गरिमा वर्मा म्हणतात, आत्मविश्वासाच्या बळावरच आपण यशाचे शिखर गाठतो.
गरिमा वर्मा या २०११ मध्ये जीई कम्यूनिकेशन्स मध्ये रुजू झाल्या. तिथे त्यांना ४५०० हून अधिक इंजिनियर्स आणि शास्त्रज्ञांसोबत ‘जीई’चे सर्वात पहिले आणि मोठे संशोधन आणि विकास केंद्र असलेल्या ‘जॉन एफ वेल्च टेक्नॉलॉजी सेंटर’च्या सर्व पैलूंचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.
त्यांनी एकीकृत कम्युनिकेशन लिडरशीपमध्ये कॉर्पोरेट कम्युनिकेशन, ब्रँड निर्मिती, मार्केटिंग, परिवर्तन व्यवस्थापन, विविधता आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अशा विविध क्षेत्रांचा विकास करण्यासाठी आपला २५ वर्षांच्या अनुभवाचा एकत्रितपणे उपयोग केला. याबरोबर त्यांनी जागतिक कार्य वातावरणात व्यापार विकास, कर्मचा-यांची भागीदारी आणि सांस्कृतिक परिवर्तन आणि व्यवसायाच्या विकासासाठी कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि लोक नेतृत्त्वात आपल्या कौशल्यांचा पुरेपूर वापर केला.
‘JFWTC’ मध्ये गरिमा वर्मा यांच्यावर अंतर्गत आणि बाह्य कम्युनिकेशन, कार्यक्रम, कर्मचा-यांना कामावर ठेवणे तसेच लिडरशीप कम्युनिकेशन या गोष्टींची जबाबदारी आहे. त्या ‘जीई’च्या कॉर्पोरेट कल्याण कार्यक्रम असलेल्या ‘हेल्थ अहेड’च्या आयोजिका सुद्धा आहेत.
‘जीई’च्या पूर्वी त्यांनी ‘फिडेलिटी गुंतवणूक’, ‘मायक्रोलँड’ आणि ‘सन मायक्रोसिस्टम्स’च्या कम्युनिकेशन समारंभात लिडरशीपच्या पदांवर काम केले आहे. गरिमा एक कार्यरत वकील आणि वैविध्यपूर्ण पर्यावरणाला प्रभावित करणा-या औद्योगिक लिडर सुद्धा आहेत. त्यांनी ‘बिट्स पिलानी’मधून कॉम्प्यूटर सायन्समधून आपली पदवी संपादन केली आणि मुंबईच्या ‘झेवियर इन्स्टीटयूट ऑफ कम्युनिकेशन’ ( XIC) मधून त्यांनी मास कम्युनिकशनमधून पदव्युत्तर पदवी संपादन केली.
‘युवर स्टोरी’ने गरिमा यांच्यासोबत बंगळुरूच्या ‘जीई’ कँपसमध्ये काही क्षण घालवले आणि अगदी वेगळ्या असलेल्या त्यांच्या व्यावसायिक आयुष्यातील दोन घटनांबाबत जाणून घेतले. या दोन घटनांनी आपला दृष्टीकोन कसा बदलून टाकला आणि त्याद्वारे मिळालेला आत्मविश्वास आणि अनुभवामुळे त्यांना कशी ‘जीई’च्या सर्वोच्च पदाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली याबाबत त्या आमच्याशी मोकळेपणाने बोलल्या.
तुम्ही कोठून आलात, हे विसरु नका
गरिमा वर्मा सांगतात, “ मी २००४ मध्ये ‘फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट’मध्ये होती. ‘फिडेलिटी’चे मुख्य कार्यालय बोस्टनमध्ये होते. आम्ही भारतीय आजही प्रवासासाठी हत्तीचा वापर करतो असे माझा एक सहकारी मला त्यावेळी म्हटल्याचे आठवते. त्यावरून दोन्ही टीम्समध्ये एकमेकांच्या संस्कृतींबाबत जागृती घडवण्याची गरज होती हे अगदी स्पष्टच आहे. या दृष्टीने आम्ही मुख्य कार्यालयात ‘इंडिया-डे’ साजरा करण्याचा निर्णय घेतला.”
त्या पुढे आठवून सांगतात, “एकदा मी प्रवासासाठी पाश्चात्य कपडे आणि गाऊन पॅक करत होते. त्यावेळी माझ्या आईने मला काही साड्याही सोबत घ्यायला सांगितले. कारण तिच्या दृष्टीने साडी घातल्याने तेथील लोकांसमोर आपली भारतीय ओळख प्रदर्शित होणार होती. मी साडी सोबत तर घेतली, परंतु मी साडी नेसेन किंवा कसे याबाबत काही ठरवले नव्हते.”
