बेटी बचाव मोहिमेसाठी मोफत उपचाराची प्रथा
डॉक्टर गणेश राख यांच्या पुण्यातल्या मेडीकेयर रुग्णालयाची एक खासियत आहे. इथं मुलगी जन्माला आली की संपूर्ण रुग्णालयात मिठाई वाटली जाते. इतकंच नव्हे तर या डिलीवरीचे पैसेच घेतले जात नाहीत, मग ती डिलीवरी कुठल्याही प्रकारची असो. या नवजात मुलीचं फुलांनी स्वागत केलं जातं. आज जग इतकं पुढं गेलंय. मुलगा आणि मुलगी समानतेचे नारे दिले जातायत, पण तरीही समाजाच्या मानसिकतेत फारसा फरक झालेला दिसत नाही. मुलगी जन्माला आली की अनेक कुटुंबांत आनंदाचं वातावरण नसतं. मग पुढे जाऊन मुलीच्या संगोपनाकडेही साफ दुर्लक्ष केलं जातं. कुटुंब वाढण्यासाठी मुलगाच हवा ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न सर्वच पातळीवर केला जातोय. दुसरीकडे स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी सरकारनं मोहिमही सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टर राख यांच्या मेडीकेयर रुग्णालयातली ही प्रथा खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. कौतुकास्पद आहे. रुग्णालयात असेपर्यंत या नवजात मुली आणि मातेवर मोफत उपचार केले जातात.
ही प्रथा कशी सुरु झाली.
डॉक्टर गणेश राख सांगतात, “आपल्या समाजाची मानसिकताच अशी झाली आहे की प्रत्येक कुटुंबाला मुलगा हवा असतो. मुलगा जन्माला आला की ते कुटुंब अगदी आनंदात असतं. मिठाई वाटली जाते. पण मुलगी जन्माला आली तर ते कुटुंब दु:खी झालेलं दिसायचं. बाजूबाजूचे सोडून द्या स्वतः जन्मदात्या आईच्या चेहऱ्यावरही हे दु:ख स्पष्ट जाणवायचं, हे चित्र फारच विदारक होतं. अनेकदा मुलगी झालेले रुग्णालयाचं बिल भरतानाही नाराजी व्यक्त करायचे. हे पाहून मला फार वाईट वाटले आणि इथेच मला ही कल्पना सुचली. म्हणून मग आम्ही ही प्रथा सुरु केली. मुलगी जन्माला आली की आम्ही सर्व रुग्णालयात मिठाई वाटतो. त्या मुलीचं जंगी स्वागत केलं जातं. इतकंच नव्हे तर आम्ही त्यांच्याकडून बिलाचा एक पैसासुध्दा घेत नाही. तिचा सर्व उपचार मोफत होतो. समाजाची मानसिकता बदलण्यासाठी ही प्रथा सुरु झाली आणि त्याचा चांगला परिणामही दिसू लागला आहे एकदा एका कुटुंबाला अपेक्षा होती की त्यांना मुलगीच होणार. पण मुलगा झाला. आई-बाबासोबत घरातले सर्वच रडायला लागले. त्या दिवशी आम्हाला जाणवलं की आम्ही योग्य करतोय. खुप आनंद वाटला. समाजात हा बदल व्हायलाच हवा.”
मुळचे सोलापूरचे असलेले डॉक्टर गणेश ऱाख २००० साली एमबीबीएस झाले. तेव्हा ते घरोघऱ जाऊन रुग्णांवर उपचार करायचे. कारण स्वतःचे क्लिनिक सुरु करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. २००७ साली त्यांनी कर्ज काढूऩ हे रुग्णालय सुरु केलं. २०१२ पासून मुलगी झाल्यावर मोफत इलाज ही मोहिम सुरु केली. आता त्यांचं अनुकरण इतर डॉक्टर करु लागलेत. देशभरातल्या तीन हजारहून अधिक डॉक्टरांनी त्यांचं अनुकरण करत मुलगी झाल्यावर मोफत इलाज करायला सुरुवात केली. हे सांगताना डॉक्टर गणेश ऱाख यांना विशेष आनंद होतो आणि त्यांनी त्यांच्या परीने सुरु केलेली 'बेटी बचाओ' मोहीम यशस्वी झाल्याचे त्यांना समाधान वाटते.
डॉक्टर गणेश यांच्या मोहिमेचा हा चार वर्षांचा प्रवास तितका सोपा नव्हता. जेव्हा त्यांनी ही मोहीम सुरु केली तेव्हा घरातूनच विरोध झाला. कर्ज काढून रुग्णालय सुरु केलेलं, त्यामुळं घरच्यांना चिंता वाटत होती. पण त्यांच्या वडिलांनी साथ दिली आणि ही मोहीम सुरु झाली. जो पर्यंत समाजात मुलगी झाल्यावरही आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरु होत नाही तोपर्यंत माझं काम मी असंच सुरु ठेवणार आहे. असं ते सांगतात.