथमिक तयारीदेखील चांगली व्हायला हवी. मग त्यासाठी असणाऱ्या सुविधा चांगल्या हव्यात तसेच त्यांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हायला हवी. त्यानंतर आम्ही शासनाच्या स्तरावर यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत, इतर लोक काय करत आहेत, याचा अभ्यास करायला सुरुवात केली. विद्यार्थ्याच्या जडणघडणीत त्याचे पूर्वप्राथमिक शिक्षण महत्वाची भूमिका बजावते. जर विद्यार्थ्याला पूर्वप्राथमिक शिक्षण चांगले मिळाले तर त्याचा पुढील शिक्षणाचा स्तर उंचावतो. मुलांचे शिक्षण लवकरात लवकर सुरू व्हावे, या विषयावर आता जगभरात संशोधन देखील सुरू आहेत. मी गेली वीस वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करतो आहे. मी स्वतः एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलो. बालपणात मी स्वतः एका प्री-स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे आणि त्याचा फायदा पुढील शिक्षणात मला झाला आहे. मी ज्या पूर्व प्राथमिक शाळेत जायचो, तिथे अंगणात बदक, ससे यांसारखे प्राणी असायचे. आम्ही ५० ते ६० विद्यार्थी असायचो आणि आम्हाला एकच शिक्षिका होत्या, त्या आम्हाला वेगवेगळ्या बॅचेसमध्ये शिकवायच्या. त्या शाळेत आम्ही गाणी म्हणायचो, गोष्टी सांगायचो. त्यामुळे त्याच शाळेत शिकत असताना माझ्या आत्मविश्वासात वाढ झाली. ज्याचा फायदा पुढील शिक्षणात मला झाला. तिथेच आत्मविश्वास वृद्धींगत झाल्याने मग शालेय जीवनात मी विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो, नाटकात काम करायचो. पाया मजबूत होता म्हणून मला पुढे अनेक गोष्टी करता आल्या, असे मला वाटते.'
'स्मार्ट स्टेप्स प्रीस्कूल'च्या निर्मितीची गरज का भासली, याबद्दल बोलताना स्मितीन सांगतात की, 'प्रत्येक मुलाच्या बालपणात त्याच्यावर झालेले संस्कार, त्याला दिलेले अनुभव आणि शिक्षण हे त्याच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावत असते. प्रत्येक मुलाच्या यशाची पायाभरणी ही त्याच्या बालपणातील शिक्षणामुळेच होते. बालपणाच्या काळात मुलांवर आपण जे संस्कार करतो, त्यांना जी शिकवण देतो, ती कायम त्यांच्या मनावर बिंबवली जात असते. १९९६ सालापासून 'प्रथम' या स्वयंसेवी संस्थेत काम करत होतो. शिक्षण क्षेत्रात कोणते बदल व्हायला हवे तसेच त्यासाठी काय काम करावे लागेल, हा विचार तेव्हापासूनच माझ्या मनात घोळत होता. तेव्हा आम्ही महापालिकांच्या शाळांसोबत काम करत होतो. लोकांनी या शाळांना नावे ठेवण्यापेक्षा त्यांची परिस्थिती सुधारण्याकरिता त्यांना स्वतः काही प्रयत्न करता येऊ शकतात का, चांगला बदल घडवण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात का, अशी ती मोहिम होती. त्या मोहिमेत मला काम करण्याची संधी मिळाली. त्या मोहिमेमुळे माझा शिक्षणाबद्दलचा दृष्टीकोन व्यापक झाला. शिक्षणक्षेत्रात सकारात्मक बदल घडवायचे असतील तर काय प्रयत्न करावे लागतील, याचे चित्र माझ्यासमोर स्पष्ट होऊ लागले. तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, या क्षेत्रातल्या अडचणी व्यापक असतात त्यामुळे त्यावरील उपायदेखील व्यापक स्वरुपात काढावे लागतील. एका शाळेत सकारात्मक बदल घडवायचे असतील, तर ते घडवता येऊ शकतात. पण जर संपूर्ण चित्र बदलायचे असेल, तर त्या स्तरावर जाऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे, ही एक मोठी शिकवण मला सामाजिक क्षेत्रात काम करताना माझ्या लक्षात आली होती. दुसरी गोष्ट म्हणजे हल्ली मध्यमवर्गीय कुटुंबांच्या शिक्षणाबद्दलच्या अपेक्षा वाढत चालल्या आहेत. तेव्हा दोन गोष्टी माझ्यासमोर स्पष्ट झाल्या एक म्हणजे शिक्षणक्षेत्रातील अडचणींवरचा उपाय हा व्यापक स्तरावर हवा आणि दुसरं म्हणजे सर्व मुलांना चांगले आणि दर्जेदार शिक्षण मिळायला हवे.'