परंतु नंतर गरिमा यांनी साडी नेसण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत त्या सांगतात, “एके दिवशी मी बोस्टनमध्ये माझा दृष्टीकोन बदलला आणि साडी परिधान केली. तेव्हा मी खूप घाबरले होते, कारण त्या कार्यक्रमात मी एकमेव साडीमध्ये होते. मी त्या १७५ लोकांच्या गर्दीत वेगळी दिसत होते.”
पुढे त्या आनंदीत होऊन सांगतात, “ कार्यक्रम संपल्यानंतर, जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले ‘फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट’चे विशेष कार्यकारी अधिकारी नेड जॉन्सन यांनी माझ्या सोबत डिनर घेताना तब्बल ४५ मिनिटांचा वेळ घालवला. अनेक लोक या संधीसाठी मरत असतात. “आपण जे परिधान केले आहे तो काय प्रकार आहे?” अशा प्रश्नाने आमचा संवाद सुरू झाला. त्यानंतर मी त्यांना साडीबद्दल सांगितले. मग आम्ही भारतातीत वस्त्रोद्योग आणि संस्कृतीबाबत चर्चा केली. साडी कशी परिधान करतात या विषयी मी त्यांना माहिती दिली. मी त्यांना त्यांच्यासोबत फिरून भारत दाखवावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. शिवाय भारतातून साडी घेऊन यायला देखील त्यांनी मला सांगितले. नंतर ते भारतात आले आणि मी त्यांचा खूप चांगल्या प्रकारे पाहुणचार केला याबाबत मला अतिशय आनंद होतो.”
त्या पुढे सांगतात, “कधी कधी संधी आपोआप येतात. त्यासाठी केवळ आपल्याला प्रामाणिक आणि साधे बनावे लागते. शिवाय आपण कुठून आलो आहोत, आपली पार्श्वभूमी काय आहे हे आपल्याला कदापि विसरता कामा नये. त्या दिवसापासून मी जिथे कुठे जाते, तिथे मी आत्मविश्वासाने आपली भारतीयता आपल्या सोबत घेऊनच जात असते.”
आपण भेटीमध्ये पहिल्या सात सेकंदांमध्ये काय कराल?
काही वर्षांपूर्वी, आपल्या कारकिर्दीच्या सुरूवातीला, गरिमा वर्मा यांना चीफ एक्झिक्युटिव्ह सोबत आलेला अनुभव अत्यंत कटू होता. एकदा त्या ज्या संस्थेसाठी काम करत होत्या त्या संस्थेच्या चीफ एक्झिक्युटिव्हसोबत लिफ्टमध्ये अडकल्या. त्या सातव्या मजल्यावर होत्या. दोघांनाही तळ मजल्यावर जायचे होते. मी काय करू असे त्यांनी गरिमा यांना विचारले. परंतु त्या खूपच घाबरलेल्या आणि भेदरलेल्या होत्या. त्या प्रसंगी त्या आपल्या मुखातून एक शब्दही बाहेर काढू शकल्या नाहीत.
गरिमा वर्मा यांच्यासाठी तो अनुभव एक मोठा धडाच होता. त्या म्हणतात, “ या प्रसंगापासून मग मी माझ्या ‘एलिवेटर पिच’वर तयारी करूनच जाऊ लागले. कुणास ठाऊक पुढच्या वेळी माझ्या सोबत लिफ्टमध्ये कोण असेल?”
बहुतेक लोक दुस-यांबाबत केवळ सात सेकंदांमध्ये आपले मत बनवून मोकळे होतात. जर आपले सुरूवातीचे सात सेकंद खराब असतील तर मग पुढे आपण काय करता याला काही अर्थ नसतो असे मत आपल्या अनुभवाच्या आधारे त्या व्यक्त करतात.
शेवटी त्या अनुभवाचे बोल ऐकवताना म्हणतात, “ मी सर्व व्यावसायिक, विशेषत: तरूणांना त्यांच्या ‘पर्सनल एलीवेटर पिच’ वर काम करायला सांगते. आपण काय करतो हे जितक्या उत्साहाने, आत्मियतेने आणि पूर्ण आत्मविश्वासाने आपण व्यक्त करू त्यावर आपले दूर पर्यंत जाणे, यशाचे शिखऱ गाठणे अवलंबून आहे.”