'स्मार्ट स्टेप्स प्रीस्कूल'च्या संकल्पनेबद्दल बोलताना स्मितीन सांगतात की, 'पूर्वप्राथमिक शिक्षणाचे महत्व लक्षात घेता आजकालच्या मुलांना ते दर्जेदार मिळणे आवश्यक आहे. आता आपल्या समाजाची रचना पाहता, एकदम गरीब वर्ग जो आपल्या मुलांना सरकारी शाळांमध्ये शिकण्यास पाठवतो. एकदम उच्चवर्ग त्यांच्या मुलांना भरमसाठ शुल्क आकारणाऱ्या मोठमोठ्या हायटेक प्रीस्कूलमध्ये शिकण्यास पाठवतात. या सर्वांमध्ये कोंडी होते ती मध्यमवर्गाची. सरकारी शाळांमध्ये त्यांच्या मुलांनी शिकणे, हा त्यांच्याकरिता स्टेटसचा प्रश्न होतो. तर भरमसाठ शुल्क आकारणाऱ्या शाळांमध्ये मुलांना शिकण्यास पाठवायचे झाल्यास आर्थिक जुळवाजुळव करताना त्यांच्या नाकीनऊ येते. या संधीचा अनेक गल्लाभरू संस्था फायदा उचलतात. अशा संस्था पालकांकडून बरेच शुल्कदेखील घेतात शिवाय त्याला अनुकूल असे दर्जेदार शिक्षणही देत नाहीत. अशा लोकांचा विचार करुन स्मार्टस्टेप्सची स्थापना करण्यात आली आहे. स्मार्टस्टेप्सला आम्ही सोशल इन्टरप्राईजदेखील म्हणतो कारण स्मार्टस्टेप्स सामाजिक कार्यदेखील करणार आहे. त्याचबरोबर आपण हेही लक्षात घ्यायला हवे की, स्मार्टस्टेप्स कोणत्याही निधीवर अवलंबून नाही. हा एक सेल्फ सस्टेन बिझनेस आहे. आम्ही गेली चार वर्षे या विषयावर संशोधन आणि कार्य करत आहोत. अनेक प्रीस्कूलमध्ये देखील आम्ही कामाचा अनुभव घेतला आहे. किमान शुल्कात दर्जेदार आणि कौशल्यपूर्ण शिक्षणामध्ये नेमका कशाचा समावेश करायला हवा, मुलांच्या विकासासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे, त्यात पालकांचा समावेश किती गरजेचा आहे, या प्रश्नांवरती तसेच मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे यावरती संशोधन केले. प्री-स्कूलमध्ये शाळेची पूर्वतयारी कशाप्रकारे उत्तम करुन घेता येईल, जेणेकरुन त्यांना पुढील शिक्षण घेणे सहजसोपे होईल, यावर आम्ही कार्य केले. प्ले ग्रूप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी या वर्षांमध्ये जर त्यांना सर्वोत्तम शिक्षण दिले तर त्याचा फायदा त्यांच्या शालेय वर्षांमध्ये दिसून येतो. त्यामुळे मध्यमवर्गीयांना परवडेल अशा शुल्कात गुणात्मक शिक्षण देण्याचे आम्ही नक्की केले आणि त्यानुसार आमचा व्यवसायाचा आराखडा तयार केला. आपल्याला हे देखील लक्षात घ्यायला हवे की, देशात शहरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधील लोकांना हा प्रश्नच उद्भवत नाही कारण त्यांच्याकडे रिसोर्सेची संख्या जास्त आहे. पण जी शहरे आत्ता नव्याने तयार होत आहेत उदा. कोल्हापूर, सांगली, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, इंदौर, जोधपुर इत्यादी. अशा लहान शहरांची संख्यादेखील वाढते आहे, त्यासोबतच तेथील लोकांचे राहणीमान देखील सुधारत आहे. त्यांच्या आकांक्षा वाढत आहेत. अशा शहरांमध्ये देखील या सोयीसुविधा हव्यात आणि त्याही मध्यमवर्गाला परवडणाऱ्या दरात. या शहरांत अनेक प्री-स्कूल आहेत मात्र त्यांची शुल्कही अधिक आहेत. त्यामुळे या शहरांचा विचार कोणीही करताना दिसत नाही. ही एक संधी आहे ज्यामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडू शकतो. त्यामुळे आम्ही स्मार्टस्टेप्सच्या निर्मितीचा विचार केला.'
मुलांच्या सर्वांगीण वाढीत त्यांच्या कुटुंबाची आणि एकंदरीत समाजाची काय भूमिका असावी, याबाबत बोलताना स्मितीन सांगतात की, 'सध्या चांगल्या आणि आधुनिक नावाने अनेक प्रीस्कूल चालत आहेत. लहान मुलांना शिकवताना जी मानसिकता लक्षात घेऊन काम करायची गरज आहे ती बऱ्याचदा त्यांच्याकडे दिसत नाही. त्या प्रीस्कूलदेखील फक्त व्यवसाय करत आहेत. त्या कस्टमर डिलाईट संस्था आहेत तसेच पालकांकरिता त्या स्कूल स्टेटस सिम्बॉल झाल्या आहेत. शासनाने गरिब लोकांकरिता जी योजना राबवली आहे त्यात पोषण आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींकडे लक्ष दिलेले आहे. या योजनेंतर्गत असलेल्या गावाकडच्या पूर्वप्राथमिक शाळा जर लक्षात घेतल्या तर तेथील सेविका या ही दुहेरी जबाबदारी पेलण्यासाठी तेवढ्या सक्षम नसतात. या सगळ्यामध्ये मुलांच्या परिवाराची भूमिका सर्वाधिक महत्वाची असते. एखाद्या प्रीस्कूल आणि अंगणवाडीपेक्षा त्या मुलाच्या परिवाराची जबाबदारी ही जास्त महत्वाची असते. सध्याचे पालक पाहता, आई-वडिल हे दोघेही नोकरी करतात. मुंबईतील घरे पाहता आजी-आजोबा वेगळीकडे राहत असतात. मग अशा परिस्थितीत पालकांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो, त्यांच्यात कम्युनिकेशन होत नसते, तसेच पालकांकडे मुलांना देण्यासाठी क्वालिटी वेळ नाही. आम्ही पॅरेंटींगचे काम करत असताना अनेक पालकांच्या कार्यशाळा घेतो. त्यांना मुलांशी कशाप्रकारे संवाद साधायचा, याची माहिती देतो. त्यामुळे स्मार्टस्टेप्स हे फक्त एक प्री-स्कूल नसून, मुलांच्या सर्वांगीण वाढीकरिता प्रयत्न करणारी एक संस्था आहे. आम्ही विद्यार्थ्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तिला म्हणजेच पालक, शिक्षक, कुटुंब यांना मार्गदर्शन करतो. मुलांच्या आयुष्यात या प्रत्येकाला एक महत्वाची भूमिका पार पाडायची आहे. त्यांना ती समजावण्याचा, तो सांगण्याचा हा प्रयत्न आहे आणि तो देखील परवडणाऱ्या दरात.'
शिक्षण क्षेत्रात शासन जर विविध योजना राबवत असूनही खाजगी संस्थांची गरज भासते का, असे विचारले असता स्मितीन सांगतात की, 'वीस वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही प्रथम संस्थेत स्वयंसेवक म्हणून काम सुरु केले, तेव्हाचा डेटा मी सांगतो, तो असा होता की, मुंबईतील ६० टक्के मुले ही महापालिकेच्या शाळेत शिकत होती, त्याच वेळेस ४० टक्के मुले खासगी शाळांमध्ये शिक्षण घेत होती. आज त्याच डेटामध्ये ७० टक्के मुले ही खासगी शाळांमध्ये जाताना दिसतात आणि उर्वरित ३० टक्के मुले परिस्थिती नसल्याने महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेताना दिसतात. मग आपण या संस्थांची गरज नाही असे म्हणणे योग्यच नाही. आजची परिस्थिती पाहता या संस्थांची गरज ७० टक्के आहे.'
स्मार्टस्टेप्सच्या विविध पैलूंवर बोलताना स्मितीन सांगतात की, 'शिक्षणक्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी ही एक संधी आहे, मुलांना चांगल्या प्री-स्कूलची गरज आहे. जर खाजगी संस्थांची गरज आहे तर ती गरज भागवण्यासाठी तसेच त्यांना चांगली सुविधा देण्यासाठी स्मार्टस्टेप्सची निर्मिती करण्यात आली आहे. कोणीतरी एक प्री-स्कूल काढावे आणि व्यवसाय सुरू करावा, ही वेगळी गोष्ट आहे. मात्र स्मार्टस्टेप्समध्ये आम्ही महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना प्रीस्कूलकरिता तयार करतो. ज्या महिलांना स्वतःचे प्रीस्कूल सुरू करायचे आहे किंवा तशी त्यांची इच्छा आहे, अशा महिलांना आम्ही प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देतो. यातही दोन बाजू आहेत, मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळेल आणि दुसरी बाजू म्हणजे महिलांना चांगल्या रोजगाराची संधी मिळेल. महिलांना आम्ही या संदर्भात गुणात्मक प्रशिक्षण देतो. त्यामुळे महिलांकरिता स्वयंरोजगाराची संधीदेखील उपलब्ध होते. त्यामुळे आम्ही या दोन गोष्टी एकमेकांसोबत जोडून या अडचणीवर उपाय काढण्याचा प्रयत्न करतो. या सर्व पैलूंवर स्मार्टस्टेप्स काम करत आहे', असे स्मितीन सांगतात.
आजकालची मुले टेक्नॉसॅव्ही आहेत. मात्र तंत्रज्ञानाच्या युगात ती मैदानी खेळ विसरली आहेत, याबाबत स्मितीन यांना विचारले असता, ते सांगतात की, 'माझ्या दृष्टीने लहान मुलांकरिता शारिरीक खेळ हे फार गरजेचे आहेतच. याचा अर्थ असा नाही की, तंत्रज्ञानाचा वापर करू नये. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. तंत्रज्ञान हे आजकालच्या मुलांकरिता नवे आहे. कोणतीही गोष्टी जेव्हा नवीन असते, तेव्हा त्याचा अधिकतमच वापर होत असतो. नव्याचे नऊ दिवस म्हणतात, तसे आहे हे. काही वर्षांपूर्वीचे चित्र पाहिले तर तेव्हा टेलिव्हिजन नवीन होते आणि लोक त्याचा अधिकाधिक वापर करत होते. त्याच्या नंतरच्या काळात तंत्रज्ञानात जी क्रांती झाली, तो पुढचा भाग आहे. जेव्हा एखादी नवी गोष्ट येते, तेव्हा तिचा वापर अधिक होतो, तिचे कौतुक अधिक होते. आता इंटरनेट, टॅब, मोबाईल यांचे युग आहे. आता त्या गोष्टी नव्या असल्याने त्यांचे कौतुक जास्त होत आहे. पण कालांतराने ही आपली गरज होणार आहे. यांद्वारे माहिती मिळवणे अतिशय सोयीचे होत आहे. मी असे म्हणेन की, आपले जीवनमान उंचावण्यासाठी अधिक संसाधने मिळत आहेत. मी तर म्हणेन की, तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या पद्धतीने कसा करायचा, हे मुलांना शिकवायला हवे. तंत्रज्ञान कसे हाताळायला हवे, त्याचा कितपत वापर करायला हवा, या गोष्टी आपण त्यांना वेळीच शिकवणे गरजेचे आहे.'
स्मार्टस्टेप्स प्री-स्कूलमध्ये तंत्रज्ञानाचा कशाप्रकारे वापर करण्यात येतो, याबाबत बोलताना स्मितीन सांगतात की, 'प्री-स्कूलमध्ये आम्ही मुलांकरिता एक एप्लिकेशन तयार केले आहे, ज्यात अक्षरओळख, गणित, चित्रकला यांसारख्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. आम्ही जे वेळापत्रक तयार केले आहे, त्यात आम्ही तंत्रज्ञानासाठी एक विशेष वेळ ठरवून दिला आहे. त्या वेळेत मुलांनी संगणक, मोबाईल स्वतः हाताळायचे. आम्ही पालकांसाठी देखील एक एप्लिकेशन तयार केले आहे, ज्यात आम्ही मुलांचा प्रतिमाह अहवाल त्यांना देतो. आम्ही पालकांचे प्रत्येक प्रिस्कूलच्या स्तरावर व्हॉटसअप ग्रूप तयार केले आहेत, ज्यात आम्ही त्यांना दररोजची शाळेतील माहिती देतो. आम्ही टेलिस्टोरी नावाचा एक उपक्रम राबवला आहे, ज्यात आम्ही विविध गोष्टी ध्वनीमुद्रीत केल्या आहेत. पालकांनी एका नंबरवर मिसकॉल द्यायचा, त्यानंतर त्यांना सर्व्हरवरुन एक फोन कॉल येतो आणि कोणते पुस्तक हवे आहे, अशी विचारणा केली जाते. जे पुस्तक त्यांनी निवडलेले असेल, त्याची मोबाईल रेकॉर्डिंग त्यांना ऐकवली जाते. तेच पुस्तक मुलाच्या हातात असते. अशा प्रकारे आम्ही स्मार्टस्टेप्समध्ये तंत्रज्ञानाचा सकारात्मक पद्धतीने वापर करत आहोत.'
शिक्षणक्षेत्रात धोरणात्मक बदल होण्यासाठी कशाप्रकारच्या प्रयत्नांची गरज आहे तसेच त्याकरिता तुम्ही काही विशेष प्रयत्न करत आहात का, या प्रश्नावर उत्तर देताना स्मितीन सांगतात की, 'धोरणात्मक बदलासाठी हा एवढा मोठा प्रय़त्न आम्ही करत आहोत. शासनाने धोरणे बनवायला हवीत आणि त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते का, याच्यावर लक्ष ठेवायला हवे. माफक शुल्कात चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, तसेच शिक्षणाचा बाजार होऊ नये, याकडे शासनाने लक्ष द्यायला हवे. जर तुम्ही प्रतिवर्ष प्रकाशित होणारा शिक्षण क्षेत्राचा अहवाल पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, मुलं शाळेत तर जायला लागली आहेत पण त्यांना लिहिता-वाचता येत नाही. शिक्षणक्षेत्रात दोन पक्ष तुम्हाला प्रामुख्याने पाहावे लागतात एक म्हणजे शासनाचा पक्ष आणि दुसरा म्हणजे समाजाचा. शासन विविध योजना राबवून त्यांची भूमिका योग्य पार पाडत आहे, आता समाज म्हणून आपण आपली भूमिका योग्य पार पाडायला हवी आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. शासनाच्या प्रय़त्नांबरोबरच समाजानेदेखील योग्य प्रयत्न करायला हवेत. शिक्षणक्षेत्रातील सकारात्मक बदलांकरिता लोकांनी विविध मोहिमा हाती घ्यायला पाहिजेत, उपक्रम राबवले पाहिजेत कारण एवढ्या मोठ्या क्षेत्रात सकारात्मक बदल घडविणे, हे कोणा एका-दोघांचे काम नाही तर त्याकरिता आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत. सध्या शिक्षणाबद्दल बरीच जागरुकता झाली आहे. त्यात तुम्ही सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असा सल्ला शिक्षण क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या लोकांना स्मितीन देतात. स्मार्टस्टेप्स प्रीस्कूलबद्दल अधिक माहितीकरिता तुम्ही http://smartstepspreschool.com/या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा संबंधित कहाण्या :